-
मल्याळम अभिनेत्री श्वेता मेनन काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली होती. ५१ वर्षीय अभिनेत्री श्वेता मेननवर केरळच्या एर्नाकुलम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
-
तरूणपणी काम केलेल्या चित्रपटात अश्लील दृश्य दिल्याबद्दल एका सामाजिक कार्यकर्त्याने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे पोलिसांनीही गुन्हा दाखल केला होता. मात्र केरळ उच्च न्यायालयाने फौजदारी कारवाई करण्यास स्थगिती दिली होती.
-
सदर तक्रार दाखल करण्याच्या टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. १५ ऑगस्ट रोजी असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट (अम्मा) या संघटनेची निवडणूक होणार होती. श्वेता मेनन अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्यामुळेच हा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले गेले.
-
अखेर आज या निवडणुकीचा निकाल लागला असून इतिहासात पहिल्यांच या संघटनेच्या अध्यक्षपदी श्वेता मेनन यांच्या रुपाने एका महिलेची निवड झाली आहे.
-
विशेष म्हणजे मल्याळम चित्रपट सृष्टीतील अनेक पुरूष कलाकारांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांच्या अध्यक्षतेखालील १७ सदस्यीय कार्यकारी समितीने राजीनामा दिल्यानंतर एका वर्षानंतर नवीन पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक घेण्यात आली.
-
महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणाने ग्रासलेल्या मल्याळम चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या संघटनेवर आता दोन महिलांची निवड झाली आहे. अध्यक्षपदी श्वेता मेनन तर सरचिटणीसपदी कुक्कू परमेश्वरन जिंकून आल्या आहेत.
-
अभिनेते आणि भाजप नेते देवन यांच्याविरुद्ध झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत श्वेता मेनन यांनी बाजी मारली.
-
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार , एएमएमएच्या ५०४ सदस्यांपैकी फक्त २९८ सदस्यांनी कोची येथील मतदान केंद्रावर मतदान केले. पृथ्वीराज सुकुमारन, मंजू वॉरियर आणि इंद्रजीत यांच्यासह अनेक हाय-प्रोफाइल कलाकार हे मतदानासाठी अनुपस्थित राहिले.
-
विजयानंतर अभिनेत्री श्वेता मेनन यांनी मनोरमा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या विजयाबद्दल मला खूप आनंद होत आहे. यापुढील कारकिर्दीसाठी मोहनलाल, मामूटी आणि सुरेश गोपी यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
-
मल्याळम अभिनेत्री श्वेता मेननने आजवर बॉलिवूडमध्येही नशीब आजमावले होते. पृथ्वी या सिनेमापासून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर सलमान खानच्या बंधन, करिश्मा-गोविंदाच्या शिकारी, शाहरुख खानच्या अशोका या चित्रपटात तिने काम केले होते. याव्यतिरिक्त बॉलिवूडमधील हा मैने भी प्यार किया, वध, अनर्थ, अब के बरस, अनोखा बंधन, धुंध, प्राण जाए पर शान न जाए, मकबूल, हंगामा आणि रन या चित्रपटातही तिने काम केले होते.
महिलांना दुय्यम वागणूक देणाऱ्या मल्याळम सिनेसृष्टीला सुखद धक्का; पहिल्यांदाच चित्रपट संघटनेवर महिला अध्यक्ष, कोण आहे श्वेता मेनन?
AMMA Elections Shwetha Menon President: असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स (AMMA) या संघटनेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच अभिनेत्री श्वेता मेनन यांच्या रुपात एका महिलेची वर्णी लागली आहे. (सर्व फोटो श्वेता मेनन इन्स्टाग्रामवरून)
Web Title: Shwetha menon become first women to serve as president of malayalam movie artists org kvg