-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागरी सेवा दिनानिमित्ताने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, “प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरी सेवा दिनानिमित्ताने हार्दीक शुभेच्छा. तुम्ही सगळे माझे बंधू आणि भगिनी आहात. माझा उल्लेख जेव्हा लाडका मुख्यमंत्री असा केला जातो तेव्हा त्या श्रेयाचे खरे धनी आपण प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी असता”.
-
“करोना काळात गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंतच्या प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकलो. या काळात आपणसर्वांनी जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर जाऊन, रस्त्यांवर उतरून काम केलं. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर आपल्याला मात करता आली,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“अनेक मागण्या माझ्यासमोर येत असतात. नियमात बसणाऱ्या गोष्टींना हो आणि जे नियमात बसत नाही त्याला नाही म्हणायचे असते. या दोन्ही गोष्टींची टोके जोडत राज्याच्या विकासाचा गाडा वेगवान करायचा असतो. मला माहित आहे करोना काळात मी अनेक गोष्टींना नाही म्हटलं. कारण जनतेच्या रक्षणासाठी, मग ते लॉकडाऊन असेल किंवा मास्कची सक्ती,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
“करोना पुन्हा डोके वर काढताना दिसतोय त्यामुळे काळजी घेणं आजही आवश्यक आहे,” असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.
-
“आम्ही राजकारणी स्वप्नं दाखवणारी माणसं आहोत. पण ही स्वप्नं सत्यात आणणारी आणि जमिनीवर मजबूतपणे उभं राहून काम करणारी माणसं आपण सर्वजण आहात. दर पाच वर्षांनी आम्हाला आमच्या प्रगतीचा आढावा जनतेसमोर मांडायचा असतो. पण या प्रगतीची “गती” ठरवणारे आणि राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे आपण सर्वजण आहात,” असं कौतुगौद्गार उद्धव ठाकरेंनी काढले.
-
“सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील दु:खाचे अश्रू पुसले जाऊन जेव्हा त्याची जागा आनंदाचे अश्रू घेतात तेंव्हा प्रशासन चांगले काम करत आहे असं मानणारा मी आहे. मला सांगायला आनंद होतो की अलीकडे काही निरिक्षणे जाहीर झाली आहेत त्यात ज्या राज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि ज्या राज्याच्या स्थुल राज्य उत्पन्नात चांगली वाढ होत आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. हे सगळे माझ्या चांगल्या सहकाऱ्यांमुळे शक्य झाले आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“प्रशासन किती सुलभतेने काम करत आहे याची काही उदाहरणे मी नक्की सांगू शकेन. ज्यामध्ये मी करोनाचा उल्लेख केला आहेच. परंतू शासनाने सत्तेवर आल्या आल्या जो कर्जमुक्तीचा निर्णय घेतला तो अतिशय बिनबोभाटपणे अंमलात आणला गेला हे देखील एक उदाहरण आहे. आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले परंतू शेतकरी कायमस्वरूपी आपल्या पायावर पुन्हा उभा कसा राहील याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तो प्रयत्न आपण करत आहोत. विकेल ते पिकेल अभियानाची अंमलबजावणी असेल किंवा शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय असतील,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
“दफ्तर दिरंगाई, लालफीत सारखे शब्द खोडून काढायला हवेत, नागरिकांना त्यांचे हक्क सहजतेने मिळाले पाहिजेत,” असं मत यावेळी उद्धव ठाकरेंनी मांडलं.
-
“राज्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवतांना सर्वांनी कर्तव्याप्रती समर्पित राहून काम केलं पाहिजे. ही निष्ठा राज्य, देश आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असली पाहिजे. जे काम नियमाच्या चौकटीत राहून करणे शक्य आहे त्याला तुम्ही हो म्हणता आणि जे काम करता येत नाही त्याला “नाही” म्हणण्याचे धाडसही दाखवता,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“लोकांना रडवणं खूप सोप असतं. हसवणं तेवढच कठीण. करोना काळात आपल्या सर्वांच्याच मनावर तणाव होता. आपण आपल्या स्वकीयांना गमावलं. खूप नुकसान झालं.पण या कठीण परिस्थितीचे आव्हान पेलण्याची ताकत आपण सर्वांनी दिलीत. तुम्ही कामांना “गती” देता आणि “मान” आम्हाला मिळतो. तुम्ही सर्वजण राज्याच्या विकासाचा “गोवर्धन” पेलणारे माझे सहकारी आहात,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र, जे तुमचं आणि माझं ही कुटुंब आहे ते सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सर्वांनीही आजच्या नागरी सेवा दिनाच्या निमित्ताने या कुटुंबाला सुखी ठेवण्याची शपथ घेऊया,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
“करोना पुन्हा डोके वर काढताना दिसतोय त्यामुळे…,” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधान
“मग ते लॉकडाऊन असेल किंवा मास्कची सक्ती; जनतेच्या रक्षणासाठी…”
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray covid 19 sgy