-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच विश्वासघातकी, आईला गिळणारी औलाद अशा शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकेरंच्या टीकेला शिंदे गटाचे समर्थक संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
-
आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर नाराजी व्यक्त केली आहे. आमची हयात शिवसेनेत गेली असून आम्ही पालापोचाळा नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.
-
“आज उद्धव ठाकरेंची मुलाखत पाहिली, मुलाखत घेणाऱ्याचं आश्चर्य वाटलं. या मुलाखतीत त्यांनी कचऱ्यातून उचललं असं म्हटलं. त्याचं फार वाईट वाटलं,” असं संजय शिरसाट म्हणाले.
-
“शिवसेनाप्रमुख आमचे आहेत असं त्यांनी सांगितलं, पण ते फक्त त्यांचेच नाहीत संपुर्ण जगाचे आहेत,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
-
“आज मुख्यमंत्री कार्यालयात जा, तिथे गर्दी बघा, बाळासाहेबांचं फोटो बघा. कृपया त्यांची उंची तुम्ही कमी करु नका. एखाद्याला खाली खेचायचं काम करु नका. शिवसेनाप्रमुख आमचे दैवत आहेत,” असं संजय शिरसाट म्हणाले.
-
“आम्हाला पालापाचोळा म्हणू नका. कोणीही जुना नेता तुमच्या बाजूला बसत नाही, याचा विचार करा,” असा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला.
-
“एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. आजारपणात काही घडलं नाही. आमची चिंता तुम्ही करू नका. आमचा रस्ता आम्ही पाहू,” असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.
-
“ज्या रूममध्ये अमित शाह यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण त्यांचा संपर्क होत होता, यांनी केला नाही. संजय राऊत यांच्यासारख्यांनी खोडा घातला,” असा आरोप संजय शिरसाट यांनी केला.
-
उद्धव ठाकरेंनी टीका करताना यांना मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत स्वत:ची तुलनाच करु लागला आहात अशी टीका केली आहे. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले “आमचं काय घेऊन बसला आहात, उद्धव ठाकरेदेखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाशी बसून राहू इच्छित आहोत. आम्हाला शिवसेनाप्रमुख होण्याची गरज नाही”.
-
“आमच्यासाठी शिवसेनाप्रमुख आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही असं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. आमची लायकी आहे का शिवसेनाप्रमुख होण्याची? आम्ही त्यांच्याशी कधीच बरोबरी केली नाही,” असं प्रतिपादन त्यांनी केलं.
-
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी गेले होते, ही आमची निष्ठा आहे. एक वेळ तुम्हाला विसरु, पण शिवसेनाप्रमुखांना विसरणार नाही,” असंही ते म्हणाले.
-
“बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि पुण्याईमुळेच आम्ही मंत्री, आमदार, खासदार आहोत. त्यांना तुम्ही इतकं छोटं करण्याचा प्रयत्न का करत आहात? राजकारण करायचं असेल तर आपला ठसा उमटवा. शिवसेनाप्रमुखांनी खाली खेचू नका, ते तुमची संपत्ती नाही. ते प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत आहे,” असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.
-
“पालापोचाळा कसं म्हणू शकता? सर्व मोठ्या लोकांच्या सावलीत आम्ही वाढलो. शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रभर फिरत नव्हते, पण सर्व मोठ्या नेत्यांनी गावांमध्ये, खेड्यात जाऊन शिवसेना रुजवायचं काम केलं. त्यांना पालापोचाळा म्हणता येणार नाही,” अशी खंत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
-
“आमच्या आयुष्यातील महत्वाचे दिवस शिवसेनेत घालवले आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शिवसेनेत ३८ वर्ष घालवली आहेत. आजच्या घडीला तुम्हाला आम्ही पालापाचोळा वाटतो? उद्या तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवा,” असंही ते म्हणाले आहेत.
-
(File Photos)
“बाळासाहेब काय तुमची संपत्ती नाही”, सडलेली पानं, विश्वासघातकी, आईला गिळणारी औलाद म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर
“आम्हाला पालापाचोळा म्हणू नका. कोणीही जुना नेता तुमच्या बाजूला बसत नाही, याचा विचार करा”
Web Title: Rebel mla sanjay sirsat shivsena uddhav thackeray sanjay raut balasaheb thackeray eknath shinde sgy