-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी ते कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. राज ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून आपल्या या दौऱ्यातील माहिती देत आहेत. आपल्या चंद्रपूर दौऱ्याबद्दलही त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
-
कोरोनानंतरचा राज ठाकरेंचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. त्यांचं या दौऱ्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं.
-
यापुढील काळात श्री. अनिल शिदोरे, श्री. प्रकाश महाजन, श्री. राजू उंबरकर, श्री. अविनाश जाधव आणि श्री. संदीप देशपांडे हे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे आणि शिबिरं घेणार आहेत.
-
विदर्भ दौऱ्यात नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती असा टप्पा पार झाला आहे. चंद्रपूर येथे महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं स्वागत अभूतपूर्व होतं. चंद्रपूर येथे तिथल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद झाला. ह्यात त्यांच्या प्रत्येकाच्या क्षेत्रात होत असलेले बदल, आव्हानं, त्यांना सरकारकडून असलेल्या अपेक्षा ह्याबद्दल सविस्तर चर्चा झाली अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.
-
चंद्रपूरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ह्यात पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना, अपेक्षा, त्यांच्या मनातील योजना समजवून घेतल्या असं त्यांनी सांगितलं आहे.
-
‘जोपर्यंत तुम्ही प्रस्थापितांशी दोन हात करणार नाही तोपर्यंत राजकारणात यश मिळणार नाही,” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
-
“वैयक्तिक संबंध, मैत्री आणि राजकारण ह्याच्यात गल्लत करू नका. राजकारणात जेंव्हा एखादी आग्रही भूमिका घेतो ती भूमिका प्रस्थापितांच्या धोरणांच्या विरोधात असते, तो विरोध राजकारणाला असतो, त्या व्यक्तीला विरोध नसतो. आणि म्हणूनच अशी भूमिका घेताना मागेपुढे पाहू नका,’ हे मी आवर्जून सांगितलं असल्याचं ते म्हणाले आहेत.
-
राज ठाकरेंनी अमरावतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसंच अमरावती जिल्ह्यातील तळेगाव येथील क्रिकेट अकादमीला भेट दिली. ग्रामीण विदर्भातील एक अतिशय उत्तम क्रिकेट अकादमी झुबीन भरुचा आणि रोमी भिंदर ह्यांनी उभी केली आहे असं ते म्हणाले.
-
त्यानंतर अमरावती यवतमाळ अकोला वाशीम बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. संघटनात्मक बाबींचा आढावा ह्यात घेतला गेला.
-
‘कार्यकर्त्यांनी फक्त सेल्फी काढून फक्त सोशल मीडियावर अपलोड करुन काहीही होणार नाही. तुम्हाला सातत्याने काम करावे लागेल. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील आणि ते सोडवावे लागतील. त्यातूनच शाश्वत आणि स्थिर सत्ता मिळवण्यापर्यंतचा प्रवास आपण करू शकतो,” असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
-
तडजोडीतून मिळालेली सत्ता ही क्षणभंगुर असते हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
-
त्यामुळे तुम्ही मला साथ द्या. आपण पक्ष उभा करू. माझ्या महाराष्ट्र सैनिकाला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी…’ ही माझी भूमिका त्यांनी महाराष्ट्र सैनिकांसमोर मांडली आहे.
-
(Photos: Raj Thackeray Facebook)
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना राज ठाकरेंचा शब्द, म्हणाले “तडजोडीतून मिळालेली सत्ता क्षणभंगुर, तुम्ही फक्त साथ द्या, आपण…”
कार्यकर्त्यांनी फक्त सेल्फी काढून फक्त सोशल मीडियावर अपलोड करुन काहीही होणार नाही, राज ठाकरेंनी दिला सल्ला
Web Title: Mns raj thackeray vidarbha tour maharashtra politics sgy