-

केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात बिहारची राजधानी पाटण्यात १५ विरोधी पक्षांची शुक्रवारी ( २३ जून ) महाबैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र डागलं आहे.
-
“सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले,” अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
-
एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही. झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत.”
-
“सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्यांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
-
“बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत.”
-
“३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत,” असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे,” असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
-
“आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
-
“कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का?,” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
महायुतीला आव्हान ते उद्धव ठाकरेंचा समाचार; पाटण्यातील बैठकीवरून एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? वाचा…
“३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून…”, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
Web Title: Eknath shinde attacks uddhav thackeray over opposition meeting patna ssa