-
काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी रात्री अमेरिका दौऱ्यावर गेले. सॅन फ्रॅन्सिस्को येथे त्यांनी तेथील स्थायिक भारतीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं. नवे संसद भवन, भारतात मुस्लिमांवर होत असलेले अत्याचार, यंत्रणांचा गैरवापर आदी मुद्द्यांवरून त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली. एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सगळ्यातलं सगळं माहित असतं अशी उपरोधिक टीकाही केली. (फोटो – काँग्रेस/ट्विटर)
-
“देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवण्याकरता नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं असावं, असं मला वाटतं. बेरोजगारी, महागाई, द्वेष, शैक्षणिक संस्थांची कमतरता आदी मुद्द्यांवर भाजपा चर्चा करत नाही. त्यामुळे अशा मुद्द्यांना पुढे केलं जातं”, असं राहुल गांधी म्हणाले. (फोटो – काँग्रेस/ट्विटर)
-
“द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचं दुकान उघडू, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचं त्यांना वाटतंय. परंतु, शिख, दलित, आदिवासी या सर्व समुदायांनाही तसंच वाटतंय. प्रत्येकजण विचारतोय की काय चाललंय? मुस्लिम समाजाला हे प्रकर्षाने जाणवतंय कारण त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय. परंतु, आम्ही द्वेषाला द्वेषाने नाही हरवू शकत. आम्ही प्रेमाने द्वेषाला हरवू. भारत द्वेषावर विश्वास ठेवत नाही. आज भारतात मुस्लिमांसोबत जे घडतंय तेच उत्तर प्रदेशमध्ये दलितांसोबत घडत आहे. परंतु आम्ही याला आव्हान देऊ”, असं राहुल गांधी म्हणाले. (फोटो – काँग्रेस/ट्विटर)
-
“महिलांच्या आरक्षणासाठी आम्ही विधेयक आणू इच्छितो. परंतु, आमच्यापैकी काही सहकाऱ्यांनी आम्हाला समर्थन दिलं नाही. त्यामुळे हे विधेयक येऊ शकलं नाही. परंतु, आम्ही सत्तेवर आल्यास महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर करून घेऊ, असंही राहुल गांधींनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच, आम्ही महिलांन सशक्त करू, महिलांना सरकारमध्ये जागा देऊ, त्यांना व्यवसायात संधी देऊ, त्यांना शक्ती देऊ. यातूनच त्यांना सुरक्षा मिळेल”, असं राहुल गांधी म्हणाले. (फोटो – काँग्रेस/ट्विटर)
-
“आम्ही पाहिलंय की राजकारणाची जी सामान्य साधने होती (जनसभा, लोकांशी संवाद, रॅली) त्यांचा आता फारसा फायदा होत नाही. राजकारणासाठी आम्हाला ज्या संसाधनांचा वापर करायचा असतो त्यावर भाजपा आणि आरएसएस नियंत्रण आणतं. लोकांना धमकावलं जात आहे.यंत्रणांचा वापर केला जात आहे. त्यामुळे भारतात राजकारण करणं सोपं नसल्याचं आता आम्हाला जाणवत आहे. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करण्याचा निर्णय घेतला”, असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. (फोटो – काँग्रेस/ट्विटर)
-
“भारत जोडो यात्रेवर निर्बंध लादण्याचा भाजपाने पुरेपूर प्रयत्न केला असल्याचा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला. त्यांनी पोलीस आणि यंत्रणांचा वापर केला. परंतु, ते प्रत्येक प्रयत्नात अयशस्वी ठरले. तुम्ही सर्वांनी आमची मदत केली, त्यामुळे आमच्याविरोधात काहीही होऊ शकलं नाही”, असं राहुल गांधी म्हणाले. (फोटो – काँग्रेस/ट्विटर)
-
“हे जग एवढं मोठं आहे की कोणताच व्यक्ती असं समजू शकत नाही की त्याला सर्वकाही माहितेय. हे एका आजाराप्रमाणे आहे की ज्यांना असं वाटतंय की त्यांना सर्वकाही माहितेय. त्यांना असं वाटतंय की त्यांच्याकडे देवापेक्षाही जास्त ज्ञान आहे. देवासमोर बसून ते देवालाही समजावून सांगतील की नक्की काय चाललंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्यातीलच एक आहेत, असा मिश्लिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.(फोटो – काँग्रेस/ट्विटर)
नवं संसद भवन, यंत्रणांचा दुरुपयोग, भारत जोडो यात्रा…, अमेरिकेत जाऊन राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
Web Title: New parliament building misuse of systems bharat jodo yatra rahul gandhi attacked modi by going to america sgk