-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवृत्तिवेतनावर घर चालवणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची नामुष्की ओढवली असतानाच एक मराठमोळा उद्योजक त्याच्या मदतीला धावून आला आहे.
-
विनोद कांबळीने आपल्या आर्थिक संकटासंदर्भात केलेलं भाष्य आणि पैशांची गरज असल्याची माहिती दिल्यानंतर अहमदनगरमधील एका मराठमोळ्या उद्योजकाने कांबळीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे.
-
उद्योजक संदीप थोरात यांनी कांबळीला नोकरीची ऑफर दिली आहे.
-
सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीमध्ये चांगल्या पदावरील नोकरीची ऑफर थोरात यांनी कांबळीला दिली आहे.
-
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना थोरात यांनी अगदी या नोकरीसाठी पगार किती असेल हेसुद्धा सांगितलं आहे.
-
विशेष म्हणजे विनोद कांबळीवर ओढावलेल्या स्थितीबद्दल बोलताना थोरात यांनी दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचाही उल्लेख केला आहे.
-
कांबळीला पैशांची गरज असल्याच्या बातम्या आपण वृत्तवाहिन्यांवर पाहिल्याचा उल्लेख करत थोरात यांनी उतार वयामध्ये चांगल्या लोकांवर अशी वेळ येणं हे आपल्या सर्वांचं अपयश असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
-
“मला महाराष्ट्राचं विशेष वाटतं. महाराष्ट्रात खूप चांगल्या व्यक्ती आहेत मात्र त्यांच्या वार्धक्याच्या काळात त्यांच्यावर ही वेळ का येते मला कधीच कळलं नाही,” असं थोरात म्हणाले.
-
“सिंधुताई सपकाळांना देखील त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांसमोर पदर पसरुन जगावं लागलं. आज तीच वेळ विनोद कांबळींवर देखील आलेली आहे,” असंही थोरात म्हणाले.
-
“१९९० ते २००० या कालावधीमध्ये विनोद कांबळींनी अतिशय चांगली कामगिरी करुन भारताचं नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं,” असं थोरात यांनी कांबळीचं कौतुक करताना म्हटलं.
-
“मात्र आज त्या व्यक्तीला (कांबळीला) कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ओढाताण करावी लागत असेल तर मला वाटतं की हे आपलं अपयश आहे,” असं थोरात यांनी म्हटलं आहे.
-
कांबळीच्या म्हणण्यानुसार, सध्या त्याच्या कुटुंबाची गुजराण फक्त ‘बीसीसीआय’कडून मिळणाऱ्या ३० हजार रुपये निवृत्तिवेतनावर होत आहे. म्हणजेच कांबळीची दिवसाची कमाई फक्त एक हजार रुपये इतकी आहे.
-
सचिन तेंडुलकरला या संपूर्ण परिस्थितीची कल्पना आहे असंही कांबळीने म्हटलं आहे.
-
कांबळीचं मुंबईमध्ये स्वत:चं घर असलं तरी ३० हजार रुपयांमध्ये महिना काढणं हे जिकरीचं काम आहे. दोन मुलं आणि पती-पत्नी असं कांबळीचं चौकोनी कुटुंब आहे.
-
करोनाच्या साथीच्या कालखंडात नेरुळ येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमधील मार्गदर्शनाचे काम स्थगित झाले आहे, असंही कांबळी म्हणाला.
-
याचप्रमाणे २०१९मध्ये झालेल्या मुंबई क्रिकेट लीगमध्ये तो एका संघाचा प्रशिक्षक होता. परंतु ही लीगसुद्धा अद्याप पुन्हा सुरू होऊ शकलेली नाही, असं तो म्हणाला.
-
पुढे बोलताना थोरात यांनी, “यासंदर्भातील सर्व बातम्या मी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरुन पाहिल्या. मला असं वाटलं की या माणासाला आपण खरोखर मदत केली पाहिजे,” असं म्हणत विनोद कांबळीला नोकरीची ऑफर दिली.
-
”माझ्या फायनान्स कंपनीच्या मुंबईमध्ये १० ब्रँच होत आहेत. विनोद कांबळी हे फायनान्समधील नसले तरी क्रिकेट हा असा विषय आहे की त्यात मायक्रो मॅनेजमेंट चालतं,” असं थोरात म्हणाले.
-
“याच मायक्रो मॅनेजमेंटचा वापर या ब्रँचच्या व्यवस्थापनासाठी करता येईल. क्रिकेटमध्ये ज्या शिस्तीने काम चालतं तीच शिस्त कांबळी या कंपनीमध्ये लावू शकतात असं मला वाटतं,” असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.
-
“मी त्यांना एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर मुंबईमध्ये जाऊन देणार आहे,” असं थोरात म्हणाले.
३० हजार निवृत्तिवेतनावर गुजराण करणाऱ्या विनोद कांबळीला एक लाखांची जॉब ऑफर; मराठमोळ्या उद्योजकाने देऊ केली ‘ही’ नोकरी
अहमदनगरमधील एका मराठमोळ्या उद्योजकाने आर्थिक संकटात सापडलेल्या विनोद कांबळीला थेट नोकरीची ऑफर दिली
Web Title: Ahmadnagar businessmen sandip thorat offers 1 lakh per month salary job to vinod kambli as ex cricketer opens up on his financial crisis scsg