छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील उपोषणानंतर आरक्षण आंदोलनातील प्राण सरकारने काढून घेतला त्यानंतर मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनास हजेरी लावली. शेतकरी नेत्यांची ते बैठक घेणार होते. पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. मराठवाड्यातील शेती प्रश्नाचे नेतृत्व आपल्याकडे यावे असे प्रयत्न जरांगे यांच्यावतीने केले जात असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील शेती प्रश्न अधिक जटील आहेत. ते प्रश्न मांडणारे नेतृत्व शिल्लकच नाही. त्या पोकळीत ‘मराठा’ शब्दाऐवजी शेती प्रश्न यावेत असे सूचवून पाहिले जात होते. जरांगे यांच्या उपस्थितीनंतर जरांगे यांना शेतकरी नेता व्हायचे आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान जरांगे यांच्या कानात बोलणारा नेता, अशी बच्चू कडूची मराठवाड्यात ओळख बनली होती. बच्चू कडू, उदय सामंत, संदीपान भुमरे असे तीन नेते जरांगे यांचे उपोषण सुरू असताना भेटीगाठीसाठी येत जात. त्यातून बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांची जवळीक झाली. शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात जरांगे यांचे जाणे तुम्ही मला उपोषण सोडविण्यासाठी मदत केली मी तुमच्या आंदोलनास पाठिंबा देतो, या पातळीवरची आहे. मराठा आरक्षण आंदोलन आणि बच्च कडू यांचे आंदोलन शासन निर्णयानंतर ‘ जल्लोषात’ संपले. त्यानंतर दोन्ही आंदोलनाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्हही लावण्यात आले. अशा परिस्थितीमध्ये जरांगे आता शेती प्रश्नावर माध्यमांशी संवाद साधू लागले आहेत. त्यामुुळे जरांगे यांना शेतकरी नेता व्हायचे आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
मराठवाड्यात शेती प्रश्नावर आंदोलनांचा जोर अधिक असला तरी शेतकरी नेता अशी ओळख असणारा एकही नेता नाही. शेतकरी संघटना अशी बिल्ला लावणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आहे. लक्ष्मण वडले यांचे भाषण ऐकायला लोक गर्दी करायचे. पण शेतकरी संघटनेतील एका फळीनंतर शेती प्रश्न शेतकरी कार्यकर्त्यांऐवजी प्रशासनाने उचलून धरले होते. विभागीय आयुक्त असताना सुनील केंद्रेकर यांनी हा प्रश्न सरकार पर्यंत पोहचवला. त्या अहवालावरची ओरड नंतर शेतीविषयक काम करणाऱ्या विविध संघटनांनी केली. पण प्रश्न समजून तो मांडणारी शेतकरी अभ्यासक मात्र नाहीत.
२००५मध्ये तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील प्राध्यापकांनी पहिला शेतकरी आत्महत्यांचा अहवाल तयार केला होता. त्यानंतर शेतीचे हे आपत्ती निवारणाच्या अंगानेच मांडले जात आहेत. शेती प्रश्नाची उकल नीट होत नसल्याने आलेले नैराश्य आरक्षण आंदोलनातूनही दिसून आले. त्यामुळेच जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला असे मानणाऱ्यांची संख्या मराठवाड्यात अधिक आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागे असणारी गर्दी शेती प्रश्नासाठी वापरली जावी, असा मतप्रवाह मराठा नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे आरक्षण आंदोलनानंतर शेती प्रश्नावर जरांगे बोलत असल्याचा दावा केला जात आहे.
