परभणी : जिल्हाधिकारीच ‘पीए’ मार्फत टक्केवारी घेतात असा खासदार संजय जाधव यांनी आढावा बैठकीत केलेला थेट आरोप आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांनी ठेकेदारी करू नये असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला कानमंत्र यामुळे हा दौरा चर्चेत राहिला आहे. पवार निघून गेल्यानंतरही जिल्ह्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले असून या दौऱ्याचे काही परिणाम नजीकच्या काळात दिसून येतात की हा दौरा केवळ वाऱ्यावरची वरात ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री पवार हे दोन दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेत आढावा बैठक तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा असे या दौऱ्याचे स्वरूप होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी हे पीएमार्फत टक्केवारी घेतात. दोन टक्के दिल्याशिवाय काम होत नाही असा आरोप थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या टक्केवारीची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

या बैठकीला पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि जिल्ह्यातील आमदार राहुल पाटील, राजेश विटेकर, रत्नाकर गुट्टे हेही उपस्थित होते. दोन टक्के रक्कम घेतल्याशिवाय एकही फाईल प्रशासकीय मान्यतेसाठी निघत नाही असा आरोप यावेळी जाधव यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे प्रशासनाची लक्तरे चव्हाट्यावर आली.

मनरेगा मार्फत बोगस कामे होत आहेत अशी तक्रार खुद्द पालकमंत्र्यांनीच उपमुख्यमंत्र्यांसमोर केली यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात विसंवाद असल्याचे चित्र समोर आले. अनेक महत्त्वाचे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत अशी बाबही यावेळी समोर आली. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप झाल्यानंतर हे पैसे तुम्ही कोणासाठी घेता असे उपमुख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यास म्हणाले. यावेळी समाज कल्याण विभागाबाबतही अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींनी बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तेथील अस्वच्छते बाबत पवार यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. परिसरातील झाडे सुकलेली आहेत त्यांना पाणीही दिले जात नाही असे ते म्हणाले या सर्व प्रकारावरून उपमुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात कोणताच ताळमेळ नसल्याचे दिसून आले.

आढावा बैठकीनंतर झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ठेकेदारी करायची की राजकारण हे एकदा ठरवा. दोन्हीही एकाच वेळी करता येणार नाही असेही पवार म्हणाले. प्रत्यक्षात निधीच्या अपेक्षेने सध्या राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांची ‘आयात’ वाढली असून त्यातले अनेक जण ठेकेदारीशी संबंधित आहेत. आपल्या पक्षातील अशा कार्यकर्त्यांचे पवारांनी कान टोचले असले तरी अशा स्वरूपाचे कार्यकर्ते पक्षात आहेत हे पवारांना कसे माहित नाही याबाबत मात्र येथे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सत्ताधारी राष्ट्रवादीत वाढलेली कार्यकर्त्यांची आवक यामागे निधीचे कारण प्रमुख असल्याचे बोलले जात आहे. ‘ठेकेदारी’ आणि ‘टक्केवारी’ हे दोन शब्द पवारांच्या दौऱ्यात चर्चेत आले मात्र भविष्यात याबाबतीत काही सुधारणा दिसेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar parbhani tour and mp sanjay pawar allegations about percentage in development work print politics news asj