अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संजय खोडके यांच्या संघर्षातून अमरावतीत उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न ४३० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोंडेश्वर नजीक आलियाबाद (वडद) येथील ११.२९ हेक्टर जागा मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. पण, अद्याप या जागेवर प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२४-२५ या सत्रापासून सुरू झाले आहे. प्रथम वर्षाकरीता १०० विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला आहे. आता द्वितीय वर्षाची तयारी देखील वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सुरू केली आहे. सध्या जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयाच्‍या परिसरात हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयासाठी मोठ्या इमारतीची गरज आहे. पण, इमारतीच्‍या जागेवरून सत्‍तारूढ महायुती सरकारमधील दोन आमदारांमध्‍ये संघर्ष उभा ठाकला आहे.

आमदार रवी राणा आणि आमदार संजय खोडके यांच्‍यातील संघर्ष नवा नाही. २००९ मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सुलभा खोडके यांना रवी राणा यांनी पराभूत केले, तेव्हापासून खोडके दाम्पत्य आणि राणा यांच्यात वितुष्ट आहे. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर खोडके यानी उघडपणे विरोध करीत बंड पुकारले होते. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित देखील करण्यात आले होते. संजय खोडके हे आता सत्तारूढ पक्षात आहेत, तरीही राणा-खोडके वाद मिटलेला नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी निवडण्यात आलेली जागा ही बडनेरा मतदारसंघात आहे. त्यामुळे रवी राणा यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाविद्यालयाची आलियाबाद येथील जागा शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असून या जागेवर रुग्णालय बांधल्यास मेळघाट आणि इतर तालुक्यांतून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अमरावती शहराला वळसा घालून यावे लागेल, असे संजय खोडके यांचे म्हणणे आहे. विधान परिषदेत देखील हा मुद्दा उपस्थित करून खोडके यांनी या जागेला आपला विरोध स्पष्ट केला आहे.

महाविद्यालयाच्या इमारतीची सद्यस्थिती?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नियुक्ती करण्यात आली असून वैद्यकीय शिक्षण व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आयुक्तांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) मानकानुसार निविदा राबविण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सरकारने बांधकाम सुरू करण्याचे संकेत दिले असले, तरी संजय खोडके यांनी तलवार अद्याप म्यान केलेली नाही.

शहरानजीकच्या शासकीय जमिनीवर वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभी झाल्यास ते सर्वांच्या सोयीचे होईल. सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास होणार नाही. दूर अंतरावर ही इमारत उभी झाल्यास केवळ त्या भागातील जमिनींचे दर वाढतील, अशी प्रतिक्रिया उमटत असताना आता संजय खोडके यांच्या भूमिकेला सरकारकडून कितपत प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादाच्या लढाईत सर्वसामान्य अमरावतीकरांनी होरपळ होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.