अमरावती : शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करणार, हे निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करा, हा नारा देत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आणला आहे. कडू यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले असले, तरी आंदोलनाची धग कायम आहे. १५ दिवसांत कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले. पण, या संपूर्ण घडामोडींमध्ये सरकारच्या भूमिकेविषयी निर्माण झालेली साशंकता महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

ऐन पेरणीच्या हंगामात बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या ‘टायमिंग’ विषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या, खुद्द बच्चू कडूंनीही हे मान्य केले. पण, या आंदोलनाने अनेक विषयांच्या गर्दीत हरवलेला कर्जमाफीचा मुद्दा राज्य पातळीवर चर्चेत आला. बच्चू कडूंचे उपोषण सात दिवस चालले. त्यात १५ हून अधिक खासदार आणि सुमारे ५० आमदारांनी पाठिंबा दिला. विविध शेतकरी संघटनांसह तीनशेहून अधिक संस्था, संघटनांनी या आंदोलनाला समर्थन दिले. सरकारला लेखी आश्वासन द्यावे लागले. पण, आता मागण्यांची पूर्तता केव्हा होणार, हा चर्चेत आलेला प्रश्न आहे. त्‍यातच, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्‍कर जाधव यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन केले, त्‍यावर मुख्‍यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले. नंतर मनोज जरांगे यांचे काय झाले, त्‍यामुळे महायुतीचे हे सरकार बच्‍चू कडूंचे जरांगे पाटील करणार नाही, याची कोणीही शाश्‍वती देऊ शकत नाही, अशी भास्‍कर जाधव यांनी उपस्थित केलेली शंका देखील चर्चेत आली आहे.

सरकारतर्फे बच्‍चू कडू यांना लेखी आश्‍वासन देण्‍यात आले, पण, मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल तसेच थकित कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे आणि नवीन कर्जवाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. दिव्यांगाच्या मानधनवाढीबाबत ३० जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल आणि उर्वरित मुद्यांवर संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढण्यात येतील, असे लेखी आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. २५ पैकी २० मागण्या मान्य झाल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. आता पूर्ततेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडू यांची आंदोलक नेते म्हणून ओळख आहे. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. ते सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले, पण गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवाचे शल्य त्यांना आहे, म्हणूनच त्यांनी आंदोलन सुरू केले, अशी टीका जलसंपदा मंत्री यांनी केली होती. महायुतीच्या अनेक नेत्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनावर आक्षेप घेतला, पण बहुतांश नेत्यांनी सावध पवित्रा घेतला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट घेतली. अनेक मंत्र्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. आता पुढे काय होणार, याची प्रतीक्षा आहे.