मागील आठवड्यात ओडिशामध्ये बंगाली स्थलांतरितांना दिल्लीतील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्थलांतरितांबाबत म्हटले होते की, “२०११ च्या जनगणनेनुसार, बंगाली मातृभाषा असलेली व्यक्ती बांगलादेशची असू शकते.” बांगलादेशातून कागदपत्रांशिवाय स्थलांतरित होण्याच्या मुद्द्यावर भाजपा बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी निवडणुका तोंडावर आल्यामुळे ममता सरकार या मुद्द्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करत आहे. मात्र, दुसरीकडे ममता बॅनर्जी सरकार यावर प्रतिवाद करताना दिसत आहे. ओडिशा, दिल्ली आणि आसामसारख्या इतर राज्यांमध्ये बंगाली स्थलांतरित कामगारांसोबत गैरवर्तनाचा मुद्दा तृणमूल काँग्रेस उपस्थित करत आहे. एकंदर आगामी पश्चिम बंगाल निवडणुकांसाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेस स्थलांतरितांच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसची स्थलांतरितांसाठी रणनीति
बुधवारी ममता बॅनर्जी स्थलांतरित कामगारांच्या अपमानाविरोधात कोलकाता इथे एका रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. तृणमूल काँग्रेसचा असा विश्वास आहे की, ही रणनीति पुन्हा एकदा मतदारांवर असे बिंबवण्यास मदत करेल की भाजपा हा बाहेरच्या लोकांचा पक्ष आहे. हा असा पक्ष आहे, ज्यांना बंगाली स्थलांतरितांचे हित बघवत नाही आणि बांगलादेशातून कागदपत्रांविना येणाऱ्यांबाबत भीती निर्माण करून राजकीय वातावरणाचे ध्रुवीकरण करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. “या मोहिमेमुळे भाजपा बंगालीविरोधी आहे आणि बंगालवर राज्य करू शकत नाही, केवळ हाच संदेश नाही तर स्थलांतरित कामगारांनाही भाजपाविरोधी संदेश जातो. आमच्या राज्यात किमान ५० लाख स्थलांतरित आहेत आणि त्यापैकी बहुतेक अल्पसंख्याक समुदायातील आहेत. आमची मोहीम त्यांना असा संदेश देईल की, फक्त तृणमूल काँग्रेसच त्यांच्या भल्यासाठी उभी आहे”, असे तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
इतर राज्यांमध्ये बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अन्यायानंतर ही मोहीम वेगाने सुरू झाली आहे. ११ जुलै रोजी हद्दपार मोहीम राबवणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २०११ च्या जनगणनेत बंगाली भाषा मातृभाषा म्हणून ओळखणारे लोक बांगलादेशचे असू शकतात असं म्हणत वाद निर्माण केला. “आसाममध्ये राज्य आणि अधिकृत दोन्ही आसामी ही कायमची भाषा आहे. असं असताना जर त्यांनी जनगणनेत बंगाली लिहिले तर ते राज्यातील परदेशी कामगारांमध्ये गणले जातील”, असे शर्मा यांनी गुवाहाटी इथे पत्रकारांसमोर म्हटले होते.
काही दिवसांपूर्वी ७ जुलै रोजी ओडिशा पोलिसांनी झारसगुडा जिल्ह्यातील ४४४ स्थलांतरित कामगारांना बांगलादेशी नागरिक असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. हे स्थलांतरित पश्चिम बंगालमधील नादिया, मुर्शिदाबाद, मालदा, पूर्वा मेदिनीपूर, बीरभूम, पूर्वा वर्धमान आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांतील होते. दुसऱ्या दिवशी ८ जुलै रोजी दिल्लीतील बंगाली बहुल जय हिंद कॉलनीमध्ये वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. वीज चोरीचे आरोप समोर आल्यानंतर मे महिन्यात दिवाणी न्यायालयाच्या निर्देशानुसार हे आदेश देण्यात आले. ममता बॅनर्जी आणि इतर तृणमूल नेतृत्वांनी या प्रत्येक घटनेविरोधात कडक भूमिका घेतली आहे. सरमा यांना लक्ष्य करत बंगालमधील सत्ताधारी पक्षाने एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हा द्वेष येतो कुठून, बंगाली लोकांबद्दल हा तिरस्कार का, बंगालच्या लोकांनी भाजपाचा अपमान केला आणि त्यांना नाकारले म्हणून हा द्वेष आहे का? जर तुम्ही अशाप्रकारे द्वेष, कट्टरता आणि झेनोफोबियाद्वारे बंगाल काबीज करण्याचा विचार करत असाल तर आम्हाला तुमची दया येते. बंगालचे लोक तुम्हाला पुन्हा नाकारणार नाहीत, तर ते आणखी मोठ्या प्रमाणात तुमचे विरोधक ठरतील हे लक्षात ठेवा.”
दिल्लीतील घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “बंगाली बोलल्याने कोणी बांगलादेशी होत नाही. पश्चिम बंगालमधील बंगालींना वंचित ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्यानंतर भाजपा आता त्यांचा बंगालीविरोधी अजेंडा देशाच्या इतर भागात धोरणात्मक आणि पद्धतशीरपणे चालवत आहे.”
सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार सागरिका घोष यांनी या विरोधात निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसच्या कृष्णनगरच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही ओडिशा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले आहे. घोष म्हणाल्या की, “नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल (बीजेडी) सरकारच्या २३ वर्षांच्या कार्यकाळात अशा घटना कधीच घडल्या नव्हत्या, भाजपा ओडिशामध्ये सत्तेत आल्यापासून हे होत आहे.” मोइत्रा यांनी म्हटले की, “ओडिशाच्या पर्यटन उत्पन्नापैकी पन्नास टक्के महसूल बंगाली पर्यटकांकडून येतो. तेच तुमच्या हॉटेलमध्ये राहतात, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जेवतात, तुमच्या तीर्थस्थळांना भेट देतात. जर बंगाली पर्यटकांनी ओडिशाला जाणे बंद केले तर काय होईल?”
महत्त्वाचे मुद्दे:
- हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानावर तृणमूल काँग्रेस संतापली
- आसामचे मुख्यमंत्री बंगालविरोधी आहेत असा तृणमूल काँग्रेसचा आरोप
- बंगाल सीमा, आसाम सीमा किंवा त्रिपुरा सीमेवरून मोठ्या संख्येने बांगलादेशी भारतात घुसल्याचा भाजपाचा आरोप
- केवळ मतदानासाठी बंगाली भाषिक बंगालमध्ये येत असल्याचा आरोप
भाजपाची प्रतिक्रिया काय?
या मुद्द्यावर तृणमूल काँग्रेसने आपल्या नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्रित केले आहे, त्यामुळे राज्य भाजपाने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बंगाल भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी आरोप केला की, ओडिशा प्रकरणात ताब्यात घेतलेल्या ४४४ पैकी ३३५ जणांकडे तृणमूल काँग्रेसने जारी केलेली बनावट कागदपत्रे होती.
“तृणमूल काँग्रेस भारतात बांगलादेशी घुसखोरांना प्रोत्साहन देत आहे. हे घुसखोर इतर राज्यांमध्ये काम करतात, मात्र फक्त ममता बॅनर्जींना मतदान करण्यासाठी बंगालमध्ये परततात. बंगालने जारी केलेली बनावट कागदपत्रे असलेले कामगार किंवा कर्मचारी नियुक्त करताना प्रत्येक राज्याने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. हा केवळ लोकसंख्येच्या दृष्टीनेच धोका नाही, तर तो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे”, असे भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर देताना तृणमूल काँग्रेसने एक्सवर लिहिले की, “भाजपाचा एक भाग चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम राबवत आहे. जर ते बांगलादेशी असतील तर ओडिशा सरकारने कागदोपत्री पुरावे सादर करावेत,” केवळ बंगाली बोलतो म्हणून संपूर्ण समुदायाला गुन्हेगार ठरवणे थांबवण्याचे आवाहन तृणमूलने केले.
गेल्या शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील स्थलांतरित कामगारांना दिल्लीत ताब्यात घेऊन बांगलादेशात पाठवल्याच्या आरोपांबाबत सविस्तर अहवाल मागितला. “पश्चिम बंगालमधील कामगारांना दिल्लीतून ताब्यात घेऊन बांगलादेशात पाठवण्यात आले आहे का?” असा प्रश्न न्यायालयाने विचारला. मुख्य सचिव मनोज पंत यांना दिल्लीतील त्यांच्या समकक्षांशी संपर्क साधून या प्रकरणाचा व्यापक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी दिल्लीतील रोहिणी पोलिसांनी सहा बंगाली भाषिक लोकांना ताब्यात घेतले आणि एन काटजू पोलिस ठाण्यात नेले. शनिवारी तृणमूल काँग्रेसने एक्सवर लिहिले की, “भाजपा आमच्या लोकांचा सन्मान, अधिकार आणि निवारा हिरावून घेण्याच्या मोहिमेवर आहे आणि जर भाजपा २०२६ मध्ये सत्तेत आले तर या लोकांना राज्यहीन करेल.”