Congress Victory BJP Loss Election : लोकसभा व त्यापाठोपाठ काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपलं लक्ष बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही भाजपाने जोरदार तयारी केली आहे. मात्र, त्याआधी बालेकिल्ल्यातच भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. १७ ऑगस्ट रोजी झालेल्या कडबा (जि. दक्षिण कन्नड, कर्नाटक) नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. ग्रामपंचायतीवरून नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत १३ पैकी तब्बल आठ जागा जिंकल्या आहेत, तर भाजपाला केवळ पाच जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. या विजयामुळे नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिकेवर काँग्रेसनं एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. कडबा हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महत्त्वाचं कृषी व व्यापारी केंद्र मानलं जातं, त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या विजयातून काँग्रेसने दक्षिण कर्नाटकमध्ये आपली पकड अधिकच मजबूत केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात भाजपाचं वर्चस्व राहिलेलं आहे.

काँग्रेसला कसं मिळालं निवडणुकीत यश?

आतापर्यंत कडबा तालुक्यातील प्रशासन ग्रामपंचायतीमार्फत चालत होते. मात्र, नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने नव्या जबाबदाऱ्या व मतदारांच्या अपेक्षा अधिक वाढल्या. ही निवडणूक चुरशीची झाली, पण काँग्रेसने स्थानिक एकजूट आणि मतदारांना दिलेल्या आश्वासनांच्या बळावर विजय मिळवला. काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक नेत्यांचा सक्रिय सहभाग व नागरिकांशी असलेला सततचा संपर्क हे विजयाचे प्रमुख कारण ठरले. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, कडबाच्या निवडणुकीत ‘विकास’ हा निर्णायक मुद्दा ठरला. पायाभूत सुविधा सुधाराव्यात अशी नागरिकांची अपेक्षा होती आणि काँग्रेसच्या विकासदृष्टिकोनाला मतदारांनी पसंती दिली.

आणखी वाचा : राहुल गांधींच्या ‘त्या’ निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट? अनेकांचे तडकाफडकी राजीनामे; कारण काय?

भाजपाच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये उत्साह

चांगले रस्ते, विश्वासार्ह पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थेत सुधारणा आणि उत्तम नागरी सुविधा अशा आश्वासनांमुळे मतदार प्रभावित झाले. विशेषतः राज्य सरकारने राबवलेल्या योजनांचा लाभ आणि विकास कार्यक्रमांनी मतदार काँग्रेसकडे वळाले. कडबा नगरपंचायतीच्या निकालामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी हा विजय मोठ्या आत्मविश्वासाचा पुरवठा ठरल्याचे सांगत जल्लोष केला. कर्नाटकमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेससाठी हा निकाल मोठा बूस्टर ठरला आहे. त्याचबरोबर किनारी मतदारसंघातील भाजपाचा गड खिळखिळा करण्याच्या काँग्रेसच्या दीर्घकालीन रणनीतीत हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.

कडबा नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत १३ पैकी तब्बल आठ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाला केवळ पाच जागांवरच समाधान मानावं लागलं

२०१९ मध्ये झालं होतं ‘ऑपरेशन लोटस’

कर्नाटक विधानसभेचे एकूण संख्याबळ २२४ इतके आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवत कर्नाटकमध्ये १०४ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस-जेडीएस युतीचे ११५ आमदार निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसनं जेडीएसच्या मदतीनं राज्यात सत्तास्थापना केली. मात्र, २०१९ साली भाजपाने ऑपरेशन लोटस करून दोन्ही पक्षांचे १७ आमदार फोडले. या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन जेडीएस-काँग्रेसचे सरकार गडगडले. बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या काही आमदारांना भाजपाने मंत्रिपद देऊ केले, काहींना दिल्लीत पाठवले, तरी काहींचे तिकीट नंतर कापण्यात आले.

हेही वाचा : केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयात कलगीतुरा; एकमेकांना दिले संविधानाचे दाखले, प्रकरण काय?

काँग्रेसची २०२३ मध्ये काँग्रेसची बहुमतात सत्ता

२०१९ मध्ये कर्नाटकची सत्ता गमावणाऱ्या काँग्रेसनं २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसनं २२४ पैकी तब्बल १३५ जागा जिंकून बहुमत मिळवलं, तर भाजपाला केवळ ६६ जागाच जिंकता आल्या. यातील ११ जागा भाजपाने दक्षिण कर्नाटकमध्ये जिंकल्या होत्या. हा भाग भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या बालेकिल्ल्यातच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवून भाजपाला पराभवाचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपाने पाच जागांवर विजय मिळवला असला तरी ते बहुमतापासून दूर राहिले आहेत, त्यामुळे या भागातील आपला प्रभाव टिकवण्याची संधी भाजपाच्या हातातून गेली आहे.

दक्षिण कन्नड हा भाजपाचा बालेकिल्ला

दक्षिण कन्नड जिल्ह्यात आपले वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रचार केला होता; पण काँग्रेसच्या ‘एकजूट धोरणा’समोर त्यांची रणनीती फोल ठरली. हा निकाल भाजपासाठी किनारी भागातला धोक्याचा इशारा आहे, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. या प्रदेशात भाजपाला नेहमीच कार्यकर्त्यांचा भक्कम आधार आणि वैचारिक पाठबळ मिळालेले आहे. आता काँग्रेसकडे कडबा नगरपंचायतीचे नेतृत्व आल्याने नागरिकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. या भागात लवकरच विकासकामे सुरू करण्यात येतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील, असं आश्वासन काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं दिलं आहे.