भगवान मंडलिक

डोंबिवली : भाजपच्या ताब्यात नसलेल्या पण पक्षाला अनुकूल असलेल्या व शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला असलेला कल्याण लोकसभा मतदार संघांत कमळ फुलविण्याचा पुनरुच्चार भाजपने केला. या नियोजनाचा एक भाग म्हणून ११ ते १३ कालावधीत भाजप नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कल्याण-डोंबिवली शहरांच्या दौऱ्यावर येणार आहेत.

या मतदार संघात कोणत्या पक्षाचा खासदार आहे, याचा विचार न करता त्या लोकसभा मतदार संघात आतापासून काम सुरू करून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निवडून जाईल, या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. कल्याण लोकसभेचा यात समावेश आहे, असे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत.त्यामुळे या मतदारसंघात भाजपला सहज शिरकाव करता येईल का, या प्रश्नावर केळकर म्हणाले, बिगर भाजप मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे याचा विचार न करता हे नियोजन भाजपने केले आहे. जेव्हा असे पक्षीय प्रश्न निर्माण होतील. तेव्हा दोन्ही पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या पातळीवर याविषयी बोलतील.

हेही वाचा… मावळात आजी-माजी आमदारांत वर्चस्वाचे राजकारण, राज्यातील सत्तांतरानंतर मावळातील राजकीय गणितेही बदलली

या नियोजनाचा एक भाग म्हणून ११ ते १३ कालावधीत भाजप नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कल्याण-डोंबिवली शहरांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कल्याण लोकसभा मतदार संघातील पाच विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी पक्ष बांधणीच्या दृष्टीने बैठका घेणार आहेत.

हेही वाचा… चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ‘भाऊ’ की ‘भैय्या’? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर चर्चेला उधाण

दोन महिन्यांपूर्वी कळवा येथे झालेल्या एका भाजप मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलेल असे विधान करून खळबळ उडून दिली होती. या मतदार संघातील भाजपचा उमेदवार हा विरोधकांनाही रुचेल असा असेल अशी पुडी सोडून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संभ्रमाचे वातावरण निर्माण केले होते. खासदार शिंदे सहजासहजी कल्याण लोकसभा सोडतील का याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.