BJP National President Election : देशातील सर्वात मोठी पार्टी म्हणून उदयास आलेल्या भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा कार्यकाळ समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याचीच उत्सुकता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच राजकीय नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना आहे. भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड १४ मार्च रोजी होळीनंतर केली जाऊ शकते, अशा अटकळी यापूर्वी बांधल्या जात होत्या. मात्र, आता अध्यक्षपदाची निवडणूक आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या महत्वपूर्ण पदाच्या निवडीसाठी पक्षाकडून विलंब का होत आहे, असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. यामागे काही महत्वाची कारणं समोर आली आहे.

नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी विलंब का होतोय?

भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडण्याचं एक प्रमुख कारण हे पक्षाचे संविधान आहे. भाजपाच्या संविधानानुसार, राष्ट्रीय अध्यक्षांची निवड तेव्हाच शक्य आहे, जेव्हा किमान ५० टक्के राज्यांमधील पक्षाच्या संघटनात्मक निवडणूक पूर्ण झालेल्या असतील. हे निकष पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या १८ पैकी १३ राज्यांमध्ये भाजपाने संघटनात्मक निवडणुका घेतल्या आहेत. सध्या याठिकाणची मतमोजणी सुरू असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा १४ मार्च (होळी) नंतर केली जाऊ शकते. मात्र, उर्वरित राज्यातील संघटनात्मक निवडणुका होणे बाकी असल्याने राष्ट्रीय अध्यक्षांची नियुक्ती आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : विधान परिषदेतील बावनकुळे, दटकेंच्या रिक्त जागेवर भाजप कोणाला संधी देणार ?

कोणकोणत्या राज्यातील संघटनात्मक निवडणूका पूर्ण?

भाजपाने चंदीगड, गोवा, लडाख आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये संघटनात्मक निवडणुका यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. याशिवाय अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, आसाम आणि मेघालय यासारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपाकडून संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या आहेत. तर जम्मू-काश्मीर, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. अलिकडेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या दबावानंतर पक्षातील नेत्यांनी बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदी दिलीप कुमार जयस्वाल यांची एकमताने निवड केली. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष नेतृत्व ज्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत होते, त्यापैकी बिहार हे पहिले राज्य होते.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत काय?

आगामी काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे राज्याच्या प्रदेशाध्यपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात यावी, असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार, दिलीप कुमार जयस्वाल यांच्या खांद्यावर आगामी निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, “दिल्लीतील नेत्यांसाठी प्रत्येक राज्य सारखेच आहे. परंतु, उत्तर प्रदेष, बिहार आणि मध्य प्रदेश संघटनात्मक निवडणुकांची जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडणार याकडे हायकमांडचे विशेष लक्ष होते, असं भाजपाच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

वेळेत ५० टक्के राज्यांमधील संघटनात्मक निवडणूक पूर्ण न करणे ही चिंतेची बाब नसली तरी, पश्चिम बंगालसारख्या महत्वाच्या हिंदी भाषिक राज्यांशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक घेणे शक्य नाही, असंही सूत्राने सांगितले. येत्या काही दिवसांत या राज्यातील संघटनात्मक निवडणुका घेण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. त्यानंतर मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाईल, अशी माहितीही भाजपाच्या सूत्राने दिली.

राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी इतका उशीर का?

भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला विलंब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, उत्तर प्रदेशात पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणं अद्याप बाकी आहे. राज्यातील सर्वच नेते आणि पदाधिकारी आतापर्यंत कुंभमेळ्याच्या आयोजनात व्यस्त होते. ज्यामुळे तेथील संघटनात्मक निवडणुका लांबणीवर पडल्या. सरकारी आकडेवारीनुसार, २०२५ च्या महाकुंभात जगभरातील ६६ कोटी भाविकांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रयागराजवर लक्ष ठेवून होते. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्यासह बहुतेक वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी ते स्वत: उपस्थित होते.

बिहारमध्ये संघटनात्मक निवडणुकांना उशीर का झाला?

भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे संघटनात्मक निवडणुका लांबणीवर पडल्या. त्याआधी माजी मंत्री दिलीप जयस्वाल यांनी नितीश यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप जयस्वाल यांनी पूर्णपणे पक्षाच्या संघटनेवर लक्ष केंद्रित करावं, अशी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. दरम्यान, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच आगामी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील, असं स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर भाजपाच्या बिहारमधील संघटनात्मक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा : आसाम विधानसभेपर्यंत पोहचलेला “मियाँ” वाद नेमका काय आहे? भाजपाने दिला सर्वोच्च न्यायालयाचा दाखला

बंगालमधील संघटनात्मक निवडणुकीला विलंब का झाला?

उत्तर प्रदेश आणि बिहारपाठोपाठ भाजपाच्या बिहारमधील संघटनात्मक निवडणुकादेखील लांबणीवर पडल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे, राज्यात भाजपाने मोठ्या प्रमाणावर सदस्यता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राज्याच्या नवीन प्रदेशाध्यपदाबाबतही स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलं आहे. बंगालमधील सध्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात बढती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याजागी आपल्या नावांचा विचार व्हायला हवा, यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्लीवारी सुरू केली आहे. बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी राजधानीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिल्ली निवडणुकीमुळे विलंब झाल्याची चर्चा

तब्बल २७ वर्षानंतर भाजपाने दिल्लीत बहुमताचे सत्तास्थापन करून आम आदमी पार्टीला सत्तेतून बाहेर काढलं. या निवडणुकीत आक्रमक प्रचार करणे आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे, हा भाजपाचा अजेंडा होता. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मंत्री तसेच दिग्गज नेते राजधानीत तळ ठोकून होते. ज्यामुळे जानेवारीत घेण्यात येणाऱ्या पक्षाच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार?

भाजपाच्या एका सूत्रानुसार, राज्यांना १४ मार्चपर्यंत त्यांच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २१ मार्चपासून बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची बैठक सुरू होणार आहे. या बैठकीपूर्वी भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो, असं भाजपातील एका नेत्याने सांगितलं आहे. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री मनोहर लाल खट्टर तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नावं राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.