BJP Bihar strategy भारतीय जनता पक्षाने (भाजपा) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा ऑक्टोबरमध्ये जाहीर केल्या जातील, अशी माहिती आहे. तत्पूर्वी बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांची घेतलेली भेट, हे २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचा नवीन मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.
त्यामुळे विशेषत: शाहाबाद व मगध भागातील प्रभावशाली कुशवाह व राजपूत समुदाय पुन्हा एकदा ‘एनडीए’च्या छावणीत परत येतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत या भागांमध्ये एनडीएचा प्रभाव कमी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे ‘ऑपरेशन शाहाबाद’ काय आहे? आगामी निवडणुकीतील भाजपाची रणनीती काय असेल? त्याविषयी जाणून घेऊयात…
भाजपाचा बालेकिल्ल्यात पराभव
शाहाबादमध्ये भोजपूर, बक्सर, रोहतास व कैमूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा एकेकाळी एनडीएचा बालेकिल्ला होता; पण आता तेथील भाजपाचा प्रभाव पूर्णपणे कमी झाला आहे. मागील दोन मोठ्या निवडणुकांमध्ये एनडीएला इथे मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शाहाबादमधील २२ जागांपैकी एनडीएला फक्त दोन जागा जिंकता आल्या आणि त्या दोन्ही जागा भाजपा नेत्यांनी जिंकल्या. जेडीयू आणि इतर मित्रपक्षांना इथे एकही जागा जिंकता आली नाही. शेजारच्या मगध जिल्ह्यातही चित्र निराशाजनक होते. कारण- तिथेही एनडीएला खाते उघडता आले नाही. मगधमध्ये अरवल, जेहानाबाद, औरंगाबाद व नवादा या मतदारसंघांचा समावेश आहे.
२०२४ लोकसभा निवडणुकीत राजपूत आणि कुशवाह मतांमध्ये झालेल्या विभाजनामुळे एनडीएने शाहाबादमधील चारही जागा (आरा, बक्सर, सासाराम व काराकाट) गमावल्या. काराकाटमध्ये पवन सिंह यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यामुळे उपेंद्र कुशवाह यांचा पराभव झाला. आरामध्ये केंद्रीय मंत्री आरके सिंह यांचा पराभव झाला. मगधच्या जेहानाबाद व औरंगाबादमध्येही आरजेडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. या खराब कामगिरीमुळे बिहारमधील एनडीएची लोकसभेतील जागांची संख्या २०१९ मधील ३९ ते ४० वरून २०२४ मध्ये फक्त ३० वर आली.
२०२४ च्या निवडणुकीत आरजेडीची रणनीती
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना २०२४ च्या निवडणुकांमध्ये संधी दिसली आणि त्यांनी कुशवाह समाजाच्या सात उमेदवारांना तिकिटे दिली. बिहारच्या लोकसंख्येपैकी सहा टक्क्यांहून अधिक असलेल्या कुशवाह समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी निवडणुकीत ‘MYK’हा फार्म्युला अवलंबला होता. त्यात पारंपरिक मुस्लीम-यादव (MY) आणि कुशवाह (K) यांचा समावेश होता. याच गटाकडे आरजेडीने विशेष लक्ष दिले. हा प्रयोग अंशतः यशस्वी झाला. फक्त दोन कुशवाह उमेदवार जिंकले; मात्र कुशवाह समुदायाचे एनडीएपासून दूर जाणे हे शाहाबाद आणि मगधमधील एनडीएच्या पराभवाचे कारण ठरले.
भाजपाचे ‘ऑपरेशन शाहाबाद’
२०२४ मध्ये एनडीएविरुद्ध झालेल्या ‘क्लीन स्वीप’मुळे भाजपाला पुन्हा विचार करण्यास भाग पाडले. पक्षाने हा प्रदेश परत मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन शाहाबाद’ ही मोहीम सुरू केली आहे. त्च्याया अंतर्गत नेत्यांना पक्षात आणण्यात आले, उपेंद्र कुशवाह यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले, जेडीयूने स्थानिक बाहुबली नेते भगवान सिंह कुशवाह यांना विधान परिषदेचे सदस्य (MLC) केले. पक्षाच्या रचनेतही बदल करण्यात आला.
भाजपाने शाहाबादमधील १०५ नेत्यांना आपल्या राज्य कार्यकारिणीत स्थान दिले. त्यावरून या प्रदेशाला सक्षम करण्याची पक्षाची इच्छाशक्ती दिसून येते. ज्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला किंवा ज्यांनी बंडखोरी केली होती, त्यांना पक्षात पदे देण्यात आली, जसे की शिवेश राम महासचिव झाले आणि राजेंद्र सिंह यांना उपाध्यक्ष करण्यात आले.
रितुराज सिन्हा यांच्याकडे मोठी जबाबदारी
सप्टेंबरमध्ये भाजपाने बिहारला पाच निवडणूक क्षेत्रांमध्ये विभागले आणि शाहाबाद-मगधची जबाबदारी तरुण रणनीतिकार रितुराज सिन्हा यांच्याकडे सोपवली. अवघ्या पाच दिवसांत सिन्हा यांनी आपल्या रणनीतीचा वापर करीत पवन सिंह आणि उपेंद्र कुशवाह यांना एकाच बाजूला आणले. हे भाजपासाठी खूप महत्त्वाचे होते. कारण- २०२४ मध्ये पवन सिंह यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढल्यामुळे काराकाटमध्ये कुशवाह यांचा झालेला पराभव आणि आरामध्ये भाजपाचा पराभव यामागे हेच सर्वांत मोठे कारण मानले जात होते.
२०२५ च्या निवडणुकीसाठी याचे महत्त्व काय?
पवन सिंह आणि उपेंद्र कुशवाह एकत्र आल्यामुळे भाजपाला शाहाबाद आणि मगधमधील राजपूत आणि कुशवाह मतदारांना पुन्हा एकत्र आणण्याची आशा आहे, ज्यामुळे २०२० आणि २०२४ मधील नुकसान भरून निघू शकेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, ‘ऑपरेशन शाहाबाद’मुळे एनडीएच्या राजकीय भविष्यात मोठा बदल होऊ शकतो.