कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संघर्ष अधिक प्रखर होत चालला असून समरजित घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापुरात शरद पवार गटाने सरशी साधली आहे. जिल्ह्यातील अजित पवार गटाचे दोन मातब्बर नेतेही महाविकास आघाडीतील पक्षांशी संधान साधून आहेत. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेल्या घाटगे यांच्या पक्षांतराची झळ भाजपला बसली असली तरी, त्याचा मोठा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल मतदारसंघातील राजकारणाचा पोत आमूलाग्र बदलला आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळचे, एकनिष्ठ असलेले हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची साथ धरली. त्यानंतर अजित पवारांनीही कागल विधानसभेसाठी मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. तेव्हापासूनच मुश्रीफ यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता हेरून शरद पवार यांनी त्यांना आपल्या गोटात खेचून आणले. यातूनच सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये घाटगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असून तो जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरला आहे. घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने कागलमध्ये मेळावा घेऊन पवार यांनी मुश्रीफ यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मुश्रीफ यांच्याविरोधात घाटगे यांना उमेदवारी मिळणे निश्चित असून महाविकास आघाडीची मोठी ताकद त्यांच्यामागे असल्याने गतवेळेपेक्षा यंदा मुश्रीफ यांना तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. अन्य मतदारसंघांतही फायदा घाटगे हे भाजपातून महाविकास आघाडीत आल्याने आघाडी अंतर्गत राजकीय मैत्रीची समीकरणे भक्कम होणार आहेत. अनेक मतदारसंघात हे साटेलोटे एकमेकांच्या पथ्यावर पडणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवतील. या मतदारसंघा मतदारसंघातील अनेक गावे घाटगे यांच्या शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असतात. कागल उत्तर भागात पाटील यांचा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे घाटगे – पाटील या दोघांना एकमेकांची मदत पुरक ठरेल.

हेही वाचा : भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

कागल विधानसभा मतदारसंघात गडहिंग्लज तालुक्याचा बराचसा भाग आहे. गडहिंग्लज तालुक्यातील दोन्ही दिवंगत आमदारांच्या कन्यांच्या राजकीय प्रभावाचा फायदा घाटगे यांना होऊ शकतो. प्रदेश जनता दलाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या, माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी तसेच विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर यांची मदत घाटगे यांना महत्त्वाची ठरू शकेल.

हेही वाचा : Haryana Election: हरियाणामध्ये २०१९ नंतर भाजपाचे विजयी मताधिक्य घटले; यंदा काँग्रेस कडवी लढत देणार?

दोन पाटीलही मविआच्या वाटेवर

कागलला लागून असलेल्या राधानगरी या मतदारसंघात अजित पवार गटाबरोबर गेलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी आता परतीची वाट सुकर करून घेतली आहे. आपण अजित पवार गटात गेलोच नव्हतो, असे सांगत ते ठाकरे गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून लढू इच्छित आहेत. त्यांचे मेहुणे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रितसर काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत.