बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीवर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी जोरदार टीका केली आहे. केजरीवाल हे भारतीय राजकारणातले नटवरलाल आणि पिनाचिओ (कार्टून पात्र) असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल यांनी गतकाळात लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात केलेले ट्विट्स आपल्या पत्रकार परिषदेत पुनावाला यांनी दाखविले. “केजरीवाल यांनी आतापर्यंत अनेकवेळा वैचारीक यु-टर्न घेतलेला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी अण्णा हजारेंना पाठिंबा दिला होता. आता एकेकाळी ज्यांच्याविरोधात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे.”, असा आरोप शेहनाज पुनावाला यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा नेते शेहजाद पुनावाला पुढे म्हणाले, “तुम्ही (केजरीवाल) तेजस्वी यादव यांची भेट घेतली. लालू प्रसाद यादव यांचे नाव जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यात घेतले जात आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनी घेतल्या होत्या. हा आरोप आम्ही नाही तर तुमचाच सहयोगी पक्ष जनता दलाने (युनायटेड) लावला आहे. राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (यूनायटेड) यांची युती म्हणजे चुलत भ्रष्टाचारी भाऊ. लालू प्रसाद आणि त्यांच्या मुलाने रिव्हर्स रॉबिनहूडचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांनी गरीबांकडून चोरी करून श्रीमंतामध्ये वाटप केले. आता केजरीवाल लालू प्रसाद आणि त्यांच्या मुलाला कट्टर इमानदार असल्याचे प्रमाणपत्र देणार का? हेच प्रमाणपत्र त्यांनी सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना दिले होते.”

जमिनीच्या बदल्यात नोकरी या घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी लालू प्रसाद यादव यांची मुलगी चंदा यादव यांची चौकशी केली. तसेच बुधवारी लालू प्रसाद यांची मोठी मुलगी मिसा भारती आणि रागिणी यादव यांचीही चौकशी करण्यात आली होती. बुधवारीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात भेट झाली होती. काँग्रेस पक्ष जेडीयू आणि आरजेडी यांच्यासोबत लढणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. खर्गे म्हणाले की, आमची ऐतिहासिक अशी भेट झाली आहे. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली असून आगामी काळातील सर्व निवडणुका एकत्रित लढण्यासाठी देशातील सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खर्गे यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्यासोबत विरोधकांच्या एकजुटीबाबत चर्चा केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp spokesperson shehzad poonawala attack on arvind kejriwal meeting with nitish kumar and tejaswi yadav says natwarlal of indian politics kvg