चंद्रपूर : नगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत महायुतीत सहभागी घटक पक्ष शिवसेना शिंदे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तसेच काँग्रेससोबतच्या शिवसेना ठाकरे गट व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच फरफट होताना दिसत आहे. बहुसंख्य ठिकाणी भाजप ‘एकला चलो’च्या भूमिकेत आहे, तर काँग्रेसही मित्रपक्षांना दूर ठेवत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, गडचांदूर व घुग्घुस या दहा नगरपालिका तसेच भिसी नगर पंचायतसाठी निवडणूक होत आहे. राज्यात भाजप-शिवसेना शिंदे व अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे, तर काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे व शरद पवारांची राष्ट्रवादी, या तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. महायुती व आघाडीत भाजप व काँग्रेस हे मोठे पक्ष मित्रपक्षांना सोबत घेत नसल्याची ओरड स्थानिक कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे भाजप व काँग्रेससोबतच्या मित्रपक्षांची अक्षरश: फरफट होत आहे. जिल्ह्यात शिदे सेना, उद्धव सेना, राष्ट्रवादी अजित पवार तसेच राष्ट्रवादी शरद पवार, या चारही पक्षांची राजकीय ताकद कमी आहे.

ब्रह्मपुरीत काँग्रेसने अशाच पद्धतीने नगराध्यक्ष व नगरसेवकपदांचे उमेदवार निश्चित केले आहेत. भद्रावती नगरपालिकेत काँग्रेस ठाकरे गटाला नगराध्यक्षपद देण्यास तयार नाही. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनीही काँग्रेस विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला आहे. राजुरा येथेही काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी उद्धव सेना व शरद पवार गटाला सोबत घेण्याऐवजी माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या शेतकरी संघटनेसोबत युती केली. गडचांदूर येथेही काँग्रेसचे ‘एकला चलो रे’ हेच सूत्र आहे. मूल, वरोरा, भद्रावती, चिमूर नगरपालिकांत भाजप स्वबळावर लढण्याचा विचारात आहे. ब्रह्मपुरीतदेखील भाजपला मित्रपक्ष नको आहेत. काँग्रेसने तर काही ठिकाणी वंचित आघाडीसोबत युती केली, मात्र राज्यातील मित्रपक्षांना सोबत घेतले नाही. त्यामुळे मित्रपक्षांचे पदाधिकारी नाराज आहेत.

लहान पक्षांकडेही दुर्लक्ष

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आघाडीच्या गप्पा करीत असले तरी त्यांनाही स्थानिक पातळीवर मित्रपक्ष नको आहेत. भाजपलादेखील मित्रपक्षांची साथ नको आहे. मनसे, रिपाइंचे विविध गट, आम आदमी पक्ष, बसप यांची अवस्था यापेक्षा वाईट असून काँग्रेस व भाजपने त्यांच्याकडेही दुर्लक्ष केले आहे.