Chirag Paswan Hindi Marathi language dispute बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत चिराग पासवान यांनी बिहार निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेच्या वादावर आणि भाजपावर होणाऱ्या हिंदी सक्तीच्या आरोपांवरदेखील आपली भूमिका मांडली.
हिंदी-मराठी भाषा वाद
- महाराष्ट्रात सध्या हिंदी-मराठी भाषा वादाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरून राजकीय गोंधळ सुरु आहे.
- महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राची पहिलीपासून सक्ती करण्यात आल्यानंतर हिंदीविरोधात वाद पेटला आहे.
- शालेय शिक्षणात पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूच शिकवण्याला विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत विरोध केला.
- महायुती सरकारच्या निर्णयाला शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी या पक्षांनी विरोध दर्शविला आहे.
- तूर्तास शासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, असे असले तरीही भाषेवरून वाद सुरूच आहे.
प्रश्न : काही विरोधी पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी भाजपा हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोप केला आहे, त्यावर तुमचे काय मत आहे?
मला हे कळत नाही की हा वादाचा विषय का आहे. माझ्या मते आपल्या देशाचे हे सौंदर्य आहे की आपल्याकडे इतक्या भाषा आहेत. सर्व भाषांना एकत्र वाढण्याची समान संधी दिली पाहिजे. अडचण तेव्हा निर्माण होते, जेव्हा तुम्ही एका राज्यात राहणाऱ्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीला एकाच भाषेत बोलण्यास भाग पाडता. पण, ही सक्ती करण्याचे कारण काय? जर कोणी तुमच्या भाषेचा आदर करत असेल, तर तुम्हीदेखील त्यांच्या भाषेचा आदर केला पाहिजे. काहींना वाटते की, तुम्ही दुसऱ्या भारतीय भाषेत बोललात तर तुमची ओळख कमी होते. पण, तुम्ही विदेशी भाषेत बोलता तेव्हा त्यांना हरकत नाही. असे का हे मला माहीत नाही. प्रत्येक राज्याने सक्ती करायला सुरुवात केली तर हे चुकीचे ठरेल.
‘भारतीय’ ही एकच भाषा असावी – चिराग पासवान
भारतीय, ही एकच भाषा असावी असे ते म्हणाले. जर तुम्ही विदेशात प्रवास केलात तर तुम्हाला जाणवेल की त्यांना त्यांच्या मातृभाषेचा अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले. ती भाषा हिंदी असावी का, असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले, “नाही, फक्त हिंदीच का? ती तमिळ किंवा मराठी असू शकते. मला वाटते की, केंद्र सरकार लवकरच राज्यांशी संवाद त्यांच्या प्रादेशिक भाषेत होईल याची खात्री करणार आहे.”
बिहारमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा नसल्यास नितीश सरकार कारणीभूत?
बिहारमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा नसल्यास तुम्ही नितीश कुमार यांच्या सरकारला दोषी ठरवाल का? या प्रश्नावर चिराग पासवान म्हणाले, “सरकार अपयशी ठरले आहे, कारण तेथे डबल-इंजिन सरकार नव्हते. एनडीएच्या काळात उत्तर प्रदेशने चांगली कामगिरी केल्याचे आपण पाहिले आहे. माझ्या राज्याची विडंबना अशी आहे की, जवळजवळ २७ वर्षे केंद्रात आणि राज्यात वेगवेगळी सरकारे होती.” ते पुढे म्हणाले, “यूपीए सरकार केंद्रात असताना बिहारमध्ये एनडीएचे सरकार होते. २०१४ नंतर जेव्हा एनडीए केंद्रात सत्तेत होते, तेव्हा राज्यात महागठबंधन सरकार होते, त्यामुळे केंद्रीय योजना राज्य पातळीवर योग्यरित्या अमलात आणल्या गेल्या नाहीत आणि राज्यातील योजनांना केंद्रीय पाठिंबा मिळाला नाही. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आपण पाहिले आहे की, राज्य जलद विकासाच्या मार्गावर आहे. मोठ्या योजना राबविल्या जात आहेत. निवडणुकीनंतर आमचे पंतप्रधान सात वेळा राज्याला भेट देऊन आले आहेत आणि ते लवकरच पुन्हा भेट देतील,” असेही त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये एनडीए अजूनही नितीश यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका का लढवत आहे?
नितीश कुमार यांच्या आरोग्याच्या समस्या स्पष्ट असूनही एनडीएने दुसऱ्या नेत्याला संधी का दिली नाही आणि दोन दशकांच्यानंतरही त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका का लढवल्या जात आहे, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, नितीश कुमारजी कुठून आले आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. १९९० च्या दशकात बिहार कसा होता याची प्रत्येकाला कल्पना नाही. त्यांनी राज्याला अशा वाईट परिस्थितीतून बाहेर काढले आहे, जेव्हा लोकांना राज्य सोडण्यास भाग पाडले जात होते. सध्या त्यांच्यासारखीच व्यक्ती राज्याचे नेतृत्व करू शकतो. त्यांच्या आरोग्याबद्दलच्या चिंता केवळ विरोधी पक्षांनी निर्माण केल्या आहेत.