Congress Madhya Pradesh District Presidents : गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरच्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. हीच बाब लक्षात घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशात डबघाईला आलेल्या काँग्रेसला बळकटी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. याअंतर्गत माजी मंत्री, आमदार तसेच प्रभावी नेत्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या अनेक नेत्यांना मोठ्या राजकीय महत्वाकांक्षा असल्यानं पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला आहे, यामुळे पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली असून अनेकांनी धडाधड राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या महिन्यात राहुल गांधी भोपाळमध्ये आले होते. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मजबूत असावा असं त्यांनी सांगितलं होतं. आम्ही सर्वजण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचं स्वागत करतो, असं काँग्रेस नेते जयवर्धन सिंह यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. जयवर्धन सिंह हे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे पुत्र असून त्यांच्याकडे गुहा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शनिवारी रात्री काँग्रेसने हा फेरबदल केल्यानंतर अनेक ठिकाणी उशिरापर्यंत निदर्शने झाली. अनेक नेत्यांना ही नियुक्ती आपला राजकीय दर्जा कमी करणारी वाटली. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाराजी व्यक्त करताना म्हटलं, “जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या १५ लोकांनी कधीही या पदाची मागणी केली नव्हती. या निवडीसाठी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं का? सतना जिल्ह्यासारख्या ठिकाणी तर असे लोक निवडले आहेत, ज्यांची नावे स्थानिक नेत्यांनी पहिल्यांदाच ऐकली आहेत.”
जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांविरोधात अनेकांची नाराजी
सतना व्यतिरिक्त भोपाळ, इंदूर आणि उज्जैन ग्रामीणमध्येही या नियुक्तीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. याच पार्श्वभूमीवर काहींनी तडकाफडकी राजीनामेही दिले. बुरहानपूरमधील हेमंत पाटील यांनी पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिला, तर देवास ग्रामीणमध्ये पद न मिळाल्याने गौतम बंटू गुर्जर यांनी थेट काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. सतना येथे तर युवक काँग्रेस अध्यक्षाने नव्या जिल्हाध्यक्षाचा मोबाईल क्रमांकच विचारत उपरोधिक टीका केली. दिंडोरीमध्ये सर्वात तीव्र विरोध दिसून आला. स्थानिक काँग्रेस नेते अजय साहू यांनी पुतळे जाळण्याची घोषणा केली आणि नव्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती ही सर्वात वाईट रचना असल्याचं म्हटलं. उज्जैनमधील वरिष्ठ नेत्यांनीही नेतृत्वाच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली.
आणखी वाचा : संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ नका; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा, प्रकरण काय?
जिल्हाध्यक्षपदी कुणाकुणाची नियुक्ती?
- नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांचा आढावा घेतल्यास काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी पक्षात संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं.
- जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या ७१ जणांमध्ये- तीन माजी मंत्री, सहा विद्यमान आमदार व ११ माजी आमदार आहेत.
- याशिवाय चार महिलांना पहिल्यांदाच जिल्हाध्यक्षपद मिळालं आहे. तसेच राखीव प्रवर्गातील एकूण ३७ जणांना संधी देण्यात आली आहे.
- काँग्रेसचे १२ जिल्हाध्यक्ष ओबीसी, १० अनुसूचित जमाती, आठ अनुसूचित जाती, चार महिला आणि तीन अल्पसंख्याक समाजातील आहेत.
- माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या १० समर्थकांना जिल्हाध्यक्षपदे मिळवून दिली आहे. यामध्ये छिंदवाडा, जबलपूर आणि रेव्हा ग्रामीण भागाचा समावेश आहे.
- दिग्विजय सिंह यांच्या गटाला राजगढसह पाच महत्त्वाची जिल्हाध्यक्षपदे मिळाली आहेत. (राजगढमध्ये त्यांचा भाचा प्रियांवरत पदभार घेणार आहे).
- जीतू पटवारी यांच्या समर्थकांनी भोपाळ आणि इंदोरसह पाच शहरी केंद्रांवर आपली पकड कायम राखली आहे.
- जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांवरून निर्माण झालेल्या वादाबाबत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भूपेंद्र गुप्ता म्हणाले की, पक्षाला अशा नेत्यांची गरज आहे, जे भाजपाच्या प्रभावाला थेट टक्कर देऊ शकतील.
- थोडेफार तणाव नेहमीच असतात, पण हे काही नवीन नाही. तिकीटवाटप असो वा संघटनात्मक नियुक्त्या, राजीनाम्याचे असे प्रकार नेहमीच घडतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं
काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर
दरम्यान, काँग्रेसने आपल्या विद्यमान आमदारांच्याही जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने आमदारांना आपापल्या मतदारसंघातील कामकाजाकडे योग्य लक्ष देता येणार नाही, अशी चिंता काँग्रेसच्या एका नेत्यानं व्यक्त केली आहे. “जर आमदारच जिल्हा संघटनेची जबाबदारी सांभाळणार असतील, तर ते आपल्या विधिमंडळातील जबाबदाऱ्या कशा पार पाडणार?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसमधील एक प्रमुख आदिवासी चेहरा व दिंडोरीचे आमदार ओमकार सिंह मरकाम यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली, याबाबत तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न त्यांना द इंडियन एक्स्प्रेसनं विचारला. त्यावर उत्तर देताना, “पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती मी नक्की पार पाडेन. केंद्रीय नेतृत्वाने जे काही ठरवलं आहे, त्याचं आम्ही पालन करू”, असं मरकाम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : राधाकृष्णन यांच्या रुपात भाजपाचे दक्षिणायन? RSSचे कार्यकर्ते ते उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार
डझनभर जिल्हाध्यक्ष भाजपाच्या संपर्कात?
आपल्या समर्थकांनी या नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे का, असे विचारले असता मरकाम म्हणाले, “माझे समर्थक स्वतंत्र आहेत आणि त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, मी स्वतः वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या सूचनांनुसारच वागेन.” दरम्यान, काँग्रेसच्या मनोबलाला सर्वाधिक धक्का देणारी बाब म्हणजे नव्या जिल्हाध्यक्षांपैकी काही नेत्यांचे सत्ताधारी भाजपासोबत अनौपचारिक संबंध असल्याचा आरोप होत आहे. “जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या डझनभराहून अधिक नेते भाजपाच्या संपर्कातील आहे, असा दावा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं केला आहे. भाजपाबरोबर कोणताही संबंध नसलेल्या नेत्यांचीच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती व्हायला हवी होती, असंही ते म्हणाले.