Ajit Pawar meat ban stance स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील महापालिकांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. १५ ऑगस्टला मांसविक्री बंदीचा निर्णय काही महापालिकांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांची भूमिका भाजपापेक्षा वेगळी असून, त्यांनी मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
स्वघोषित गो-रक्षकांविरोधात महाराष्ट्रातील कुरेशी समाजाला पाठिंबा देण्यापासून ते काही महानगरपालिकांनी स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापर्यंत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धर्मनिरपेक्ष म्हणून दर्शवण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. त्यामागील कारण काय? अजित पवार यांनी भाजपापासून वेगळी भूमिका का घेतली आहे? महाराष्ट्रातील मांसविक्री बंदीचा मुद्दा कसा तापत आहे? जाणून घेऊयात…
मांसविक्री बंदीवर अजित पवारांची भूमिका
मांसविक्री बंदीवर अजित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा समतोल साधणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेस पक्षाबरोबर दीर्घकाळ संबंध असल्याने त्यांना पारंपरिकदृष्ट्या अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा आहे. मात्र, दुसरीकडे भाजपाने शाकाहाराची भूमिका अवलंबलेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या मराठा मतांनाही अडचणी येऊ शकतात. मात्र, अजित पवारांसाठी एक दिलासादायक गोष्ट अशी की, जनावरांची कायदेशीरपणे वाहतूक करत असताना गो-रक्षकांकडून होणाऱ्या छळाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कुरेशी समाजाची भेट घेतली. त्याच्या काही दिवसांनंतर, महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी एक परिपत्रक जारी केले. त्यानुसार केवळ पोलिस किंवा अधिकृत अधिकारीच अवैध गुरे वाहतुकीवर कारवाई करू शकतात. खासगी व्यक्तींना, व्यापाऱ्यांना थांबवण्याचा, तपासण्याचा किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले.
महायुती आघाडीच्या एकूण तीन मुस्लीम आमदारांपैकी दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. सुनील तटकरे यांच्यासारखे अजित पवारांचे अनेक महत्त्वाचे सहयोगी अशा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात, जिथे मुस्लीम मते निर्णायक ठरतात. अजित पवार सध्या जो समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत, तो त्यांच्या व्यावहारिक राजकारणाशी सुसंगत आहे. यामध्ये शरद पवारांचे मार्गदर्शन त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून मोठा विजय मिळवला, त्यानंतर अजित पवारांनी अल्पसंख्याक समुदायाच्या भीतीला शांत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. महाविकास आघाडीच्या विजयाच्या अंदाजाने मुस्लीम समाजाने त्यांना उघडपणे पाठिंबा दिला होता आणि महायुतीच्या राजवटीत दुर्लक्षित होण्याची भीती त्यांना वाटत होती.
अजित पवारांचा अल्पसंख्यांक समुदायाला संदेश
या वर्षाच्या सुरुवातीला अल्पसंख्याक समुदायाला थेट संदेश देताना पवार म्हणाले होते, “जोपर्यंत मी सरकारमध्ये आहे, तोपर्यंत कोणावरही अन्याय होणार नाही. मी माझ्या शब्दाचा पक्का माणूस आहे.” त्यांनी ‘अल्पसंख्याक समुदाय विश्वास संवर्धन बैठक’ (Minority Community Confidence Meeting) मध्येही भाषण दिले. त्यात ते म्हणाले, “काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी समुदायाच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला खात्री देतो की, आम्ही तुमच्याबरोबर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा पुरवणे ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे.”
या महिन्याच्या सुरुवातीला, स्वघोषित गो-रक्षकांच्या वाढत्या हिंसाचारामुळे राज्यभरात गुरांची विक्री बंद केल्यानंतर पवारांनी कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयाने या बैठकीची माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रेस रिलीजद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली. “या समाजातील व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही,” असे पवार शिष्टमंडळाला म्हणाले.
मांसविक्री बंदीवर अजित पवारांची भूमिका
आता अजित पवारांनी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकाने बंद करण्याच्या महानगरपालिकांच्या निर्णयावरही आक्षेप घेतला आहे. या आदेशामागील तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “मीदेखील एक बातमी टीव्हीवर पाहिली की, चिकन-मटणावर बंदी ज्याने घातली त्यांच्या कार्यालयांबाहेर जाऊन चिकन-मटण विक्री करणार वगैरे. मात्र, जेव्हा श्रद्धेचा प्रश्न असतो, तेव्हा अशा प्रकारची बंदी घातली जाते. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास आषाढी एकादशी किंवा महाशिवरात्र असेल किंवा महावीर जयंती असेल; पण स्वातंत्र्य दिन, देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे होत आहेत. कोकणात साधी भाजी करताना सुकट बोंबील करतात, तो त्यांचा आहार आहे. काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तरी तो त्यांचा वर्षानुवर्षे आहार आहे. मग एखाद्याच्या आहारावर अशा पद्धतीने बंदी घालणे योग्य नाही.”
अल्पसंख्याक समाजातील काही घटकांमध्ये पवारांच्या आश्वासनांवर अजूनही संभ्रम आहे. बॉम्बे उपनगर बीफ डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अली कुरेशी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते, “अजित पवारांच्या नियंत्रणाखाली असे मंत्रालय नाही, जे आमच्या व्यापाराचे नियमन करते. या मुद्द्यावर सरकार गंभीर आहे, हे मानण्यासाठी आम्हाला ठोस परिणामांची गरज आहे.” ते म्हणाले, जरी आता समाजाच्या समस्या दूर झाल्या असल्या, तरी पवारांच्या नाराजीनंतरही महानगरपालिकांनी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मागे घेतलेले नाहीत. या बंदीचे समर्थन करताना भाजपाने असा दावा केला आहे की, असे आदेश १९८८ पासून दिले जात आहेत.
पुण्यातील यवत परिसरात झालेल्या जातीय तणाव आणि हिंसाचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रक्षोभक विधानांना दोष दिला गेला. अशा नेत्यांना राष्ट्रवादीमध्ये मिळालेल्या स्पष्ट स्वातंत्र्यामुळेही त्यांच्या समर्थकांमध्ये भीती आहे. जगताप यांच्या विधानांवर त्यांच्याबरोबर एकाच मंचावर असताना पवार म्हणाले होते, “संग्राम कधी कधी भाषणात घसरतो, पण आता घसरू नका, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे.” जगताप यांना स्पष्टीकरण द्यायला सांगू असेही ते म्हणाले होते, मात्र त्यानंतर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झाली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी जगताप यांच्यासारखी विधाने पक्षासाठी त्रासदायक ठरतात हे मान्य केले. ते म्हणाले, “आम्ही नेहमीच आमच्या मुस्लीम बंधू-भगिनींसह सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. मी नेत्यांना विनंती करतो की अशी विधाने ताबडतोब थांबवावीत, अन्यथा आपले मुस्लीम समर्थक पक्षावरील विश्वास गमावतील.” एका मुस्लीम राष्ट्रवादी नेत्याने पवारांच्या भूमिकेशी सहानुभूती व्यक्त केली. ते म्हणाले, “हे कठीण दिवस आहेत. मुस्लीम मतदारांना आकर्षित करणे राजकीयदृष्ट्या धोकादायक आहे. पण, निदान पवार तरी अशी भूमिका घेत आहेत की त्यांना काळजी आहे. सत्ताधारी गटातील इतर कोणताही नेता अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न करत नाहीये,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर या नेत्याने सांगितले.