प्रल्हाद बोरसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सलग चारवेळा विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्याची किमया साधणे ही साधी गोष्ट नव्हे. सदैव लोकांमध्ये राहणे, कोणालाही सहजपणे भेट आणि मतदारसंघातील कोणत्याही सुख-दु:खाच्या प्रसंगी उपस्थिती, हे गणित जमवून मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांनी हे यश मिळविले आहे.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले भुसे यांचे वडील दगडू भुसे हे स्वातंत्र्यसैनिक होते. महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या बलाढ्य अशा हिरे घराण्यातील राष्ट्रवादीचे प्रशांत आणि भाजपचे प्रसाद या दोन हिऱ्यांना २००४ च्या निवडणुकीत भुसे यांनी पराभूत करुन पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला होता. मतदारसंघात निर्माण झालेल्या ‘हिरे हटाव’च्या लाटेवर स्वार होत शिवसेनेचे तत्कालीन तालुका प्रमुख असणाऱ्या भुसे यांनी अपक्ष निवडणूक लढवत हे यश मिळविले होते. निवडून गेल्यावर विधानसभेत सेनेचे सहयोगी सदस्य होणे त्यांनी पसंत केले. नंतर सेनेत सक्रिय झाल्यावर उत्तरोत्तर त्यांचे पक्षातील महत्व वाढत गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खास मर्जीतले असे स्थान मिळविण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर सेनेतर्फे लढविलेल्या सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा यशाचा आलेख चढता राहिला.

२०१४ मध्ये राज्यात भाजप-सेना युती सत्तेत आल्यावर भुसे यांना पाच वर्षे राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली. तेव्हा राज्यमंत्री म्हणून शासनाकडून मिळालेल्या लाल दिव्याच्या गाडीतून त्यांनी मतदार संघातील वेगवेगळ्या घटकांमधील पाच कार्यकर्त्यांना मालेगावच्या रस्त्यांवरुन सफर घडवून आणली आणि नंतर ती गाडी स्वतः वापरण्यास सुरुवात केली. ज्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे यश आणि पद मिळते, ते त्या कार्यकर्त्यांनाच समर्पित करण्याची भुसे यांची ही भावना सर्वांनाच भावली होती. अडीच वर्षापूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये भुसे यांच्यावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कृषी खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा सोपविली होती. या खात्याची जबाबदारी पेलताना शेतकऱ्याच्या बांधावर जाणारा मंत्री अशी ओळख त्यांनी निर्माण केली. ठाकरे घराण्याचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे भुसे हे एकनाथ शिंदे गटाच्या बंडात सामिल झाल्याचे कळल्यानंतर तालुक्यांतील बहुतेकांचा प्रारंभी त्यावर विश्वासच बसला नव्हता.

स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका मिळविल्यावर भुसे यांनी काही काळ राज्य सरकारच्या पाटबंधारे खात्यात नोकरी केली. नोकरीनिमित्त ठाणे येथे कार्यरत असताना शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात ते आले. दिघेंच्या समाजकारण आणि राजकारण करण्याच्या कार्यपध्दतीचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला. अशाच धाटणीतले काम आपण मालेगावात सुरु करावे, असा विचार काही दिवस त्यांच्या मनात घोळत राहिला. पुढे सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ‘जाणता राजा’ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मालेगावात समाजकार्य सुरू केले. २००१ मध्ये मालेगाव येथे झालेल्या दंगलीतील एका प्रकरणात त्यांना गोवण्यात आले होते. त्यावेळी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यानंतर हिंदूंचा रक्षक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. पुढे शिवसेनेत सक्रिय झाल्यावर थोड्याच दिवसात तालुकाप्रमुख पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. 

आनंद दिघे यांच्या संपर्कात आल्यावर एकनाथ शिंदे यांच्याशी भुसे यांचे मैत्रीचे सूर जुळले होते. दिघेंच्या या दोन्ही शिष्यांमधील मैत्री ठाकरे घराण्यावरच्या निष्ठेवरही भारी पडली. त्याची परिणती भुसेंनी शिंदेंच्या बंडात सहभागी होण्यात झाली. त्याचेच फळ म्हणून शिंदे गटाकडून पहिल्या यादीत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. 

५९ वर्षांचे भुसे यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. तळागाळातील जनतेशी त्यांची घट्ट नाळ जुळलेली आहे. अडचणीत सापडलेला सामान्यातला सामान्य माणूसही रात्री-पहाटे थेट संपर्क साधून आपली कैफियत मांडू शकतो, ही भुसेंची ओळख आहे. स्थापत्य अभियंता असणारे दोन्ही मुलगे अजिंक्य आणि अविष्कार हे भुसे यांचा बांधकाम व्यवसाय सांभाळतात. तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय आघाडी सांभाळण्यासही ते वडिलांना सहाय्य करीत असतात. पत्नी अनिता भुसे यादेखील समाजकार्यात अग्रभागी राहून भुसेंचा राजकीय मार्ग प्रशस्त करण्यास हातभार लावत असतात. शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही आहेत. एक अद्याप शिवसेनेचा कट्टर पाईक तर, एक शिंदे गटातील सैनिक. या नात्याचा दोघांच्याही पुढील राजकारणावर काही परिणाम होणार नाही, असेही नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada bhuse isthe name who like to be get involved in common people print politics news pkd
First published on: 09-08-2022 at 21:25 IST