मुंबई : विधानसभेत २० आमदार असलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करून हे पद लवकरात लवकर मिळावे, असे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. जवळपास चार दशकांपूर्वी २० आमदार असलेल्या जनता पक्षाला तसेच १३ आमदार असणाऱ्या शेकापला विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. यामुळेच शिवसेनेच्या पत्रावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेत एकूण सदस्यसंख्येच्या एक दशांश इतके खासदारांचे संख्याबळ विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असते. म्हणजेच ५५ खासदार असले तरच लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसचे संख्याबळ तेवढे नव्हते. यूपीए म्हणून काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर केलेला दावा लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला होता. महाराष्ट्र विधानसभेत एक दशांश संख्याबळाची अट नाही. तसे पत्रच विधिमंडळ सचिवालयाने शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांना पाठविले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विवक्षित नियम नाहीत आणि या पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा असतो. यामुळेच शिवसेनेने २० आमदार असतानाही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. या पत्रासोबत शिवसेनेने महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीचे (शरद पवार) पाठिंब्याचे पत्र जोडलेले नाही.

जनता पक्षाला तेव्हा विरोधी पक्षनेतेपद

१९८५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ५४ आमदार निवडून आलेल्या समाजवादी काँग्रेसचे शरद पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. १९८६ मध्ये शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले. पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्याच दिवशी म्हणजे १४ डिसेंबर १९८६ रोजी जनता पक्षाचे निहाल अहमद यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. तेव्हा जनता पक्षाचे २० आमदार होते. शिवसेनेनेही २० आमदार असतानाच विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. तेव्हा जनता पक्ष आणि शेकापने आलटून पालटून विरोधी पक्षनेतेपद वाटून घेतले होते. त्यानंतर शेकापचे दत्ता पाटील विरोधी पक्षनेते झाले. शेकापच्या आमदारांची संख्या तेव्हा १३ होती. परत वर्षभराने जनता पक्षाच्या मृणालताई गोरे यांची विरोधी पक्षनेतेरपदी निवड झाली. १९९० मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेवटचे पाच महिने शेकापचे दत्ता पाटील हे पुन्हा विरोधी पक्षनेते होते.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळाची विधानसभा नियमात तरतूद नसल्यानेच २० आमदार असलेल्या जनता पक्षाला तसेच १३ आमदारांच्या शेकापला विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याची संधी मिळाली होती. विरोधी पक्षात सर्वाधिक शिवसेनेचे २० आमदार असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला आहे. काँग्रेसचे १६ तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) १० आमदार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite only 20 mla in janata paksha leader of opposition post awarded by assembly speaker in 1986 print politics news sud 02