नागपूर : राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा रिंगणात असून त्यांच्याविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे पाटील मैदानात आहेत. भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीत भाजपचे संघटनात्मक पाठबळ ही या पक्षाची भक्कम बाजू असून पक्षांतर्गत मतभेद हे काँग्रेसचे दुखणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस विरुद्ध गुडधे पाटील यांच्यात यापूर्वी २०१४ मध्येही लढत झाली होती व त्यात फडणवीस विजयी ठरले. यंदा गुडधे पाटील परिवर्तनाचा नारा देत फडणवीसांच्या विरोधात रिंगणात आहेत. एक अभ्यासू नगरसेवक आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख गुडधे यांची या मतदारसंघात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूरमधून भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले. गडकरी यांना लोकसभा निवडणुुकीत दक्षिण-पश्चिममधून १ लाख १३ हजार ५०१ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना ७९ हजार मते मिळाली होती.

हेही वाचा >>>Constituencies In Yavatmal District : यवतमाळ जिल्ह्यात जातीय समीकरणेच ठरणार निर्णायक

मतदारसंघातील राजकीय स्थिती

● नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शहरातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत नवीन आहे. २००९ मध्ये पश्चिम आणि दक्षिण नागपूरमधील काही भाग मिळून दक्षिण-पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

● २००९ मध्ये फडणवीस यांनी कॉँग्रेसचे विकास ठाकरे यांचा २७ हजार मतांनी, २०१४ मध्ये कॉँग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांचा ५८ हजार मतांनी व २०१९ मध्ये कॉँग्रेसचे डॉ.आशीष देशमुख यांचा ४९ हजार मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी सुरुवातीच्या काळापासून फडणवीस यांचा मतदारसंघाशी संपर्क आहे. तेच धोरण त्यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री असतानाही कायम ठेवले.

हेही वाचा >>>अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

निर्णायक मुद्दे

● नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात चार लाखांहून अधिक मतदार आहेत. हा मतदारसंघ ओबीसीबहुल म्हणून ओळखला जातो. दलित मतदारांची संख्याही येथे फार मोठी आहे. ओबीसी वर्ग हा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काही मतदारसंघांत हा मतदार भाजपकडून दुरावल्याचे दिसून आले होते. पण या मतदारसंघात असे चित्र नाही.

● ही बाब फडणवीस यांनी हेरून त्यानंतर ओबीसी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्याचे निर्णय घेतले. त्यामुळे त्यांची ओबीसी मतदांरांवरची पकड अधिक घट्ट झाली. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचादेखील ओबीसी मतदार हाच आधार आहे. त्यामुळे दलित, आदिवासी मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बसपातर्फे सुरेंद्र डोंगरे तर वंचिततर्फे विनय भांगे रिंगणात आहेत.

लाडक्या बहिणींचा फायदा

दक्षिण-पश्चिमला उच्चशिक्षित वर्गाचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे इतर मतदारसंघाच्या तुलनेत जातीय समीकरणाचा निवडणुकीवर प्रभाव कमी जाणवतो, असे काहींचे मत आहे. विशेष बाब म्हणजे, दक्षिण-पश्चिममध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विजयी उमेदवार ठरवण्यात ‘लाडक्या बहिणीं’चेही महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis will contest from nagpur south west assembly constituency print politics news amy