Chief Minister Bihar बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एनडीएने बिहारमध्ये बहुमताचा आकडा सहज पार केला असून त्यांनी २०० जागांचा आकडा पार केला आहे, तर दुसरीकडे महागठबंधनची कामगिरी मात्र सुमार राहिली आहे. काँग्रेसला ५ हून कमी जागा आणि आरजेडीला २७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या विजयाचे मोठे श्रेय भाजपाचे रणनीतीकार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिले जात आहे.
बिहारमध्ये भाजपाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या विजयामुळे भाजपाला नजीकच्या भविष्यात, विशेषतः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांसाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत या विजयाविषयी बोलले आहेत. तसेच ते नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अन् नवीन सरकारमध्ये होणाऱ्या बदलाबाबतदेखील बोलले आहेत.
एवढा मोठा विजय कसा मिळाला?
बिहारमधील विजयाबाबत बोलताना ते म्हणाले, “हा बिहारच्या त्या लोकांचा विजय आहे, ज्यांना भविष्याच्या दिशेने जायचे आहे आणि ज्यांना विकास पाहायचा आहे. त्यांनी राज्यातील २० वर्षांची आणि केंद्र सरकारची ११ वर्षांची एनडीएची विश्वासार्हता स्वीकारली आणि तिचा आदर केला आहे. त्यांनी एनडीएवर विश्वास ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकास आणि प्रगतीचे तत्त्वज्ञानही लोकांनी स्वीकारले आहे.” विजयाच्या श्रेयाबाबत विचारले असता ते म्हणाले, “याचे श्रेय बिहारच्या जनतेला जाते.”
पक्षाने दिलेली जबाबदारी
पक्षाकडून तुम्हाला नेहमीच कठीण राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, पण तुम्ही पक्षाला जिंकवून आणण्यात यशस्वी झाला आहात. यावर बोलताना ते म्हणाले, लोकशाहीत कोणतीही जादू नसते, लोकशाही संपूर्णपणे लोकांचा विश्वास आणि निष्ठेवर अवलंबून असते. त्यांचा विश्वास जिंकणे हीच एका राजकीय कार्यकर्त्याची प्राथमिक जबाबदारी आहे. बिहारमधील मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी एनडीए हा योग्य उमेदवार होता.
केंद्रामध्ये भाजपासाठी या विजयाचा अर्थ काय?
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “या विजयामुळे भाजपाला अधिक प्रोत्साहन मिळेल आणि अधिक आत्मविश्वास निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला (एनडीएच्या नेत्यांना) पश्चिम बंगालमधील लोकांचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच, तामिळनाडू, पुडुचेरी, आसाम आणि निवडणुका असलेल्या सर्व राज्यांमध्ये आम्हाला हेच करावे लागेल. या सर्व राज्यांमध्ये आम्हाला कंबर कसून कठोर परिश्रम करावे लागतील. हा पक्षासाठी एक मोठा उत्साहवर्धक घटक ठरेल.
भाजपा जेडीयूला वगळून सरकार स्थापन करणार?
संख्या दर्शवते की, भाजपा जेडीयूला वगळून लहान मित्रपक्षांसह सरकार स्थापन करू शकतो का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, एनडीए अखंड आहे, एनडीए सरकार स्थापन करणार आहे; आकडे काहीही असले तरी एनडीए एकत्र राहील.
नितीश कुमार मुख्यमंत्री असतील का? नवीन सरकारमध्ये बदल होतील का?
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, एनडीए सरकार स्थापन करेल. नितीश कुमार हे बिहारमधील सर्वात मोठे नेते आहेत. मंत्र्यांचा निर्णय घेणे हे नवीन सरकारचे काम असेल. मुख्यमंत्री याचा निर्णय घेतील. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करायला हवा होता, असे तुम्हाला वाटते का? यावर बोलताना ते म्हणाले, ” आपण संभ्रम निर्माण करू नये, हा विजय एनडीएचा आहे हे स्पष्ट आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की, हा एनडीएचा विजय आहे आणि ते बिहारच्या विकासाला पाठिंबा देतील. ही निवडणूक मोदी-नितीश जोडीच्या नेतृत्वाखाली लढली गेली, भाजपाला याबद्दल कोणतीही शंका नाही, यात स्पष्टता आहे.
आता चिराग पासवान यांच्या पक्षाने २९ पैकी १९ जागा जिंकल्या आहेत, तुम्ही त्यांना सरकारमध्ये सामील होण्यास सांगाल का?
ते म्हणाले, “हा एक मुद्दा आहे जो चर्चेत येईल. एनडीएमधील प्रत्येक भागीदाराला सरकारचा भाग होण्याचा अधिकार आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढवली आहे आणि आम्हीच सरकार स्थापन करू.”
प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील जन सुराजच्या प्रवेशाने भाजपा आणि एनडीएला मदत?
यावर आपले मत मांडताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, लढाई एनडीए आणि महाआघाडी यांच्यात होती. बिहारच्या जनतेने एनडीएला निवडले आहे आणि महाआघाडीला नाकारले आहे. या निवडणुकीत दुसरा कोणताही घटक नव्हता. निवडणुकीदरम्यान सरकारसमोरील आव्हानांविषयी बोलताना ते म्हणाले, आमची स्वतःची विश्वासार्हता आहे, आमच्याकडे आमचा कार्यकाळ आणि योजना आहे.
भाजपाच्या बिहार विजयाचे श्रेय धर्मेंद्र प्रधान यांना
भाजपाची बिहारमधील ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी बिहारमध्ये संघटन मजबूत करण्यात आणि उमेदवारांची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एनडीएचा हा विजय केवळ नितीश कुमार यांच्या कल्याणकारी योजनांचा परिणाम नसून, भाजपाच्या आक्रमक, अत्यंत अचूक रणनीतीचा परिणामदेखील आहे. मोदींचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आणि नितीश कुमार यांनी केलेली कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी याचा दुहेरी फायदा एनडीएला झाला.
