अकोला : भाजपमध्ये नेत्यांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून विदर्भामध्येच प्रादेशिक असमतोल निर्माण झाला. पद देतांना पूर्व विदर्भाला कायम झुकते माप देण्यात येत असल्याने पश्चिम विदर्भात भाजपांतर्गत असंतोषाची भावना आहे. विधान परिषदेवर पूर्व विदर्भातील दोन नेत्यांना पक्षाने संधी दिली, पश्चिम विदर्भातील कुठल्याही नेत्याच्या नावाचा देखील विचार झालेला नाही. या भागात कोणीच सक्षम नाहीत का? असा उद्विग्न सवाल भाजप कार्यकर्त्यांमधून होत असून काहींनी समाज माध्यमातून जाहीर नाराजी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान परिषदेतील पाच रिक्त जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. नागपूरचे संदीप जोशी, आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे आणि संजय केनेकर यांना भाजपने संधी दिली. विदर्भात दोन्ही जागा पूर्व भागातील नेत्यांना देण्यात आल्या. त्यामुळे पश्चिम विदर्भातील भाजप नेत्यांवर राजकीय अन्याय होत असल्याचा आरोप पक्षांतर्गतच होत आहे.

भाजपमध्ये गेल्या दशकभरापासून नागपूरचे प्रस्थ चांगलेच वाढले. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, महसूल मंत्री, प्रदेशाध्यक्ष त्यानंतर आता विधान परिषदेवर सुद्धा नागपूरकर नेत्यालाच संधी देत ‘सब कुछ नागपूर’ असे चित्र भाजपमध्ये दिसून येते. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने नागपूर केंद्रित राजकारण करतांना पश्चिम विदर्भाकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचा नाराजीचा सूर पक्षातूनच उमटत आहे.

पश्चिम विदर्भात अकोला जिल्ह्यासह इतरही ठिकाणी मतदारांनी कायम भाजपला साथ दिली. पक्षाच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. संधी, पद व निधी देतांना मात्र भाजप नेतृत्वाने नेहमीच आखडता हात घेतला. विशेषत: अकोला जिल्ह्याच्या बाबतीत हे प्रकर्षाने दिसून येते. अकोला लोकसभेवर गत २१ वर्षांपासून भाजपचा झेंडा फडकत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अकोला, वाशीम व बुलढाणा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील ३० जागांपैकी १७ जागांवर भाजपचे आमदार निवडून आले. तरी देखील राज्याच्या मंत्रिमंडळात संधी देतांना पश्चिम विदर्भाच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातून एकमेव मंत्रिपद ॲड. आकाश फुंडकर यांना देण्यात आले.

पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थानच नसल्याने इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांवर पालकत्वाची जबाबदारी द्यावी लागली. केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा भाजपच्या कोट्यातून पश्चिम विदर्भाला स्थान नाही. आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपांतर्गत पश्चिम विदर्भावरील अन्यायाचा मुद्दा समोर आला. या भागातून कुणाला तरी संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र, पक्षाने पश्चिम विदर्भाकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे पक्षातील इच्छुकांची घोर निराशा झाली.

पक्षाने समतोल राखण्याची गरज

पक्षाकडून पश्चिम विदर्भावर अन्याय होत असल्याचा पाढा आता कार्यकर्तेच वाचू लागले आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने लक्ष देऊन समतोल राखण्याची गरज आहे. अन्यथा पक्षाला त्याचा मोठा फटका बसू शकतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissatisfaction within bjp in west vidarbha over opportunity in legislative council print politics news zws