नानांच्या ‘नाना तऱ्हां’नी काँग्रेसचीच कोंडी

नाना पटोले हे नेहमीच चर्चेत राहणारे. काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले पण मंत्रिपद मिळाले नाही ही त्याची नेहमीच खंत असायची.

नाना पटोले (संग्रहित छायाचित्र)

संतोष प्रधान

‘परि अंगी नाना कळा ’ असे बहुरंगी व्यक्तिमत्त्व असणारे नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून सध्या प्रसिद्धीच्या झोतात असले तरी खरे नाना म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सारेच गमावून बसले. गेले दीड वर्षे काँग्रेसला ना विधानसभा अध्यक्षपद मिळाले ना नानांना मंत्रिपद. बहुधा मंत्रिपदाने नानांना नेहमीच हुलकावणी दिली असावी.

नाना पटोले हे नेहमीच चर्चेत राहणारे. काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले पण मंत्रिपद मिळाले नाही ही त्याची नेहमीच खंत असायची. २००८च्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटली आणि पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे पराभूत झाले. साहजिकच संशयाची सुई अनेक आमदारांवर फिरू लागली. त्यात नानाही होतेच. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपला काटा काढतील ही भीती नानांना होतीच. मग त्यांनी थेट भाजपचा रस्ता पकडला. भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत नानांचे वैर होते ते राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांच्याशी. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पटेल यांच्या विरोधात भाजपने पटोले यांना रिंगणात उतरविले. मोदी लाटेत नाना निवडून आले. दिल्लीत नाना तसे चाचपडत होते. पण एक दिवस नानांसाठी फारच शुभदायी ठरला म्ङणायचे तर. कारण त्या दिवशी नेहमीप्रमाणे संसदेच्या उपहारगृहात नाना भोजन करीत असताना अचानक त्यांच्या शेजारी पंतप्रधान मोदी हे येऊन बसले.

परि अंगी नाना कळा !

कोणत्याही गोष्टीची प्रसिद्धी करण्यात मोदी व भाजपची मंडळी मातब्बर. मोदी खासदारांबरोबर भोजन करतनाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. शेजारी नाना बसलेले. साहजिकच माध्यमांनी नानांना गाठले. मग नानांनी मोदी कसे साधे, सामान्यांसारखे आहेत हे रंगवून सांगण्यास सुरुवात केली. मोदीही बहुधा नानांवर खुश झाले असावेत. नानांना वाटले मोदींचा आपल्यावर वरदहस्त असावा. थोड्याच दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात आपल्याला संधी मिळेल असे नानांना वाटत होते. पण राज्यातून डॉ. सुभाष भामरे यांना संधी दिली गेली. गप्प बसले तर ते नाना कसले ? त्यांनी धान व कृषी विषयांवर आवाज उठविला. भाजप वा मोदींच्या ते शिस्तीत बसणारे नव्हते. नानांना इशारा देण्यात आला. शेवटी नाना पटोले यांनी भाजपवर टीका करीत लोकसभा खासदारकीचा राजीानामाच देऊन टाकला. पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर नाना आक्रमकच होते. महाविकास आघाडीची जुळवाजुळव झाली. मंत्रिपदासाठी लाॅबिंग सुरू झाले. विदर्भातून नितीन राऊत, सुनील केदार., यशोमती ठाकूर यांची नावे निश्चित झाली . नानांना काही संधी मिळाली नाही. परिणामी त्यांची मंत्रिपदाची इच्छा तेव्हा पूर्ण होऊ शकली नाही. तरीही विधानसभा अध्यक्षपद देऊन नानांचा सन्मान करण्यात आला. नाना तेथेही रमले नाहीत. प्रदेशाध्यक्ष मिळवायचे व बरोबरीनेच मंत्रिपदही मिळवायचे हा त्यांचा डाव होता. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाल्याने विधानसभा अध्यक्षपद सोडले. त्यानंतर अध्यक्षपद काँग्रेसला दीड वर्षांत मिळू शकले नाही ना नानांना मंत्रिपद.

गुवाहाटीत आमदारांची चंगळ; हिंगोलीत जनसंघाच्या माजी आमदाराची परवड

अध्यक्षपद सोडण्याच्या नानांच्या निर्णयाने काँग्रेसचे नुकसानच झाले. कारण महत्त्वाचे घटनात्मक पद पक्षाला पुन्हा मिळू शकले नाही. बरे नानांमुळे राज्यात काँग्रेसची ताकद वाढली असेही काही बघायला मिळत नाही. उलट महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला डिवचण्याचेच काम नानांनी केले. अगदी अलीकडे भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरूनही नानांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला न मिळण्यास नाना पटोले हे भाजपला दोष देतात. आपण अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर अध्यक्ष निवडीच्या नियमांत बदल करण्यात आला. त्याला विधानसभेने मान्यता दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख फक्त राज्यपालांनी निश्चित करायची असते. पण भाजपने राज्यपालांच्या नथीतून तीर मारला. काँग्रेसला हे पद मिळू नये म्हणून राज्यपालांच्या माध्यमातून खोडा टाकण्यात आल्याचा नानांचा आरोप आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Due to the different working style and attitude nana patole is becoming trouble making factor for congress print politics news pkd

Next Story
गुवाहाटीत आमदारांची चंगळ; हिंगोलीत जनसंघाच्या माजी आमदाराची परवड
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी