आज दिवसभरातील राजकीय घडामोडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला… मुंबईत भाजपासह शिवसेना ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला… काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली… कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना थोपवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामध्ये आघाडी झाली… बिहारमधील आनंदोत्सव साजरा करताना अहिल्यानगरमधील भाजपातील अंतर्गत गटबाजी दिसून आली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदे गटात सामूहिक राजीनामे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीने त्यासंदर्भातील वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती होती. त्यावरून बागल गटात नाराजी पसरली असून दिग्विजय बागल यांच्या अनेक समर्थकांनी सामूहिक राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत बागल यांच्या गटातील ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे टीव्ही ९ मराठीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईत ठाकरेंसह भाजपाला धक्का
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले अनेकजण पक्षांतर करताना दिसून येत आहे. यादरम्यान बोरिवलीतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटासह भाजपाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक पाच मधील ठाकरे गटाच्या शाखा समन्वयक भूषण माळदवेंसह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. तसेच भाजपाच्या कांदिवली पूर्व विधानसभा सचिव दिपालीताई माटे यांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. उल्हासनगरमधील भाजपाच्या माजी नगरसेविका मीना सोंडे आणि माजी नगरसेवक किशोर वनवारी यांनीदेखील ‘घरवापसी’ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केल्याची माहिती आहे.
आणखी वाचा : भाजपाचा बिहारमध्ये दणदणीत विजय, पण उर्वरित भारतात उडाली दाणादाण; पाहा पोटनिवडणुकीत काय घडलं?
हसन मुश्रीफांविरोधात सर्व पक्षांची आघाडी
कोल्हापूरमधील गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना थोपवण्यासाठी सर्व पक्षांनी आघाडी केली आहे. शिवसेना ठाकरे गट, भाजपा, काँग्रेस, शिंदे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुश्रीफांविरोधात एकवटले आहेत. त्यामुळे ‘व्यक्ती विरोधातील लढा’ असे गडहिंग्लजच्या गडाच्या लढतीला स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे येथे राजकीय विचारांना तिलांजली देत समीकरणे घडू लागली आहेत. गडहिंग्लज नगरपालिकेसाठी अनुसूचित जमातीकरिता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आहे. त्यामुळे येथे सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. गडहिंग्लज पालिका ही मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघातील सर्वांत मोठी पालिका. मुश्रीफ यांना येथे पालिका निवडणुकीत आवर घातला, की पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मार्गात काटे पेरणे सोपे जाणार असल्याची अटकळ त्यांच्या तमाम विरोधकांनी बांधली आहे. त्यातूनच गडहिंग्लज या राजकीय प्रयोगाची पहिली रंगभूमी ठरली आहे.
भाजपातील अंतर्गत गटबाजी उघड
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश आले. मात्र त्याचा आनंदोत्सव साजरा करताना अहिल्यानगर शहरातील भाजपामधील गटबाजी उघड झाली आहे. पक्षाच्या शहरातील दोन गटांनी दोन स्वतंत्र विजयोत्सव साजरे करत गटबाजी दाखवून दिली आहे. एका गटाने लक्ष्मी कारंजा भागातील पक्ष कार्यालयासमोर तर दुसऱ्या गटाने चौपाटी कारंजा येथे आनंदोत्सव साजरी करणारे दोन स्वतंत्र कार्यक्रम केले. दोन्ही गटांचे पदाधिकारी एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. पक्ष कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह ढोल-ताशे वाजवत, एकमेकांना लाडू भरवत विजय साजरा केला, तर भाजपामधील दुसऱ्या गटाने चौपाटी कारंजा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापुढे फटाके वाजवून व नागरिकांना पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. या गटबाजीची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : AIMIM Bihar Performance : बिहारमध्ये ओवैसींचा पक्ष काँग्रेसपेक्षाही शक्तिमान; एमआयएमने कशी केली कामगिरी?
मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा
मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. काँग्रेसच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पक्षातील जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी तशी इच्छा वर्तवली आहे. त्यामुळे आम्ही महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहोत”, असे चेन्निथला यांनी म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. ‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची खूप प्रकरणे असून खिरापत वाटली जात आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत’, असे वडेट्टीवार म्हणाले होते.
