Latest News on Maharashtra Politics Today : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंच्या ऐक्याची चर्चा रंगली. मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले. मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला, तर ऐन दिवाळीत महायुती सरकारने आमदारांना कोट्यवधींचा निधी वाटल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. मुंबई महापालिकेत बदली-बढती घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. या सर्व राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचीच चर्चा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षातील युती जवळपास निश्चित मानली जात आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सध्या ठाकरे बंधूंच्या ऐक्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाण्यातील रांगोळी प्रदर्शनातही या ऐक्याचे प्रतिबिंब पाहायला मिळाले आहे. रांगोळीकार उमेश सुतार यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे व्यक्तीचित्र साकारले आहे. या रांगोळीतून ठाकरे कुटुंबातील ऐक्याचा आणि मराठी अस्मितेच्या भावनेचा संदेश दिला गेला आहे. कलाछंद रांगोळीकार मंडळ ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्य रांगोळी प्रदर्शन २०२५’मध्ये हे व्यक्तीचित्र साकारण्यात आल्याने ठाण्यात सध्या ठाकरे बंधूंचीच चर्चा सुरू आहे.
काँग्रेसची स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी
मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंबरोबरही आम्ही युती करणार नाही, असा दावा काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आयएएनएसशी बोलताना भाई जगताप म्हणाले, जेव्हा मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हाही ‘डंके की चोट’ पर हीच गोष्ट सांगितली होती. आतादेखील काँग्रेसच्या बैठकीत आमच्या सर्व नेत्यांनी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे म्हटले आहे. या निवडणुका नेत्यांच्या नसून कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले की, आगामी निवडणुकीत आपण ठाकरे गटाबरोबर युती केली नाही पाहिजे. राज ठाकरेंबरोबर जाण्याचा तर प्रश्नच येत नाही.” दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही जगताप यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. निवडणुका स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : History of Muslim MLAs : बिहारच्या राजकारणात मुस्लीम कुठे आहेत? कोणत्या पक्षांनी किती जणांना दिली उमेदवारी?
देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी जोरकसपणे लावून धरली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये तब्बल ९६ लाख बोगस मतदार घुसवले असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. या सुधारणा होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. “विरोधकांना निवडणुका आताच घेतल्या तर पराजयाला सामोरे जावे लागेल अशी शंका वाटत आहे, त्यामुळे सहा महिने निवडणुका पुढे गेल्या तर बरे होईल, असे त्यांचे मत आहे. मात्र आम्हीही तयारी केली असून लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात विरोधकांना लाभ झाला तेथील घोळ पुराव्यांसह जनतेसमोर मांडू”, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. “विरोधकांकडून खोटा प्रचार सुरू असून मतदारयाद्यांमध्ये काही ठिकाणी त्याच त्याच नावांची पुनरावृत्ती झालेली असू शकते, पण जर एकाच ठिकाणी मतदान झाले असेल तर ते बोगस कसे म्हणणार”, असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
सत्ताधारी आमदारांना कोट्यवधींचा निधी मिळाल्याचा आरोप
अवकाळी पावसामुळे हैरान झालेले शेतकरी नुकसानीच्या मदतीची आस लावून बसले असताना महायुती सरकारकडून आमदारांना कोट्यवधी रुपयांच्या निधीची खैरात वाटली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्याची आर्थिक स्थिती वाईट असल्याने अनेक योजनांचा निधी बंद करण्यात आला. तसेच आमदार निधी देखील नियमित देण्यात येत नाही. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आमदारांवर मेहेरनजर दाखवली आहे. ऐन दिवाळीत सत्ताधारी आमदारांना कोट्यवधींच्या निधीचे वाटप करण्यात आले, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सरकारकडे सत्ताधारी आमदारांना पाच कोटी रूपयांचा निधी देण्यासाठी पैसे आहेत, मग कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी पैसे का नाही? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षातील आमदारांवर अन्याय करायचे हे महायुती सरकारचे धोरण आहे. आमदार हा लोक प्रतिनिधी असल्याने हा फक्त त्यांच्यावर नाही तर जनतेवर अन्याय आहे. राज्याचा सर्वांगीण विकास होणे हे या सरकारचे धोरण नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा : सरकारी तिजोरीचा निवडणुकीसाठी वापर? ८ राज्यांमध्ये ६७,९२८ कोटींची उधळपट्टी; महाराष्ट्र कितव्या स्थानी?
महापालिकेत बदली-बढती घोटाळा- ठाकरे गटाचा आरोप
मुंबई महापालिकेच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी माजली असून १५६ अभियंत्यांच्या बदलीत मोठी अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला. याप्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या १२२ तसेच अन्य ३४ अभियंत्यांच्या बदली आणि बढतीत अनियमतात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री फडवीस यांनी या बदली आदेशांना स्थगिती देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. १५६ अभियंत्यांच्या बदलीला स्थगिती देण्याची नामुष्की मुंबई महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. या अनियमिततेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.