परभणी : माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर रिक्त असलेल्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अद्याप कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने अधिक घोळ न घालता तातडीने जिल्हाध्यक्षपदाची घोषणा करावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांमधून होत आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ वरपूडकर यांनी सांभाळली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वरपुडकरांच्या पक्षप्रवेशापासून हे पद अजूनही रिक्त आहे. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे.
मध्यंतरी पक्षाचे निरीक्षकही येथे येऊन गेले. त्यांनी काँग्रेस पक्षातल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अलीकडेच पक्षाने राज्यस्तरावरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या जाहीर केल्या. त्यात काही पदाधिकाऱ्यांना स्थान मिळाले. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका बैठकीत जिल्हाध्यक्षपदाच्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे सर्व समीकरणे बदलली गेली.
यापूर्वी अर्धा डझन नावे जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत आली असली तरी बाबाजानी दुर्राणी यांचे नाव चर्चेत आल्यानंतर माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी जिल्हाध्यक्ष होण्याबाबत इच्छा प्रदर्शित केली. काँग्रेस पक्षाने आपल्याला जिल्हाध्यक्षपदाची संधी द्यावी अशी भूमिका रेंगे यांनी पक्ष नेतृत्वाकडे मांडली. त्याचवेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण सर्व क्षमता पणाला लावू असा शब्द बाबाजानी यांनी पक्ष नेतृत्वाला दिला.
दिल्लीत खासदार इमरान प्रतापगडी, कन्हैया कुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वासोबतही बाबाजानी यांनी चर्चा केली. बाबाजानी यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली तर त्यांच्या अल्पसंख्य प्रतिमेचा पक्षाला उपयोग होईल असे मानणारा एक प्रवाह सध्या पक्षात आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्षपद अल्पसंख्य व्यक्तीकडे असणे ही बाब केवळ परभणीच नव्हे तर मराठवाड्यात पक्षासाठी महत्त्वाची ठरू शकते असा युक्तिवाद या निमित्ताने केला जात आहे. सध्या रेंगे पाटील आणि बाबाजानी या दोघांचीच नावे जिल्हाध्यक्षपदासाठी अंतिम चर्चेत आहेत. बाबाजानी पक्षात नव्याने दाखल झाले आहेत आपण ज्येष्ठ आहोत या मुद्द्यावर रेंगे पाटील अडून बसले आहेत.
जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेचा घोळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे तरी अद्याप कोणतेही नाव निश्चित झाले नाही. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महानगरपालिका, पालिका, जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवून जिल्हाध्यक्षपद जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात असलेली शांतता कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने तातडीने जिल्हाध्यक्षपद जाहीर करावे अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.