Rahul Gandhi photo on sanitary pads बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांकडून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवविले जात आहेत. बिहार निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, काँग्रेसनेही आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने बिहारमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची पाकिटे वाटायला सुरुवात केली आहे. या पाकिटांवर राहुल गांधीचा फोटो असल्याने काँग्रेसवर टीकाही होताना दिसत आहेत.

याचदरम्यान काही व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये पाकिटांसह सॅनिटरी नॅपकिन्सवरदेखील राहुल गांधींचे चित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. तसेच या प्रकरणात दोन जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण? गुन्हा दाखल करण्यामागील कारण काय? ही योजना नक्की काय आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटांवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

प्रकरण काय?

  • सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटांवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो आहे.
  • मात्र, सॅनिटरी नॅपकिन्सवरदेखील त्यांचे मॉर्फ केलेले आणि बनावट फोटो तयार करून, प्रसारित केल्याबद्दल काँग्रेसने रविवारी दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि प्रतिमांमध्ये राहुल गांधींचा फोटो सॅनिटरी नॅपकिन्स चिकटवला जात असल्याचे दिसून येत आहे.
  • हे सॅनिटरी नॅपकिन्स बिहारमधील काँग्रेसच्या प्रियदर्शिनी उडान योजनेंतर्गत वितरित केला जात असल्याचे दिसून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी या व्हिडीबाबत एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. श्रीनाते यांनी रविवारी सांगितले, “राहुल गांधी यांच्या प्रतिमेचा गैरवापर करून, बनावट व्हिडीओ तयार केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यात सहभागी असलेल्या इतरांवरही कारवाई केली जात आहे,” असे ते म्हणाले. या व्हिडीओविरोधात युवा काँग्रेस कार्यकर्त्या प्रियांका देवी यांनी बंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यामध्ये रतन रंजन आणि अरुण कोसिल यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बिहारमधील आरोपीने राहुल गांधींचे छायाचित्र मॉर्फ करून, ते सॅनिटरी नॅपकिन्सवर लावल्याचा आरोप आहे.

तक्रारीत काय म्हणण्यात आले?

तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, हे कृत्य खोटी माहिती पसरवणे, बदनामी करणे व महिलांबद्दल द्वेष पसरवणे या उद्देशाने करण्यात आले आहे. या तक्रारीत ही पोस्ट पुन्हा पोस्ट करणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यासह कलम ३३६(४) विशेषतः एखाद्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार केल्याबद्दल आणि कलम ३५३ खोटी विधाने, अफवा किंवा सार्वजनिक गैरप्रकार, भीती किंवा द्वेष निर्माण करणारे अहवाल पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटावरील फोटोमुळे विरोधक आक्रमक

काँग्रेसने बिहारमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेचा उपक्रम सुरू केल्यानंतर काही दिवसांतच हा वाद निर्माण झाला. काँग्रेसने सॅनिटरी नॅपकिन्स वाटण्याचा उपक्रम हाती घेतल्यानंतर त्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटावर काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो असल्यामुळे प्रचंड वाद सुरू झाला. महिलांसाठी असलेल्या उत्पादनावर गांधींचा चेहरा छापण्याच्या तर्कावर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सॅनिटरी पॅडवरील बॉक्सवर राहुल गांधींचा फोटो लावण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करीत म्हटले, “सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो लावत काँग्रेस बिहारमधील महिलांचा अपमान करत आहे. काँग्रेस हा महिलाविरोधी पक्ष आहे. बिहारमधील महिला काँग्रेस आणि राजदला निवडणुकीत धडा शिकवतील”, असे ते म्हणाले.

ही योजना नक्की काय आहे?

काँग्रेसच्या प्रियदर्शिनी उडान योजनेंतर्गत हे सॅनिटरी नॅपकिन्स वितरित केले जात आहेत. या योजनेचा उद्देश बिहारमधील महिलांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. काँग्रेस म्हणणे आहे की, हा उपक्रम राज्यातील महिला मतदारांसाठीच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे. या उपक्रमांतर्गत वाटण्यात येणाऱ्या बॉक्समध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचे फोटो आहेत. हा उपक्रम काँग्रेसच्या महिलाकेंद्रित व्यापक प्रचाराचा एक भाग असल्याचेही सांगितले जात आहे.

महिला काँग्रेस प्रमुख अलका लांबा यांचे म्हणणे आहे की, बिहार सरकार राज्यातील ४०,००० शाळांमध्ये सॅनिटरी नॅपिकिन्स पुरवल्याचा दावा करीत आहे. मात्र, केवळ ३५० शाळांमध्येच हे नॅपकिन्स पुरविले गेल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. बिहार सरकार केवळ २० टक्के शाळकरी मुलींनाच सॅनिटरी नॅपकिन्स पुरवीत असून, राज्यातील ८० टक्के मुली त्यापासून वंचित आहेत. त्यांना या योजनेद्वारे सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यात येणार आहेत..