Bihar Assembly elections 2025 बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दोन टप्प्यांत येथील निवडणुका होणार आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादवच महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातील एका घोषणेवर विरोधकांकडूनही टीका केली जात आहे. ती घोषणा म्हणजे, प्रत्येक घरात सरकारी नोकरी. तेजस्वी यादव यांनी नुकतंच ‘आज तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत, ते तीन कोटी सरकारी नोकऱ्या कशा देतील? हेदेखील स्पष्ट केले आहे. ते नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात…
काय म्हणाले तेजस्वी यादव?
- बिहार विधानसभा निवडणुकीमुळे (विधानसभा निवडणूक) राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ‘आजतक’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सत्ताधारी एनडीएवर टीका केली आहे.
- ते म्हणाले की, “या सरकारकडे कोणतेही व्हिजन नाही, जनता या सरकारला कंटाळली आहे.” तसेच, त्यांनी बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होण्याची आशाही व्यक्त केली आहे.
- तेजस्वी यादव म्हणाले की, “आम्ही कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही घोषणा करत नाही. या सर्व योजना पूर्ण करता येतात. आम्ही पंचायत प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. या सर्व योजना पूर्ण करता येऊ शकतात.”
“प्रत्येक घरात सरकारी नोकरी”
मुलाखतीत त्यांना ‘प्रत्येक घरात सरकारी नोकरी’ देण्याच्या त्यांच्या आश्वासनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मागच्या वेळीही तज्ज्ञ मंडळींनी हेच म्हटले होते की, हे नोकऱ्या कुठून देणार? आणि आमचे मुख्यमंत्रीही म्हणायचे, हा नोकऱ्या कुठून आणणार? आपल्या वडिलांकडून नोकरी आणणार का? पण आता तेच लोक एक कोटी नोकऱ्या आणि रोजगाराची भाषा करत आहेत. बघा, आम्ही यावर पूर्ण काम केले आहे. लवकरच याचा ब्लूप्रिंट तयार होईल आणि आम्ही बिहारच्या जनतेला त्याबद्दल सांगू आणि हे शक्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “याबरोबरच आम्ही सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याबद्दलही बोललो आहोत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सिंचन हे आमच्या प्राधान्य क्रमात आहेत.” ते म्हणाले की, “नितीश कुमार यांच्या राजवटीत अनेक हत्या झाल्या आहेत, आजही बिहारमध्ये तीच परिस्थिती आहे. यावरून स्पष्ट होते की एनडीएच्या राजवटीत गुन्हेगारी वाढली आहे.” एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “ही तीच भाजपा आहे, जी कर्पूरीजींचा विरोध करायची.”
“फ्रेंडली फाईट आमच्या रणनीतीचा भाग”
दहा जागांवर असलेल्या आपआपसातील मतभेदाबद्दल त्यांनाविचारले असता, त्यांनी उत्तर दिले की, “बघा, हा आमच्या रणनीतीचा भाग आहे. झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही ‘फ्रेंडली फाईट’ पाहायला मिळाली होती. ही आमच्या युतीची रणनीती आहे आणि त्याच आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे.” महागठबंधनमध्ये मतभेद असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “कोणतेही मतभेद नव्हते, पण काही गोष्टी होत्या ज्या आता सोडवल्या आहेत. प्रत्येक राजकीय युतीमध्ये अशा गोष्टी असतातच. आता बिहारची जनता नवे सरकार स्थापन करेल, जे नवा बिहार पाहू इच्छितो,” असेही ते म्हणाले.
तेजस्वी यादव यांनी सरकारी नोकरीविषयी काय घोषणा केली?
बिहारमध्ये आपले सरकार आल्यानंतर पहिल्या २० दिवसांत प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भातील कायदा करणार असल्याची घोषणा तेजस्वी यादव यांनी केली. त्यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली होती. यावेळी तेजस्वी यादव यांनी म्हटले की, “बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही माझी पहिलीच मोठी घोषणा आहे. बिहारमधील ज्या कुटुंबात सरकारी नोकरी नाही, अशा प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी दिली जाईल अशा प्रकारचा कायदा आम्ही करणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी गेल्या २० वर्षांत कोणत्याही सरकारी नोकऱ्या दिलेल्या नाहीत. मात्र, या निवडणुकीनंतर आमचे (आरजेडी) सरकार सत्तेत आल्यानंतर २० दिवसांत याबाबतचा नियम बनवण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत”, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “ आमच्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर पुढच्या २० महिन्यांत बिहारमध्ये एकही असे घर नसेल की त्या घरी एकही सरकारी नोकरी नसेल. याचा अर्थ आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या २० दिवसांत ज्या कुटुंबात सरकारी नोकरी नाही, त्या प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देईल.”
तेजस्वी यादव यांच्या इतर घोषणा
यादव यांनी सांगितले की, जीविका बहिणींना दोन वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज मिळेल. त्यांना इतर सरकारी कामे करण्यासाठी मासिक २००० रुपये भत्ता मिळेल. त्यांच्या निवडणूक आश्वासनांचा एक भाग म्हणून, त्यांनी बेटी योजना आणि माँ योजनेंतर्गत महिलांसाठी घर, अन्न आणि उत्पन्न देण्याचेही आश्वासन दिले आहे.
महिलांना १० हजार रुपये लाच दिल्याचा आरोप
तेजस्वी यादव म्हणाले की, महिलांना १० हजार रुपये लाच म्हणून देण्यात आले आहेत. हे सरकार तेही परत घेणार आहे. तसेच संपूर्ण बिहार राज्य सध्याच्या सरकारवर संतापले असून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला कंटाळले आहे. या सरकारने आमच्या योजनांची नक्कल केली आहे. तेजस्वी यादव म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली, आता निवडणूक प्रचाराची वेळ आली आहे. बिहारच्या लोकांनी बदल घडवण्याचा निर्धार केला आहे आणि ते डबल इंजिन सरकारला कंटाळले आहेत.
