Who is Jagadish Vishwakarma Gujarat BJP New President : गुजरातच्या राजकीय पटलावर आपली छाप सोडणारे जगदीश विश्वकर्मा यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा चंद्रकांत पाटील सांभाळत होते. आता त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जगदीश विश्वकर्मा यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. बूथ कार्यकर्ते ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असा विश्वकर्मा यांचा प्रवास आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा सविस्तर आढावा…
चंद्रकांत पाटील (सी. आर. पाटील) यांनी भाजपाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ गुजरातच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत १८२ पैकी तब्बल १५६ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. आता ते या पदावरून पायउतार होणार असून त्यांची जागा जगदीश विश्वकर्मा घेणार आहेत. सध्या विश्वकर्मा हे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जात असल्याने मंत्रिमंडळात बदल पाहायला मिळणार आहे. पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १७ पैकी १२ जणांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा गुजरातच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोण आहेत जगदीश विश्वकर्मा?
१२ ऑगस्ट १९७३ रोजी जन्मलेले जगदीश विश्वकर्मा हे अहमदाबादमधील निकोळ मतदारसंघाचे आमदार असून भाजपा सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ठाक्करबापनगरचे बूथ प्रभारी म्हणून केली. त्यानंतर अहमदाबादचे भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. २०१२ मध्ये विश्वकर्मा हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पक्षाने त्यांना अहमदाबाद शहर मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत विश्वकर्मा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव करीत विधानसभेत प्रवेश केला. २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
आणखी वाचा : Vijay Under Pressure : चेंगराचेंगरीनंतर विजय अडचणीत, भाजपाला राजकीय संधी? तमिळनाडूत भगव्याची शक्यता किती?
मोदी-शाहांचे विश्वासू शिलेदार
सध्या मुख्यमंत्री भूपेश पटेल यांच्या मंत्रिमंडळात असलेले विश्वकर्मा यांच्याच नेतृत्त्वातच भाजपा २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपदी असताना त्यांनी गुजरातमध्ये भाजपाला मिळवून दिलेला कौल टिकवून ठेवण्याची जबाबदारी विश्वकर्मा यांच्याकडे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विश्वासापोटीच विश्वकर्मा यांना ही जबाबदारी मिळाल्याचे सांगितले जाते. या पदासाठी भाजपाकडून फक्त विश्वकर्मा यांनीच अर्ज भरल्याने तेच भाजपाचे पुढील प्रदेशाध्यक्ष असतील. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि के. लक्ष्मण यांच्याकडून विश्वकर्मा यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येईल.
विश्वकर्मा यांच्यासमोरील आव्हाने कोणती?
आगामी काळात गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे मोठे आव्हान विश्वकर्मा यांच्यासमोर असेल, कारण काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या निवडणुकीकडे लक्ष्य केंद्रित केले असून भाजपाला धक्का देण्याची मोहीम आखली आहे. मागील काही दिवसांपासून राहुल हे सातत्याने गुजरातचे दौरे करीत आहेत. राज्यात डबघाईला आलेल्या पक्षाला चालना देण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा दिग्गजांकडे सोपवली आहे. गुजरातमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही सेमीफायनल मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
अमित शाहांकडून ‘ओबीसी’ कार्ड
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला रोखण्यासाठी अमित शाह यांनी ‘ओबीसी’ कार्ड बाहेर काढले आहे. जगदीश विश्वकर्मा राज्यातील ओबीसी समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित चावडा हेदेखील ओबीसी प्रवर्गातूनच येत असल्याने मोदी-शाहांच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये ओबीसी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक आमदार ओबीसी समुदायातील आहेत, त्यामुळेच भाजपाने विश्वकर्मा यांच्याकडे प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडील जबाबदारी घेतल्यानंतर आगामी काळात ते भाजपाच्या विश्वासावर कितपत खरे उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : ‘राहुल गांधी प्रभू श्रीरामाच्या रुपात’, काँग्रेसच्या बॅनरमुळं नवा वाद; ‘राम द्रोह’ असल्याचा भाजपाचा आरोप
गुजरातच्या मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल?
भाजपाचा सर्वात मजबूत गड मानल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये दिवाळीपूर्वीच मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील तब्बल १२ मंत्र्यांना एकाचवेळी डच्चू दिला जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. सध्या राज्यातील भाजपा सरकारमध्ये १७ मंत्री आहेत, त्यापैकी किमान १२ मंत्र्यांना पायउतार व्हावे लागू शकते, असे भाजपातील सूत्रांनी सांगितले आहे. भाजपाने २०२२ मध्ये ज्या विश्वासाने त्यांना मंत्री केले होते, त्यावर ते खरे उतरू शकले नाही, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. २०२२ मध्ये भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे आगामी काळात मंत्रिमंडळातून कोणकोणत्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.