दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील निधी वाटपाचा वाद ऐरणीवर आला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात निधी वाटपात पक्षपात केल्याच्या मुद्द्यावरून जुगलबंदी सुरू आहे. त्याला जुन्या वादाची किनार लाभली आहे. महायुतीकडून निधी वाटप करताना अन्याय केला जात असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीचे धोरण महायुती राबवत असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर निधी वाटपाचा मुद्दा सातत्याने गाजत असतो. सत्ता कोणाची असली तरी विरोधकांकडून निधी वाटतात अन्याय केला जात असल्याची तक्रार केली जाते. निधी वाटपाचे तत्व धोरण याचे दाखले दिले जातात. आधीचे टीकाकार पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचेही दाखले आहेत.

हेही वाचा… विजयाचा रंग भगवा की हिरवा ?

विद्यमान पालकमंत्री मुश्रीफ हे विरोधकात असताना निधी वाटपावरून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच थेट आव्हान देताना चुकीच्या पद्धतीने वाटप झाले तर कशाप्रकारे नुकसान होते याची जाणीव करून दिली होती. चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाचे निधीचे वाटपाचे अधिकार भाजपच्या तालुकाध्यक्षांना दिले होते. पक्षीय पातळीवर तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांना निधी वाटप करण्याचे देण्याचे अधिकार नसतात. ते लोकप्रतिनिधींना म्हणजे आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना असतात असे सांगत पाच वर्षांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांनी भाजप तालुकाध्यक्षांना निधी वाटपाचे दिलेले अधिकार अत्यंत बेकायदेशीर असून त्याचा फेरविचार करावा. न्यायालयीन प्रक्रियेत निधी अडकला तर विकास कामावरून गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला होता.

हेही वाचा… नाशिकमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी शिंदे गटापाठोपाठ भाजपचाही जोर

सतेज पाटील यांनाही आव्हान

आता मुश्रीफ पालकमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून सतेज पाटील टीका करताना दिसत असले तरी महाविकास आघाडीचे सरकार असताना ते पालकमंत्री असताना आमदार प्रकाश आवाडे यांनी अनेकदा सतेज पाटील हे निधी वाटपामध्ये अन्याय करतात. विरोधकांना निधी देत नाहीत, असे आरोप अनेकदा केले होते. त्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपण जबाबदारीने आणि समन्यायी पद्धतीने निधी वाटप करत असल्याचे उत्तर दिले होते. पालकमंत्री असताना मी केलेल्या निधी वाटपाचे दोन वर्षाच्या नोंदी तयार आहेत. तेव्हा सत्ताधारी विकास आघाडीला दिलेल्या निधीपैकी निम्मा तरी निधी आम्ही विरोधकांना देत होतो. विनय कोरे, प्रकाश आवाडे यांनाही तेव्हा पुरेसा निधी दिला होता, असे पाटील यांचे म्हणणे आहे. आता महायुतीच्या काळात मात्र महाविकास आघाडीकडे निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे बोट दाखवत केला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांना प्रत्येकी ३० टक्के तर जिल्ह्यात विरोधातले सर्वाधिक सहा आमदार असतानाही त्यांना केवळ १० टक्के निधी हा अन्यायकारक आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचे नाव बदलून सत्तारूढ निधी वितरण समिती करावी, असा संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व आमदार गेले होते. पराभूतांना निधी देता पण लाखो लोकांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधीला डावलले जात असेल तर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला येऊन उपयोग काय, असा खडा सवाल केसरकर यांना आमदारांनी केला होता. आताही पुन्हा याच आक्रमक भूमिकेत सतेज पाटील आले असून त्यांनी यापुढे नियोजन समितीच्या बैठकीला जाणार नसल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा… विकसित भारत संकल्प यात्रेवरून सिंधुदुर्गात वातावरण तापले

मुश्रीफ – सतेज संघर्ष

पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. गोकुळच्या सत्तेत ते एकत्र आहेत. अलीकडे बिद्री कारखान्याची निवडणूक दोघांनी एकत्रित निवडणूक लढवून जिंकली होती. निधी वाटपात मात्र हे दोघे आमने-सामने आले आहेत. व्यक्तिगत संबंध वेगळे आहेत. महायुतीच्या धोरणात्मक निर्णयाला आमचा विरोध आहे, असे सतेज पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, निधी वाटप समन्यायी केले जात असल्याचा मुश्रीफ यांचा दावा दिसतो. जिल्हा नियोजन मधून निधीचे सूत्र ठरले असले तरी इतर माध्यमातून विरोधी आमदारांना योग्य पद्धतीने निधी देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. जिल्हा नियोजन निधी वाटपामध्ये महाविकास आघाडीचे जे तत्व होते तेच तत्व महायुतीत आहे, अशा शब्दात मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur politics between hasan mushrif and satej patil over fund allocation print politics news asj