यवतमाळ : जिल्ह्याच्या नेत्यांच्या मुलांनी राजकारणात सक्रिय होण्याची प्रथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढील पिढीनेही कायम राखली आहे. दामिनी संजय राठोड यांची शिवसेना युवासेनेत (शिंदे गट) राज्य कार्यकारिणीवर निवड झाली. पक्षाने युवासेना (युवती) विदर्भ निरीक्षक म्हणून दामिनी यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राठोड यांनी शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख असा प्रवास करत राजकारणातील एकेक पायरी चढली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने २००४ मध्ये संजय राठोड ‘जायंट किलर’ ठरले. त्यांनी दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली. तेव्हापासून संजय राठोड हे दिग्रस-दारव्हा मतदारसंघात सातत्याने निवडून येत आहे. या राजकीय प्रवासात त्यांना बंजारा समाजाची भक्कम साथ मिळाली आणि संजय राठोड हे बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते झाले.

हेही वाचा : औसा मतदारसंघात नव्या दमाने पुन्हा दिनकर माने मैदानात

आता संजय राठोड यांनी राजकीय वारस म्हणून मुलगी दामिनी यांना राजकारणात सक्रिय केले आहे. त्यामुळे वडिलांसोबत मुलगीही राजकीय कारकीर्द घडविणार असे दिसत आहे. दामिनी यांनी मुंबईत कायद्याचे शिक्षण घेऊन वडिलांच्या मार्गदर्शनात समाजकारण व राजकारणाचे धडेही गिरवले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार त्यांनीही आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दिग्रस मतदारसंघात गेल्या वर्षभरात अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने दामिनी राठोड फलकांवर झळकत आहे. त्यामुळे त्यांची राजकारणात ‘एन्ट्री’ होणार हे निश्चित होते.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदे गटाच्या ताब्यात आहे. मात्र या मतदारसंघावर भाजपही दावा सांगत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने दामिनी राठोड या राजकारणात सक्रिय होण्यामागे मोठी दूरदृष्टी असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. पक्ष अथवा काही नेत्यांच्या आदेशाने संजय राठोड यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश देण्यात आल्यास दामिनी राठोड या दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांची रिप्लेसमेंट व युवा उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आणि दामिनी राठोड निवडून आल्यास त्या बंजारा समाजातील पहिल्या युवा महिला आमदार ठरतील, असे विविध तर्क लावले जात आहेत. त्यामुळे राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत दामिनी कुठपर्यंत झेप घेतात, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : नगरमध्ये छावणी परिषदेच्या महापालिका हद्दीतील समावेशाची ‘राजकीय लगीन घाई’

राज्य कार्यकारिणीत यवतमाळ जिल्ह्यातून दोघांना स्थान

शिवसेना युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीत यावेळी प्रथमच यवतमाळ जिल्ह्यातून दोघांना स्थान मिळाले आहे. दामिनी संजय राठोड यांच्यावर युवासेना (युवती) विदर्भ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचप्रमाणे युवासेनेचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख विशाल गणात्रा यांची युवासेना पश्चिम विदर्भ निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशाल गणात्रा यांची युवासेना यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्षपदी यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. गणात्रा यांच्यावर पक्षाने एकाचवेळी तीन जबाबदाऱ्या टाकल्या आहेत.

पक्षाने दिलेली जबाबदारी महत्वाची – दामिनी राठोड

पक्षाने दिलेली जबाबदारी महत्वाची असून ती यशस्वीपणे पार पाडू. विदर्भात युवासेनेचा विस्तार तसेच बांधणी करणार असल्याचे दामिनी राठोड यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal minister sanjay rathod daughter damini rathod entry in politics print politics news css