महाराष्ट्रातून अन्य राज्यातील नेत्यांना राज्यसभेवर पाठविण्याची काँग्रेसची परंपराच

बाहेरच्या राज्यातील नेतेमंडळींना राज्यसभेवर पाठविण्याची काँग्रेसबरोबरच भाजपमध्येही प्रथा परंपराच पडली आहे.

Rajyasabha
महाराष्ट्रातील राज्यसभेसाठीचे राजकारण (संग्रहित छायाचित्र)

संतोष प्रधान

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा महाराष्ट्रातून संधी दिली जाईल की त्यांचे गृह राज्य असलेल्या तमिळनाडूतून उमेदवारी दिली जाते याकडे राज्यातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

बाहेरच्या राज्यातील नेतेमंडळींना राज्यसभेवर पाठविण्याची काँग्रेसबरोबरच भाजपमध्येही प्रथा परंपराच पडली आहे. पक्षाचे उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात अशा राज्यांमधून नेतेमंडळींना राज्यसभेवर पाठविले जाते. पक्षाकडून राज्यसभेसाठी तशी व्यवस्था केली जाते. राज्यसभेत महाराष्ट्राचे संख्याबळ १९ आहे. यापैकी काँग्रेसचे पी. चिदम्बरम (तमिळनाडू) आणि भाजपचे पी. मुरलीधरन (केरळ) हे दोन अन्य राज्यातील नेते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. काँग्रेस व भाजपने बाहेरच्या राज्यातील नेतेमंडळींना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवून पक्षाच्या दृष्टीने निर्णय घेतला होता.

महाराष्ट्रातून काँग्रेसने बाहेरच्या राज्यातील काही जणांना आतापर्यंत संधी दिली आहे. विश्वजित सिंह (१९८२-८८ आणि १९८८ ते ९४) हे १२ वर्षे खासदार होते. सिंह हे मूळचे दिल्लीतील. इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जायचे. त्यातूनच त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर संधी देण्यात आली. सिंह हे १२ वर्षे राज्यसभेचे खासदार होते, पण केवळ दोनदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबईत आले होते, अशी आठवण एका जुन्या काँग्रेस नेत्याने सांगितली. १९८९ मध्ये गुलामनबी आझाद यांचा महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना १९९० ते १९९६ या काळात राज्यसभेवर संधी देण्यात आली होती.

राज्यसभा निवडणूक : सहाव्या जागेवरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या कोंडीचा कॉंग्रेसचा डाव

नवी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या आवती भवती घुटमळणारे राजीव शुक्ला यांना २००६ ते २०१८ अशी १२ वर्षे काँग्रेसने राज्यातून राज्यसभेवर पाठविले होते. शुक्ला हे आधी उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले होते. पण नंतर उत्तर प्रदेशातून त्यांना राज्यसभेवर पाठविणे शक्य झाले नाही.नंतर त्यासाठी महाराष्ट्राचा आधार घेण्यात आला. क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी असल्याने त्यांचे राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रात उत्तम संबंध होते. देशातील एका बड्या उद्योगपतीचा त्यांच्यावर वरदहस्त होता. २०१८ मध्ये शुक्ला यांची मुदत संपुष्टात आली तेव्हा या उद्योगपतीच्याच माध्यमातून पुन्हा उमेदवारीकरिता त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. २०१२ मध्ये शुक्ला यांना पुन्हा उमेदवारी देण्यास राज्यातील काँग्रेस नेत्यांनी विरोध दर्शविला होता. तरीही त्यांना पक्षाने पुन्हा राज्यसभेवर पाठविले होते. शुक्ला यांनी राज्यसभा सदस्य म्हणून मिळणारा खासदार निधी भाजप आमदाराच्या मतदारसंघात खर्च केल्याबद्दल काँग्रेसचे माजी आमदार जगताप यांनी पक्षाच्या बैठकीत तक्रार केली होती.

चिदम्बरम यांना पुन्हा संधी मिळणार नसल्यास राज्यातून राज्यसभेवर जाण्याकरिता हे राजीव शुक्ला टपूनच बसल्याचे सांगण्यात आले.
२०१६ मध्ये चिदम्बरम यांना काँग्रेसने राज्यातून राज्यसभेवर पाठविले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत चिदम्बरम यांनी राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रश्न मांडू, असे सांगितले होते. गेल्या सहा वर्षांत त्यांनी महाराष्ट्राचे किती प्रश्न वरिष्ठ सभागृहात मांडले हा संशोधनाचाच विषय ठरावा.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It is the tradition of the congress to send leaders from other states to rajya sabha from maharashtras quota

Next Story
शिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
फोटो गॅलरी