नागपूर : निवडणूक आयोगाने राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यास सांगणे, लगेच दुसऱ्या दिवशी नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्षांनी ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असा अंदाज व्यक्त करणे आाणि त्याच दिवशी भाजप आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणे तसेच त्यानंतर एका दिवसाने भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांनी नागपूरमध्ये येऊन कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेणे हा योगायोग असला तरी भाजपची महापालिका निवडणुकीची लगबग यावरून स्पष्टपणे दिसून येते. ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव ओसरण्याच्या आधी निवडणुका घेण्याकडे या पक्षाचा कल असल्याची माहिती सुत्रांची आहे.
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आोगाला एक महिन्यापूर्वीच सांगितले होते. तेव्हापासूनच भाजपने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार असे सुतोवाचही करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून काही हालचाली होताना दिसून येत नव्हत्या आता प्रथमच आयोगाने प्रभाग रचना करण्याबाबत राज्य शासनाला सूचित केल्याने पुन्हा निवडणूक चर्चेला गती आली.
नागपूर हे सध्या तरी भाजपच्या राजकीय हालचालींचे केंद्रबिंदू आहे. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री दोघेही नागपूरचेच असल्याने येथूनच निवडणूक मोर्चेबांधणीची दिशा ठरते. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेबाबत राज्य शासनाला सूचना करताच दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यात निवडणुका व्हायला हव्या, असे सांगितले. याचा अर्थ भाजप ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील या बेताने तयारीला लागला आहे हे स्पष्ट होते. त्याच दिवशी आमदार संदीप जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही बावनकुळे यांच्या हस्ते झाले. प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी विदर्भातील कार्यकर्त्यांची कार्यशाळा नागपुरात घेतली व निवडणूक तयारीबाबत सूचना केल्या. एकूणच मागील तीन दिवसात नागपुरात घडलेल्या सर्व घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तयारीशी संबंधित होत्या. त्यामुळे इतर पक्षाच्या तुलनेत भाजप निवडणूक तयारीच्या बाबतीत आघाडी घेतल्याचे दिसून येते.
भाजप त्याच्यापुढे कुठलेही आव्हान नाही असे म्हणत असले तरी काँग्रेसमधील नेत्यांना पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे काम अजूनही सुरूच आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती देत असतात. यातूनच काँग्रेसच आपल्यापुढे आव्हान उभे करू शकते याची जाणीव भाजपला आहे, हे लक्षात घेऊनच नागपुरात पावले उचलली जात आहे.
भारताने पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या, ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव सध्या लोकांवर आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा पक्षाला कसा होईल याचे प्रयत्न केले जात आहे. मंगळवारी नागपुरात शिवकिल्ले शोभायात्रा काढण्यात आली होती. यात एकही देखावा शिवकिल्ल्यांचा नव्हता पण त्यात ऑपरेशन सिंदूरचा देखावा होता यावरून सर्वकाही लक्षात येते. ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होण्यापूर्वीच निवडणुका आटोपून घेण्याचा कल भाजपचा असून नागपुरात मागील तीन दिवसात घडलेल्या घडामोडी याचेच संकेत देत आहेत.