कोल्हापूर : संथ वाहणाऱ्या कृष्णाकाठच्या शिरोळ तालुक्याचे राजकीय पाणी ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून शह काटशहाचे राजकारण रंगात आले आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भाजपसह ठाकरे सेनेला धक्का दिला आहे.

याचवेळी अंतर्गत घडामोडी धक्कादायक बनल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा राजकीय प्रवास कसा जाणार हे लक्षवेधी ठरले आहे. 

शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड अशा तीन नगरपालिका आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने नवे मित्र जोडून प्रतिस्पर्ध्यांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी शिरोळचा दौरा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण साधले. दत्त कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेत्यांसह तिन्ही नगरपालिकांमध्ये यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केलेले माजी आमदार उल्हास पाटील यांनी आघाडीला तिलांजली देत शिंदे सेनेशी नवा राजकीय घरोबा केला आहे. यातून एकनाथ शिंदे शिवसेनेला समर्थन दिलेले माजी मंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाविकास आघाडीला शह देण्याची चाल खेळली आहे.

शिवाय, त्यांनी भाजपमधील सावकर मादनाईक, मिंलीद भिडे, रमेश यळगुडकर, शैलेश आडके अशा काही प्रमुखांना आपल्याकडे वळवून जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत बंधू संजय पाटील यड्रावकर यांची बाजू भक्कम केली आहे. परंतु , या घडामोडीत पाठिंबा दिलेले स्थानिक नेते आता अडचणीत आले असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर नाईक निंबाळकर यांनी त्यांना पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल निलंबित का केले जाऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. तरीही भाजपचे हे स्थानिक नेते संजय पाटील यड्रावकर यांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहिल्याने हा भाजपला धक्का ठरला आहे.

असाच धक्का आमदार याडराव कर यांनी ठाकरे सेनेलाही दिला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य संघटक चंगेजखान पठाण, माजी जिल्हा प्रमुख, जिल्हा संघटक वैभव उगळे, कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासो सावगावे यांनी आमदार यड्रावकर यांच्या महायुती – राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे.

 जयसिंगपूर नगरपालिकेत राजू शेट्टी, गणपतराव पाटील व समविचारी पक्ष, संघटना यांनी मोट बांधली आहे. मात्र त्यांचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यावर येथील यशाची समीकरणे ठरण्याची चिन्हे आहेत.

शिरोळ ढवळून निघाले 

आमदार यड्रावकर यांनी महायुतीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. परंतु, शिरोळ नगरपालिकेत त्यांचा सामना हातकणंगले राखीव मतदार संघातील आमदार अशोक माने यांच्याशी होणार आहे. येथे माने यांनी आपल्या सुनेला रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. एका अर्थाने हा एकनाथ शिंदे यांना मानणाऱ्या दोन आमदारातील सामना असणार आहे. यड्रावकर यांनी गणपतराव पाटील यांच्यासोबत राहिलेले चाबूक फोड आंदोलनाच्या निमित्ताने चर्चेत आलेले शेतकरी संघटनेचे दादा काळे यांना आपल्या सोबत घेतले असून त्यांच्या पत्नी श्वेता काळे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे यादव गटाच्या माध्यमातून अनिल यादव, पृथ्वीराज यादव हे गणपतराव पाटील यांच्यासोबत लढण्याच्या तयारीत आहेत.

कुरुंदवाडात खांदेपालट   

संस्थान कालीन कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये भाजपचे ज्येष्ठ रामचंद्र डांगे यांना आपल्याकडे वळवण्यात आमदार यड्रावकर यांना यश आले आहे. त्यांच्या सून मनीषा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी या पालिकेत भाजपच्या नेतृत्वाची धुरा गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे,  पंचायतराज समिती प्रमुख डॉ. संजय पाटील यांच्याकडे राहण्याची चिन्हे आहेत. येथे काँग्रेसचे जयराम पाटील गट विरोधकांशी निकराची लढाई देण्यासाठी सज्ज झाला आहे.