पिचड पितापुत्रांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न | madhukar pichad vaibhav pichad question of poliotical future Sugar factory ncp bjp mva akole | Loksatta

पिचड पितापुत्रांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय पिचड यांच्या अंगलट आला. विधानसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवापाठोपाठ आता कारखान्यातील सत्ता त्यांच्या हातून निसटली.

पिचड पितापुत्रांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न

प्रकाश टाकळकर

अकोले : ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील २८ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. पिचड यांच्यासह त्यांचे चिरंजीव, माजी आमदार वैभव पिचड या दोघांनाही धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ज्येष्ठ नेते पिचड यांचा सहकार क्षेत्रातील हा पहिलाच पराभव. त्यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सक्रिय भूमिका बजावली.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय पिचड यांच्या अंगलट आला. विधानसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवापाठोपाठ आता कारखान्यातील सत्ता त्यांच्या हातून निसटली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतूनही वैभव पिचड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता, त्यामुळे पिचड पितापुत्रांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठविले जाणार ?

राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, सहकारातील ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांच्यासह पिचड विरोधक आपापसातील मतभेद विसरून कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकवटले होते. त्यांचा आक्रमक प्रचार, प्रकृती ठीक राहत नसल्यामुळे गेली काही वर्षे पिचड यांचे कारखान्याच्या कारभाराकडे झालेले दुर्लक्ष, आदिवासी भागातील मतदारांनी त्यांच्याकडे फिरवलेली पाठ, ३० वर्षांची ‘अँटीइन्कम्बंन्सी’, बहुजन समाजाचा अध्यक्ष हवा हा प्रचार, आम्ही कारखाना चालवू शकतो असा सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्यात विरोधी महाविकास आघाडीला आलेले यश, अशा अनेक बाबी पिचड यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते. परिणामी पिचड यांच्या पॅनलला एकही जागा मिळू शकली नाही.

आमदारकी असतानाही कारखान्याचे अध्यक्षपद, तालुका दूध संघाचे अध्यक्षपद, तालुका शिक्षण संस्थेचे विश्वस्तपद त्यांनी स्वतःच्या कुटुंबातच ठेवले. पिचड कुटुंबातील सत्तेच्या केंद्रिकरणाविरुद्ध लोकांच्या मनात नाराजीची भावना होती. अकोल्याची राजकीय समीकरणे बदलली आणि पिचडांची राजकीय पकड ढिली होत गेली.

तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससोडून भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय मतदारांनी स्वीकारला नव्हता. अकोले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असला तरी सुमारे ५० टक्के लोकसंख्या बिगर आदिवासींची आहे. कारखान्याच्या सभासदांमध्ये बहुसंख्य सभासद बहुजन समाजाचे आहेत. मात्र मागील २८ वर्षात पिचड यांनी बहुजन समाजाच्या एकालाही कारखान्याचे नामधारी का होईना, अध्यक्ष केले नाही. याची बोच अनेकांच्या मनात होती.

हेही वाचा : काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, केरळमध्ये आदिवासींच्या प्रतिनिधींनी घेतली राहुल गांधींची भेट

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले मताधिक्य असतानाही पिचड पिता-पुत्रांनी अनाकलनीय निर्णय घेत भाजपची वाट धरली. विधानसभा निवडणुकीत याचा फटका वैभव पिचड यांना बसला. त्यांना दारूण पराभवास सामोरे जावे लागले होते. राज्यातील सत्ता बदलानंतर पिचडांची अनेक वर्षे साथ करणारे सिताराम गायकर यांच्यासह त्यांच्याजवळचे सर्वच खंदे समर्थक त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या तंबूत एकेक करीत डेरे दाखल झाले. वर्षानुवर्ष राजकारणात साथ करणारे जीवाभावाचे कार्यकर्ते सोडून गेल्यामुळे या निवडणुकीत पिचड पिता-पुत्र एकटे पडले होते. निवडणूक जिंकण्याच्या तंत्रात तरबेज असणारे त्यांचे एकेकाळचे सर्व शिलेदार त्यांच्याविरुद्ध एकवटले. गुरूला शिष्य भारी ठरले.

हेही वाचा : ‘प्रो-पीएफआय’ विरुद्ध ‘पेसीएम’: कर्नाटक निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेसने राजकीय अस्त्र ठेवली सज्ज

पिचड विरोधी महाविकास आघाडी सुरुवातीपासूनच आक्रमक होती. पिचड पिता-पुत्रांचा कारभार आणि त्यांची एकाधिकारशाही हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. कारखाना निवडणूक काळात तालुक्यातील काही पतसंस्थांची चौकशी सुरू झाली. या पतसंस्थांनी कारखान्याला वेळोवेळी आर्थिक मदत केली होती. निवडणूक प्रचारात हाही मुद्दा महत्त्वाचा ठरला. कारखान्याचा अध्यक्ष बहुजन समाजाचा हवा यावरही प्रचारात जोर दिला जात होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रचार सभेस मिळालेला प्रतिसाद वाऱ्याची दिशा स्पष्ट करणार होता.

याउलट पिचड गटाच्या प्रचारात उत्साह व जोश यांचा अभाव जाणवत होता. दीड तपापेक्षा अधिक काळ राजकारणात असूनही वैभव पिचड यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी तयार केली नाही. त्यामुळे पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडल्यानंतर नाईलाजाने नवख्या उमेदवारांना संधी द्यावी लागली. बहुसंख्य उमेदवार नवीन असल्यामुळे निवडणुकीतील डावपेचात ते कमी पडले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठविले जाणार ?

संबंधित बातम्या

पंढरपूर कॉरिडॉर रद्द होण्यासाठी भाजपचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार ? पंढरपूर कर्नाटकला जोडण्याच्या मागणीमुळे मनसे संतप्त
शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघांना भाजपाचा राजकीय विळखा
अशोक गेहलोतांच्या हातून मुख्यमंत्रीपदही जाणार?
पुण्यातील मनसे फुटीच्या उंबरठ्यावर ?
पराभवाच्या भीतीने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत माघारीची भाजपवर नामुष्की….

व्हिडिओ

ताज्या बातम्या
VIDEO: “त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही, कारण…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
“मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!
डार्क सर्कल्स येण्यामागची कारणं काय? जाणून घ्या यावरील घरगुती उपाय
विश्लेषण: एलॉन मस्कच्या ट्विटरला नाकारत ब्राझीलच्या नागरिकांचं भारतीय Koo App ला प्राधान्य; दोघांमध्ये नेमका फरक काय?
“मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो”… नाना पाटेकर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट