जिंकून येण्याच्या क्षमतेवरच जागावाटप हे सूत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निश्चित केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतात याची उत्सुकता आहे. किमान ६० जागा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी मांडली असून, मुख्यमंत्री शिंदे गटालाही अधिक जागा हव्या असल्याने तिढा वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुती व महाविकास आघाडीत जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. दोन्ही आघाड्यांनी जागावाटपावर प्राथमिक चर्चा केली आहे. निवडणुकीच्या आधीच जागावाटप निश्चित केल्यास बंडखोरी होण्याची भीती आहे. यामुळेच जागावाटप १० दिवसांत निश्चित केले जाईल, असे सांगण्यात येत असले तरी निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत हा घोळ घातला जाईल, अशी एकूण लक्षणे आहेत. कारण आधीच जागावाटप जाहीर झाल्यास पक्षातील इच्छूक अन्य पक्षांमध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा : TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य

महायुतीत भाजपला १५० पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. शिंदे गटाला ६० तर अजित पवार गटाला ५० जागा देण्याची प्राथमिक तयारी भाजपकडून दर्शविण्यात आली होती. याला दोन्ही घटक पक्षांचा विरोध आहे. अजित पवार गटाने ५० ते ५५ जागा फारच कमी असल्याचे भाजप नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर अजित पवार यांनी ८० जागा लढविण्याची तयारी करण्याचे आवाहन नेतेमंडळींना केले होते. पण शनिवारी नागपूरमध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी किमान ६० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे गेल्या वेळी ५४ आमदार निवडून आले होते. तसेच काँग्रेसचे तीन तर अपक्ष तीन आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला. अजित पवार यांनी जाहीरपणे ६० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका मांडल्याने पक्षाची जास्त जागांची मागणी नसेल हे सूचित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी जागांबाबत आपले पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. पण शिंदे गटही ७०च्या आसपास जागांबाबत आग्रही राहिल अशी चिन्हे आहेत. सध्या अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे ४३ आमदार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेच्या ४० तसेच अपक्ष व छोट्या पक्षांच्या १० आमदारांचा पाठिंबा आहे.

हेही वाचा : नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?

लोकसभेच्या वेळी जागावाटपात भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांना झुकते माप दिले होते. याउलट राष्ट्रवादीला तुलनेत कमी जागा मिळाल्या होत्या. याचीच पुनरावृत्ती होण्याची शिंदे गटाला आशा आहे तर अजित पवार गटाला त्याचीच भीती आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही कमी जागा मिळाल्यास पक्षात फूट पडू शकते, अशी अजित पवार गटाला भीती आहे.

जागावाटपात शिंदे गटाप्रमाणेच आम्हालाही समान जागा मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेेते छगन भुजबळ यांनी केली आहे. दोघांची ताकद समान आहे, असेही भुजबळांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 how many seats ajit pawar and eknath shinde will get print politics news css
Show comments