संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, विधान परिषदेच्या १० जागांकरता लवकरच निवडणूक जाहीर होईल. राज्यात राज्यसभा वा विधान परिषदेची निवडणूक शक्यतो बिनविरोध करण्यावरच सत्ताधारी आणि विरोधकांचा भर असतो. यामुळे २०११ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर गेल्या दहा वर्षांत राज्यात राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी प्रत्यक्ष मतदान झालेलेच नाही.

विधान परिषदेवर  शिवसेनेनकडून निवडून आलेल्या किरण पावसकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने पावसकर यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा विधान परिषदेसाठी पोटनिवडणूक झाली. प्रत्यक्ष मतदान होऊन त्यात राष्ट्रवादीचे किरण पावसकर हे विजयी झाले होते.

२०१० मध्ये विधान परिषदेच्या १० जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते. ती निवडणूक कमालीची चुरशीची झाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे विजय सावंत हे दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून आले होते. शिवसेनेचे अनिल परब हे विजयाकरिता मतांचा कोटा पूर्ण करू शकले नव्हते. शेवटी मतांचा कोटा पूर्ण न करताही अनिल परब निवडून आले तर भाजपच्या शोभाताई फडणवीस यांचा पराभव झाला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे सात जण पहिल्याच फेरीत निवडून आले होते. काँग्रेसचे विजय सावंत, शिवसेनेचे अनिल परब आणि भाजपच्या शोभाताई फडणवीस हे पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करू शकले नव्हते.

२००८ मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान झाले होते. तेव्हा नारायण राणे यांच्याबरोबर असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करावे लागले होते. कारण राज्यसभा निवडणुकीत खुल्या पद्धतीने मतदान होते. मतपत्रिका दाखवून मतदान करावे लागते. यामुळेच राणे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना शिवसेना उमेदवाराला मतदान करणे भाग पडले होते.

१९९८ची ऐतिहासिक राज्यसभा निवडणूक

१९९८ मध्ये राज्यातील राज्यसभा निवडणूक ही ऐतिहासिक ठरली होती. या निवडणूक निकालातूनच राष्ट्रवादीच्या स्थापनेची बीजे निर्माण झाली. काँग्रेसने १०,जनपथचे निकटवर्तीय मानले जाणारे निवृत्त सनदी अधिकारी राम प्रधान यांना उमेदवारी दिली होती. राम प्रधान यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेस नेत्यांवर होती. मात्र काँग्रेस आमदारांची मते फुटली. यातून सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा हे निवडून आले त्याचवेळेस काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राम प्रधान यांचा पराभव झाला. शिवसेनेचे सतीश प्रधान हे तेव्हा अर्ध्या मताच्या फरकाने निवडून आले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राम प्रधान यांचा पराभव गांभीर्याने घेतला होता. काँग्रेसमधील शरद पवार समर्थक आमदारांवर मते फुटण्याचे खापर फोडण्यात आले. जयंत पाटील, आर. आर. पाटील आदी आमदारांना दिल्लीत पाचारण करण्यात आले. तीन दिवस पक्षश्रेष्ठींनी त्यांना भेटच दिली नव्हती. तीन-चार दिवस तंगविल्याने आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. त्यातूनच हळूहळू काँग्रेसमध्ये नाराजी वाढत गेली. आमदारांना मिळालेल्या वर्तणुकीबद्दल पवारांनी नापसंती व्यक्त केली होती.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे आमदारकी हुकली

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी २००८ मध्ये काँग्रेसने शिवसेनेतून दाखल झालेल्या माजी खासदार सुबोध मोहिते यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारीकरिता मोहिते हे आठवडाभर मुंबईत थांबले होते. पण पक्षाकडून होणारा गोंधळ लक्षात घेता उमेदवारी मिळण्याबाबत मोहिते साशंक होते. मोहिते यांनी थेट नागपूर गाठले. रात्रीच्या विमानाने ते नागपूरला गेले आणि  सकाळी त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. मोहिते यांना मुंबईत येण्यास सांगण्यात आले. तोपर्यंत मुंबईचे विमान रवाना झाले होते. मोहिते यांनी त्यानंतर पुण्यात पोहचण्याचा पर्याय होता. पुण्यातून हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. मोहिते हे पुण्यात वेळेत पोहचले. आमदारकी बहुधा मोहिते यांच्या नशिबी नव्हती. कारण त्याच दिवशी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुण्यात कार्यक्रम होता. राष्ट्रपतींच्या विमानाचे आगमन होईपर्यंत कोणत्याही विमान किंवा हेलिकॉप्टरला उड्डाणाला परवानगी दिली जात नाही. यामुळे मोहिते यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाकरिता हिरवा कंदिल मिळाला नाही. मोहिते यांना घेऊन येणारे हेलिकॉप्टरने उड्डाण केले तेव्हा वेळ निघून गेली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही दुपारी ३ वाजेपर्यंत होती. तर मोहिते यांचे हेलिकॉप्टर २.५०ला महालक्ष्मी रेसकोर्सच्या हेलिपॅडवर उतरले होते. दरम्यान, उमेदवारी भरण्याची मुदत संपत आल्याने काँग्रेसने मधू जैन यांना ऐनवेळी अर्ज भरण्यास सांगितले. तेव्हा मधू जैन विरुद्ध भाजपचे सुरेश हावरे यांच्या चुरशीची पोटनिवडणूक झाली. जैन या कशाबशा निवडून आल्या. कारण तेव्हा काँग्रेसची मते फुटली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra has not had direct election of rajya sabha or maharashtra legislative council in last 10 years pkd
First published on: 18-05-2022 at 09:05 IST