मालेगाव : सतत पक्ष बदलण्याची ख्याती असणाऱ्या मालेगावच्या हिरे घराण्यातील माजी आमदार अपूर्व हिरे हे पुन्हा एकदा भाजपवासी झाले. गेल्या दीड वर्षात हिरे यांचे हे चौथे पक्षांतर आहे. हिरे यांचे ताजे पक्षांतर पोलीस दप्तरी दाखल गुन्ह्यांच्या श्रृंखलेमुळे घडून आले का, अशी शंका उपस्थित होत आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यापासून सुरु झालेल्या मालेगावातील काँग्रेसी हिरे घराण्याची राजकीय कारकीर्द महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे दबदबा निर्माण करणारी ठरली. खुद्द भाऊसाहेब हिरे हे एकेकाळी मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते.

महसूल मंत्री असताना ‘कसेल त्याची जमीन’ या न्यायाने कुळांना संरक्षण देणारा कुळ कायदा अंमलात आणल्यामुळे त्यांची दूरदृष्टी तसेच कार्यकर्तृत्वाची महती ठळकपणे अधोरेखित होते. भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर दिवंगत व्यंकटराव हिरे, दिवंगत डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांना देखील राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी लाभली. मंत्रिमंडळात प्रदीर्घकाळ मानाचे स्थान मिळविणाऱ्या हिरे घराण्यामुळे साहजिकच मालेगाव हे अनेक वर्षे नाशिक जिल्ह्यातील सत्तेचे केंद्र होते. अशी पार्श्वभूमी असलेल्या भाऊसाहेब हिरे यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतील वारसदारांना मात्र कालौघात सर्व सत्ताकेंद्रे गमवावी लागली. तद्वतच ‘आम्हाला तुमच्या पक्षात घ्या’ असे म्हणत वेगवेगळ्या पक्षांचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर वारंवार येत आहे. अपूर्व हिरे यांचे भाजपवासी होणे, याच मालिकेतील पुढचा अध्याय म्हणावा लागेल.

१९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपची युती सत्तेत आल्यावर अपूर्व यांचे वडील प्रशांत हिरे यांनी काँग्रेसचा त्याग करत पहिल्यांदा शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर शरद पवारांच्या नेतृत्वाला त्यांनी पसंती दिली. राष्ट्रवादीकडून लढताना १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर प्रशांत हिरे यांना काही काळ राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर मात्र प्रशांत हिरे यांना दादा भुसे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून सलग दोनदा पराभव पत्करावा लागला. यादरम्यान पुत्र अपूर्व यांच्यासह हिरे नाशिकला स्थलांतरित झाले. अपूर्व यांनी मालेगावऐवजी नाशिक येथे राजकारण सुरू केले. तेथे नगरसेवक तसेच शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेतील आमदारकीची संधी त्यांना लाभली. काही वर्षांत खुद्द प्रशांत हिरे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले असले तरी या सर्व काळात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना असे या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारण्याचे हिरे मंडळींचे कसब एकंदरीत थक्क करणारे आहे. कोणत्याही एका पक्षात न रमण्याचा स्वभाव गुण आणि सततच्या पक्षांतरांमुळे हिरेंना टिकेचे धनी व्हावे लागत आहे. किंबहुना त्यांनी केलेली पक्षांतरे चेष्टेचा देखील विषय झाली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अपूर्व हिरे यांनी शरद पवारांची साथ सोडून दीड वर्षांपूर्वी ‘एकच वादा अजित दादा’ म्हणत अजित पवार गटात उडी घेतली होती. त्यानंतर ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीबद्दल त्यांचे प्रेम दाटून आले होते. पुढे राज्यातील महायुतीच्या सत्तेत अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले न् झाले तोच अपूर्व हे अजित पवारांच्या तंबूत दाखल झाले. पुलाखालून काही पाणी वाहून गेल्यावर आता त्यांनी पुन्हा भाजपचे कमळ फुलविण्याचा निर्धार केला आहे. या पक्षांतराचे समर्थन करताना ते विकासाचा मुद्दा पुढे रेटत असले तरी, हिरे कुटुंबियांच्या अधिपत्याखालील शिक्षण व सहकारी संस्थांना विशेषत: भाजपचा राजाश्रय मिळावा, हा या पक्षांतरामागील प्रधान हेतू असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. गैरव्यवहार अथवा फसवणुकीचा ठपका ठेवत हिरे कुटुंबियांच्या संस्थांविरोधात गेल्या दोन वर्षात नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जवळपास ३० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हिरे कुटुंबीय अडचणीत आले असल्याचे दिसत आहे. अपूर्व यांच्या आत्ताच्या भाजप प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाही मालेगावातील व्यंकटेश सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी हिरे कुटुंबियांविरोधात नव्याने गुन्हा दाखल झाला आहे.

याशिवाय पारंपारिक राजकीय विरोधक शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिरेंच्या संस्थांविरोधात काही चौकश्या लावल्या आहेत. या चौकश्यांच्या ससेमिरांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हवी तशी मदत मिळत नाही, या कारणावरून अपूर्व हे नाराज असावेत आणि त्यातूनच त्यांनी ‘शक्तिशाली’ अशा भाजपचा रस्ता धरला असावा,अशी देखील वंदता आहे. प्रशांत हिरे यांचे ज्येष्ठ पुत्र अपूर्व हे नाशिकहून राजकारण करीत असले तरी, त्यांचे कनिष्ठ पुत्र अद्वय यांनी मात्र मालेगावातूनच राजकारण सुरू ठेवले आहे. आपल्या कुटुंबियांसमवेत सतत पक्षांतर करण्याचा त्यांचा देखील अनुभव दांडगा आहे.

शिवसेना दुभंगल्यानंतर भाजपचा त्याग करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आपलेसे करत त्यांनी मालेगाव बाह्य मतदार संघातून गेल्या वेळची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला. पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी देऊन ठाकरे गटाने त्यांना एक प्रकारे बळ देण्याचा आटापिटा सुरु ठेवला आहे. संधी मिळेल तेव्हा भाजपवर आरोप करताना अद्वय हे अक्षरशः तुटून पडतात. तिकडे प्रशांत हिरे यांचे चुलत बंधू प्रसाद हे देखील अलीकडे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचेही काँग्रेस, भाजप, काँग्रेस व पुन्हा भाजप असे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. परस्परांबद्दल पराकोटीचे राजकीय वीर झालेल्या भाजप व शिवसेना ठाकरे गट या दोन पक्षांमध्ये विभागणी झालेले अनुक्रमे अपूर्व व अद्वय या दोन्ही हिरे बंधूंचे राजकारण सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत कसे आकारास येते, हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.