Haryana Assembly Election 2024 BJP Candidate: लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर देशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्ष लोकसभेतील यशामुळे अधिक आक्रमक झाल्याचं दिसत असून सत्ताधारी पक्षांकडून अधिक सतर्क पावलं टाकली जात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मतदान चालू असून हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाच्या काही दिवस आधी हरियाणातील गढी-सांपला किलोई मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार मंजू हुड्डा चर्चेत आल्या आहेत. पण त्यांची चर्चा त्यांच्या प्रचारामुळे नसून त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे जास्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत मंजू हुड्डा?

मंजू हुड्डा यांचं नाव सर्वप्रथम चर्चेत आलं ते त्यांच्या उमेदवारीनंतर. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते आणि या मतदारसंघातून गेल्या चार निवडणुकांमध्ये सलग जिंकून येणारे भूपिंदर सिंग हुड्डा यांच्याशी मंजू हुड्डा यांचा थेट सामना होणार आहे. गढी-सांपला किलोई हा भूपिंदर सिंग हुड्डा यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपानं मंजू हुड्डा यांची निवड केली आहे. तसेच, यावेळी मंजू हुड्डा भूपिंदर सिंग हुड्डा यांना कडवी टक्कर देतील, असा विश्वासही भाजपाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मंजू हुड्डा यांचे वडील प्रताप यादव हे २०२० मध्ये पोलीस उपअधीक्षक पदावरून निवृत्त झाले. पण मंजू यांचे पती राजेश हुड्डा म्हणजे एक सराईत गुन्हेगार असल्याचं स्थानिक पोलिसांचंच म्हणणं आहे! “माझ्या पोलीस स्थानकाच्या रेकॉर्डमध्ये राजेश हुड्डा याचं नाव वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या यादीत आहे. त्याच्याविरोधात किमान १८ गुन्हे दाखल आहेत. त्यातले बहुतेक गुन्हे हे गंभीर स्वरूपाच्या कृत्यांसाठीचे आहेत. त्याला एक किंवा दोन प्रकरणांमध्ये निर्दोष सोडलं असलं, तरी ज्यांची अद्याप चौकशी चालू आहे, अशी अनेक प्रकरणं अद्याप प्रलंबित आहेत. तो एक सराईत गुन्हेगार आहे. ज्याच्याविरोधात १८ गुन्हे दाखल असतील, अशा माणसाला तुम्ही काय म्हणाल?” असा प्रश्न रोहतक सदर स्टेशन हाऊसचे पोलीस निरीक्षक सतपाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

मंजू मात्र पतीच्या पाठीशी ठाम!

दरम्यान, मंजू हुड्डा यांचा मात्र पती राजेश हुड्डा यांना पाठिंबा आहे. “त्यांच्यात आता बराच बदल झाला आहे. ते खरंतर व्यवस्थेचे बळी आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांना आधीच निर्दोष म्हणून सोडण्यात आलं असून आता त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. गेल्या अनेत वर्षांमध्ये त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचा भूतकाळ आता खूप मागे राहिला आहे. त्यांच्याविरोधात जे काही गुन्हे दाखल होते, ते त्यांच्याविरोधातील कारस्थानाचा भाग म्हणून दाखल करण्यात आले आहेत”, असं मंजू हुड्डा म्हणाल्या.

भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !

मंजू हुड्डा या स्वत: सध्या पीएचडीचा अभ्यास करत आहेत. त्यांना प्राध्यापक होण्याची इच्छा होती. पण २०२२ सालीच त्यांच्या पतीच्या आग्रहास्तव त्या राजकारणात आल्या. स्थानिक नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या. त्यानंतर त्या जिल्हा परिषदेवरही निवडून आल्या. आता भाजपानं त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.

“राजेशनं आत्तापर्यंत १० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. त्यांना ज्या प्रकरणात अटक केली होती, त्या हत्येच्या प्रकरणात त्यांना आता निर्दोष सोडण्यात आलं आहे. त्याव्यतिरिक्त आणखी दोन प्रकरणं आहेत, मात्र कोणत्याही नवीन प्रकरणाची नोंद नाही. आता ते एक सामान्य व्यक्ती म्हणून आयुष्य जगत आहेत”, अशी प्रतिक्रिया राजेश हुड्डा यांच्या एका सहकाऱ्याने दिली आहे.

थेट माजी मुख्यमंत्र्यांनाच आव्हान!

दरम्यान, मंजू हुड्डा यांनी थेट माजी मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचीही चर्चा होत आहे. भूपिंदर सिंग हुड्डा हे २००५ सालापासून या मतदारसंघात निवडून येत आहेत. पण त्यांच्यासमोर कमकुवत उमेदवार म्हटल्याचं मंजू हुड्डा यांना अजिबात पटत नाही. “इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत. ज्यावेळी नवखे उमेदवारच जाएंट किलर ठरले आहेत. मी नवीन उमेदवार आहे हे खरं आहे. पण मला माझ्या मतदारसंघातून लोकांचा खूप पाठिंबा मिळत आहे. भाजपानंही माझ्यासारख्या नव्या उमेदवारावर विश्वास व्यक्त केला आहे”, असं त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manju hooda haryana bjp candidate from garhi sampla kiloi in rohtak pmw