नागपूर: आपला पक्ष वाढत नसेल तर प्रतिस्पर्धी पक्षाला फोडून त्यांचे सक्षम नेते पक्षात घ्या, असे जाहीरपणे सांगणारे भाजप नेते इतर पक्षातून आलेल्यांना नाराज करणार नाही, याची खात्री देऊ लागला आहेत. एक वर्षापूर्वी काँग्रेसमधून पक्षात आलेले मनोहर कुंभारे यांची भाजपने नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. कुंभारेंची नियुक्ती भाजपच्या निष्ठावंतांना जशी चाप देणारी आहे तशीच ती इतर पक्षातून भाजपमध्ये येऊ इच्छिणारे पण, सध्या कुंपणावर असणारे यांना सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्याचाही समावेश होता. यंदा प्रथमच भाजपने जिल्ह्यात दोन अध्यक्ष नियुक्त केले आहेत. जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ असल्याने हा निर्णय घेण्यात आला, असे सांगण्यात येत असले तरी त्यासाठी हेच ऐकमेव कारण आहे की, पक्षात नव्याने आलेल्यांना पद देण्यासाठी केलेली ही सोय आहे, असा सवाल भाजपचेच जुणे जाणते नेते करू लागले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघासाठी एक या प्रमाणे दोन अध्यक्ष नियुक्त केले. त्यात आनंदराव राऊत आणि मनोहर कुंभारे यांचा समावेश आहे. राऊत पक्षाचे निष्ठावान सदस्य आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. उमरेड तालुक्यात भाजप रुजवण्यात त्यांचे योगदान आहे. मात्र मनोहर कुंभारे यांच्याबाबत असे नाही. ते एकाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून भाजपमध्ये आले.

काँग्रेसमध्ये ते या पक्षाचे नेते सुनील केदार यांचे कट्टर समर्थक मानले जात . केदारांच्याच कृपेमुळे त्यांना जिल्हा परिषदेेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात सुनील केदार यांना सह देण्यासाठी भाजपने कुंभारे यांना गळाला लावले व लगेच वर्षभरात त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदही दिले. त्यांच्याकडे काटोल, सावनेर आणि रामटेक या तीन विधानसभा मतदारसंघाची जबादारी देण्यात आली आहे.

कुंभारे का ?

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप ‘फोडा आणि झोडा’ याच नितीचा अवलंब करणार आहे. तसे संकेतही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘काँग्रेस रिकामी करा’ असे जाहीरपणे सांगून यापूर्वीच दिले आहे. भाजपमध्ये जाणाऱ्यांची मुस्कटदाबी होते, असे अनुभवाचे बोल इतर पक्षातून या पक्षात गेलेले जुने नेते सांगतात. त्यामुळे प्रयत्न करूनही भाजपला काँग्रेसचा मोठा नेता अद्याप गळाला लावता आला नाही.

लागले ते माजी जि.प. सदस्य. बाहेरून आलेल्यांना केवळ वापरून घेतले जाते हा पक्षावरचा आरोप खोडून काढणे आणि पक्षात प्रवेश करू इच्छिणारे पण कुंपणावरील नेत्यांपर्यंत सकारात्मक संदेश जावा म्हणून काँग्रेसमधून आलेल्या कुंंभारे यांना अद्यक्षपद देण्यात आले, अशी चर्चा आहे.

काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न ? २०१४ ते २०२५ या दहा वर्षात मधले महाविकास आघाडीचे अडिच वर्ष सोडले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेबाहेर आहे. या उलट भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न करूनही भाजपला जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व निर्माण करता आले नाही.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रामटेकमध्ये विजय मिळवून भाजपला त्यांची जागा दाखवून दिली होती. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे ग्रामीण भागात वर्चस्व राखून असणारे सुनील केदार व त्यांच्या काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद निवडणुकीत शह देण्यासाठी भाजपने कुंभारे कार्ड वापरले आहे. विरोधी पक्ष शिल्लक उरलेला नाही असे भाजप नेते म्हणत असले तरी दुसरीकडे काँग्रेसची धास्ती या पक्षाला आजही सतावत असल्याचे कुंभारेंच्या नियुक्तीने स्पष्ट होते.