Latest News on Maharashtra Politics Today : अहिल्यानगर येथील एआयएमआयएमच्या सभेत मुस्लीम महिलेने ‘जय शिवराय’ अशी घोषणा दिली. आमची सत्ता येईल तेव्हा घोटाळ्यांची चौकशी करून सर्वांना आत टाकू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे गटाला दिला. नागपूर येथील ओबीसी समाजाच्या मोर्चातून लक्ष्मण हाके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना खुले आव्हान दिले. विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्या पक्षातील नेत्याने केलेल्या विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला. महाराष्ट्रातील या पाच महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ओवैसींच्या सभेत जय शिवरायचा नारा

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचा आज अहिल्यानगरमध्ये (पूर्वीचे अहमदनगर) मेळावा पार पडला. या मेळाव्यात रुहिनाझ शेख या महिला पदाधिकाऱ्याने केलेले भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भाषणासाठी मंचावर येताच त्यांनी जय शिवराय आणि जय भीम असा नारा दिला. उपस्थितांना संबोधित करताना रुहिनाझ म्हणाल्या, “एक बुरखेवाली इथे येऊन शिवरायांच्या नावाने कशी घोषणा देते असा काही लोकांना प्रश्न पडला असेल. मी सर्वांना सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार होते. त्यांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिमांचाही समावेश होता. मात्र, काहीजण मुस्लिमांचे योगदान पुसण्याचा प्रयत्न करू पाहतात. मी त्यांना स्पष्टपणे सांगते की आम्ही इथून (महाराष्ट्र) एक इंचही हटणार नाही.” दरम्यान, रुहिनाझ शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

शिवसेना शिंदे गटाला मनसेला थेट इशारा

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याची अनेकांना उत्सुकता आहे. यापार्श्वभूमीर ठाकरे गट आणि मनसेने आज ठाण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधारी शिंद गटावर टीका केली. आम्ही बाळासाहेबांची खरे सैनिक आहोत. आता निवडणुकीत पैसा चालणार नाही. ठाण्यात दहशतीचे वातावरण असून अनेकजण या दहशतीला घाबरून तिकडे (शिंदे गट) गेले आहेत. चार हजार कोटींचे बजेट असलेल्या ठाणे महापालिकेला या लोकांनी बरबाद केले आहे. आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी करून सर्वांनाच आतमध्ये टाकणार, असा इशाराही त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना दिला.

आणखी वाचा : Rajen Gohain Resignation : भाजपाला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्यासह १७ जणांचा तडकाफडकी राजीनामा; काँग्रेसला बळ मिळणार?

ओबीसींच्या मोर्चातून हाकेंचं मंत्री विखेंना आव्हान

हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत २ सप्टेंबरचा शासकीय अध्यादेश तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने आज नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी समुदायातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांना खुले आव्हान दिले. “विखे पाटील कृषी विरोधी आहेत आणि ते ओबीसी समाजाच्या हिताचे निर्णय घेत नाहीत,” असा आरोप हाके यांनी केला.अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला मी स्वतः जाऊन सांगणार आहे की, विखे पाटील यांना मतदान करू नये. त्यांच्या धोरणांमुळे शेतकरी आणि ओबीसी समाज अडचणीत आले आहेत, असे हाके यांनी म्हटले. विखे पाटील यांनी ओबीसींच्या हितासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसमोर त्यांचा निषेध केला जाईल, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

विजय वडेट्टीवार हे ओबीसींची दिशाभूल करताहेत- तायवाडे

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार ओबीसी समाजाचा मोर्चा काढून दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला. “महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही. मराठा समाजातील ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडतील, त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. तसे पाहता हे आधीपासूनच सुरू होते, आता केवळ त्यासंबंधी अधिकृत निर्णय जारी करण्यात आला. विजय वडेट्टीवार हे या शासकीय अध्यादेशाचा चुकीचा अर्थ काढून समाजात संभ्रम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका बबनराव तायवाडे यांनी केली. अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे समाजात गोंधळ निर्माण होतो आणि खोट्या आशा पल्लवित होतात, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Ramdas Athavale : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील बूट हल्ल्यावर रामदास आठवले भडकले; केली ‘ही’ मागणी!

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे- बाबासाहेब पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार व राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेले एक विधान सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. निवडून यायचे असते म्हणून आम्ही आश्वासने देत असतो. लोकांनी ठरवले पाहिजे की आपल्याला काय मागायचे आहे, असे विधान बाबासाहेब पाटील यांनी जळगावमधील एका जाहीर सभेत केले. त्यांच्या या विधानावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून राजकीय नेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थितकेला जात आहे. दरम्यान, आपल्या विधानावरून वाद निर्माण होत असल्याचे लक्षात येताच बाबासाहेब पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझ्या विधानामुळे भावना दुखावल्या असतील, तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो”, असे त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.