Nitin Gadkari Promise Bihar Election 2025 : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षांचे नेते राज्यात तळ ठोकून आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हेदेखील बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मांझी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या प्रचारसभेतून गडकरींनी राज्यातील रस्त्यांचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले. ‘बिहारमध्ये अमेरिकेतील दर्जाचे रस्ते बांधले जातील’ असे वचन त्यांनी यावेळी दिले. गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमके काय म्हणाले नितीन गडकरी?
बिहारमधील प्रचारसभेत नितीन गडकरी यांनी विकासकामांच्या मुद्द्यावर जोर दिला. “राज्यातील विकासकामे, तरुणांना रोजगार आणि सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद फक्त भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतच आहे. मी स्वत: एक शेतकरी असून माझ्याकडे चार साखर कारखान्यांची मालकी आहे. महाराष्ट्रातील शेतकरी ऊसाचे उत्पादन घेऊन लाखो रुपये कमावतात. बिहारमधील शेतजमिनीही चांगल्या आहेत. काही भाग वगळता इतर ठिकाणी पाण्याची अजिबात कमतरता दिसत नाही. यापूर्वीही मी अनेकदा राज्याचा दौरा केला आहे. प्रत्येकवेळी येथील बंद पडलेल्या साखर कारखान्यांच्या बाबतीत मी विचारणा केली आहे. आम्हाला शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारायची आहे”, असे गडकरी म्हणाले.
कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याचे आश्वासन
कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, “आगामी काळात अनेक वाहने बायोफ्यूएलवर चालतील आणि त्याचा फायदा सर्वांनाच होईल. लवकरच इथेनॉल आणि सीएनजीवर चालणारे ट्रॅक्टर बाजारात येतील. त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात होईल आणि आर्थिक फायदाही होईल. फक्त स्मार्ट सिटीच नाही, तर स्मार्ट गावे कशी तयार करावीत, यावरही आम्ही सातत्याने काम करत आहोत. शेतकऱ्याला शेतीबरोबरच ऊर्जा उत्पादनाशी जोडणे हे सरकारचे लक्ष आहे, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. शेतकरी डिझेल प्लांटद्वारे शेतीत अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील आणि देशाच्या ऊर्जा क्षेत्रातही क्रांतिकारी बदल घडतील.”
नरेंद्र मोदी-नितीश कुमारांचे कौतुक
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, “केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना उत्तम खते आणि बियाणे मिळत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्याच्या भुशीपासून एक किलोमीटरचा डांबरी रस्ता तयार करून चाचणी घेण्यात आली आहे आणि हा रस्ता जागतिक दर्जाच्या मानकांवर खरा उतरला आहे. बिहारमधील तरुण आपल्या गावी परततील आणि त्यांना आपल्या मातृभूमीतच रोजगार मिळेल. राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू केले जातील. राजकीय पक्षातील नेते प्रामाणिक असतील तरच विकासकामे होतात. राजकारण हे पैसे कमावण्याचे साधन नाही.” यावेळी गडकरींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक केले. नितीश कुमार यांनी राज्याचा विकास आणि महिला सक्षमीकरणाचे केलेले काम खरंच सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, असे गडकरी म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
आणखी वाचा : Top Political News : भाजपामध्ये गटबाजी, महायुतीत शिंदे गट एकाकी? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…
बिहारमध्ये अमेरिकन दर्जाचे रस्ते बांधणार- गडकरी
बिहारमध्ये अमेरिकन दर्जाचे रस्ते बांधले जातील, असे आश्वासनही नितीन गडकरी यांनी सभेतून दिले. “मी बिहारच्या रस्त्यांना अमेरिकेतील रस्त्यांसारखे स्वरूप देणार आहे. एकापेक्षा एक उत्तम पूल उभारणार आहे. बिहारचे राष्ट्रीय महामार्ग जागतिक दर्जाचे करणार हा माझा शब्द आहे. तो दिवस लांब नाही, जेव्हा बिहारच्या रस्त्यांचा दर्जा अमेरिकेसारखा असेल. आम्ही हे कुठलेही उपकार म्हणून करत नाही. विकासकामांसाठी खर्च केले जाणारे पैसे तुमचेच असून तुम्ही त्याचे मालक आहात. आम्ही फक्त नोकर असून प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्यासाठी आलो आहोत. राज्यातील विकासकामांचे श्रेय कोणत्याही नेत्याला नसून जनतेलाच आहे,” असे ते म्हणाले.
“जर तुम्ही लोकसभा निवडणुकीत जनार्दन सिंह यांना आणि राष्ट्रीय लोकशाहीला मत दिले नसते तर मोदीजी पंतप्रधान झाले नसते आणि मीदेखील मंत्री झालो नसतो; म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की, बिहारला सुखी, समृद्धी आणि शक्तिशाली करण्याचा आमचा निर्धार आहे”, अशी ग्वाहीदेखील गडकरी यांनी दिली.
हेही वाचा : …तर बांगलादेशलाही भारतात विलीन व्हावेसे वाटेल; खासदाराच्या दाव्याने भाजपाची कोंडी?
बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान
राज्यातील २४३ विधानसभा जागांसाठी दोन (६ आणि ११ नोव्हेंबर) टप्प्यांत मतदान होणार आहे; तर १४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची आज (मंगळवार) सायंकाळी पाच वाजता सांगता होईल. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.४२ कोटी झाली आहे. यंदा २४ जूनपर्यंत ही संख्या ७.८९ कोटी होती. मात्र, मसुदा यादीतून ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात सत्तास्थापन केली होती, त्यावेळी महाआघाडीनेही कडवी झुंज दिली होती. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहे.
