BBMP dog food scheme भारतातील ‘सिलिकॉन सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात आता भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी एक अनोखी योजना सुरू करण्यात आली आहे. बंगळुरू महानगरपालिकेने या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत त्यांना चिकन, भात व भाज्या खायला देण्यात येणार असून, त्याचा वार्षिक खर्च २.८ कोटी रुपये आहे. त्यावरून भाजपाने काँग्रेसवर तीव्र हल्ला चढवत भटक्या कुत्र्यांना बिर्याणी देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे; तर बृहत बंगळुरू महानगरपालिकेने (बीबीएमपी) यावर प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांसाठी असणाऱ्या जेवणाच्या योजनेचा बिर्याणीशी काहीही संबंध नाही. नेमकं हे प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

नवीन योजना काय आणि बिर्याणीचा वाद काय?

  • बीबीएमपीने म्हटले आहे की, त्यांचा पशुसंवर्धन विभाग आता शहरातील भटक्या कुत्र्यांना चिकन, भात आणि भाज्या पुरवेल; त्याचा वार्षिक खर्च २.८ कोटी रुपये असेल.
  • त्यांनी प्रत्येक झोनमध्ये १०० खाद्य केंद्रे उभारली आहेत, त्यामध्ये वर्षभर प्रत्येक झोनमध्ये किमान ५०० कुत्र्यांना दिवसातून एकदा अन्न दिले जाईल.
  • अंदाजानुसार, प्रत्येक कुत्र्याचा खर्च दररोज १९ रुपये (कर वगळून) येईल आणि त्यामध्ये वाहतूक, अन्न पुरवठा व साइटची स्वच्छता यांसाठी आठ रुपये आणि अन्नासाठी ११ रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.
  • त्यांनी म्हटले, “कुत्रे मांसाहारी प्राणी असल्याने त्यांना प्रथिनांसह संतुलित आहार मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार पोषणाची खात्री करण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या अन्नात उकडलेले चिकन, भात आणि भाज्यांचा समावेश आहे.”
भारतातील ‘सिलिकॉन सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात आता भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी एक अनोखी योजना सुरू करण्यात आली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भाजपाने काँग्रेसला घेरत असा आरोप केला होता की, भटक्या कुत्र्यांना बिर्याणी देणे चुकीचे आहे. राज्य सरकारने शहराला ‘ब्रँड बंगळुरू’ऐवजी ‘बिर्याणी बंगळुरू’ केले असल्याचा आरोपही भाजपाने केला. मात्र, महानगरपालिकेने हे स्पष्ट केले की, या योजनेत बिर्याणी किंवा अशा कोणत्याही शब्दाचा उल्लेख नाही. या प्रकल्पावर काम करणाऱ्या बीबीएमपी अधिकाऱ्याने सांगितले की, हे अन्न विशेषतः भटक्या कुत्र्यांसाठी योग्य, सुरक्षित व पौष्टिकदृष्ट्या संतुलित असावे यानुसार डिझाइन केले आहे. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या पायलट प्रोजेक्टमधून मिळालेल्या माहिती आणि तज्ज्ञ पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार जेवण योजना तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुक्कीर तिहार योजनेवर प्रश्नचिन्ह

‘कुक्कीर तिहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला भटक्या प्राण्यांच्या काळजीसाठी एक सामुदायिक जबाबदारी म्हणून सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेवर प्रतिक्रिया देताना तमिळनाडूचे काँग्रेस खासदार कार्ती पी. चिदंबरम यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यामागील तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “हे खरे आहे का? कुत्र्यांना रस्त्यावर जागा नाही. त्यांना आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करणे आवश्यक आहे, जिथे त्यांना खायला दिले जाऊ शकते, त्यांचे लसीकरण केले जाऊ शकते आणि निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते. त्यांना खायला घालणे आणि रस्त्यावर मुक्तपणे फिरत राहणे हे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी एक मोठा धोका आहे.”

२८ मार्च रोजी कार्ती चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवन कार्यालयात भेट घेतली. देशातील भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या आरोग्य व सुरक्षिततेच्या चिंतांवर प्रकाश टाकला. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये चिदंबरम यांनी नमूद केले की, भारतात ६.२ कोटींहून अधिक भटके कुत्रे आहेत. प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) नियम, २०२३ लागू करूनही अंमलबजावणी अप्रभावी राहिली आहे. आता त्यांनी समग्र, मानवीय व वैज्ञानिक उपाय विकसित करण्यासाठी राष्ट्रीय कार्य दल स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी निवारा गृहे आणि संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी दीर्घकालीन योजनेची आवश्यकता असल्याचेदेखील म्हटले आहे.

बीबीएमपीने जारी केलेल्या निविदेनुसार, पशुसंवर्धन विभागाने आता आठही बीबीएमपी झोन म्हणजेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, आरआर नगर, दसरहल्ली, बोम्मनहल्ली, येलहंका व महादेवपुरा या प्रत्येक झोनमध्ये ५०० कुत्र्यांना दररोज आहार सेवा देण्यासाठी नोंदणीकृत सेवा प्रदात्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. याचा अर्थ पहिल्या टप्प्यात दररोज जास्तीत जास्त चार हजार कुत्र्यांना अन्न देण्याची योजना आहे. केवळ भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)मध्ये नोंदणीकृत अन्न सेवा प्रदातेच या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. हा करार सुरुवातीला एक वर्षासाठी वैध असेल आणि कामगिरीच्या आधारे आणखी एका वर्षासाठी वाढवता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.