Aam Aadmi Party Rajya Sabha ticket आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) पंजाबमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती राजेंद्र गुप्ता यांना राज्यसभेचे तिकीट दिले आहे. दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) पंजाबमधून राज्यसभेवर जाऊ शकतात असा अंदाज होता. मात्र, पंजाबमधून राजेंद्र गुप्ता यांना तिकीट दिल्याने या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. ट्रायडंट ग्रुपचे (Trident Group) संस्थापक असलेले उद्योगपती गुप्ता संसदेच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभेत) प्रवेश करणार आहेत, कारण आम आदमी पक्षाने (आप) रविवारी त्यांना आगामी पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले आहे. ‘आप’ने हा निर्णय का घेतला? केजरीवाल यांनी खासदार होण्याची संधी का सोडली? जाणून घेऊयात…
१०,००० कोटींची संपत्ती असणाऱ्या उद्योगपतींना राज्यसभेचं तिकीट
- प्रादेशिक प्रतिनिधित्व बळकट करण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल म्हणून आपच्या या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
- कारण पंजाबच्या राजकारणात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा वाढता प्रभाव जाणवत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
- विद्यमान खासदार संजीव अरोरा यांना याच वर्षाच्या सुरुवातीला लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात विजय मिळाल्याने आणि त्यांना भगवंत मान मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे ही पोटनिवडणूक लवकरात लवकर घेण्यात येणार आहे.
कोण आहेत राजेंद्र गुप्ता?
६६ वर्षीय गुप्ता यांची एकूण संपत्ती १०,००० कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. त्यांनी १९८५ मध्ये अभिषेक इंडस्ट्रीजच्या माध्यमातून खत व्यवसाय सुरू केला. सहा वर्षांनंतर त्यांनी कापड व्यवसायात वैविध्य आणले आणि एक सूत गिरणी सुरू केली, जी पुढे ट्रायडंट ग्रुपचा पाया ठरली. गुप्ता पक्षीय भेदाभेद विसरून प्रत्येक सरकारांशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ ठेवण्यासाठी ओळखले जातात. गुप्ता यांनी काँग्रेस सरकार (२०१२-२०१७) आणि शिरोमणी अकाली दल-भाजपा सरकार (२०१७-२०२२) या दोन्ही सरकारांच्या काळात पंजाब राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. ते २०१२ पासून २०२२ दरम्यान या पदावर कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रकाश सिंग बादल यांनी अनेकदा त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये गुप्ता यांच्या यशोगाथेचा उल्लेख केला आहे.
२०२२ मध्ये ‘आप’चे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुप्ता यांची पंजाब राज्य आर्थिक धोरण आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या ऑगस्टमध्ये त्यांनी एक लोकप्रिय धार्मिक संस्था असलेल्या श्री काली देवी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली. गुप्ता यांनी यापूर्वी FICCI च्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडसाठी असलेल्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आणि पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंदीगडच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून क्रीडा प्रशासनातही काही काळ जबाबदारी सांभाळली आहे.
२००७ मध्ये गुप्ता यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच त्यांना वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेकडून “वस्त्र रत्न” पुरस्कारही मिळाला. फोर्ब्सच्या भारतातील उल्लेखनीय उद्योजकांच्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. लुधियाना येथे मुख्यालय असलेल्या ट्रायडंट ग्रुपमध्ये टॉवेल, सूत, बेड आणि बाथ लिनन असलेले एक मोठे कापड आणि कागद उत्पादक युनिट आहे. बरनाला (पंजाब) आणि बुधनी (मध्य प्रदेश) येथे उत्पादन युनिट्ससह, या समूहाने कापड, कागद, रसायने आणि वीज या क्षेत्रांमध्ये वैविध्य आणले आहे. ही कंपनी आपली उत्पादने १५० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.
२००६ मध्ये भारतीय किसान युनियन (उग्रहां) कडून तीव्र विरोध झाल्यामुळे त्यांच्या बरनाला युनिटसाठी जमीन अधिग्रहण करताना अडथळा आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन वर्षांनी हा प्रश्न सोडवण्यात आला. गुप्ता यांनी आरोग्याच्या कारणास्तव २०२२ मध्ये ट्रायडंट ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) पद सोडले आणि सध्या ते चेअरमन एमेरिटस आहेत.
कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांमार्फत त्यांनी शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, महिला सबलीकरण आणि ग्रामीण विकास यांसह विविध प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. २०२० मध्ये कोविड-१९ महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी वेतन कपात किंवा कर्मचारी कपात केली असताना, ट्रायडंट ग्रुपने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले होते; या निर्णयामुळेही हा समूह चर्चेत आला होता.