पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेस पक्षाने ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींच्या शांत भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसने ‘कुर्ता, चुडीदार पायजमा आणि काळ्या पादत्राणांसह असलेले एक पोस्टर शेअर केले असून त्यावर ‘गायब’ असे लिहिले आहे, त्यामुळे ता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पोस्टरवर कुणाचा चेहरा दिलेला नसला तरी पोस्टरवरील पोशाख पंतप्रधान मोदींसारखा आहे. अनेक भारतीयांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा वाद काय? जाणून घेऊयात.
‘गायब’ पोस्टरचा वाद आणि पाकिस्तानी मंत्र्यांची प्रतिक्रिया
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरून एक पोस्टर शेअर करण्यात आले, ज्यानंतर हा वाद सुरू झाला. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे सूचित करणारे हे पोस्टर होते. या पोस्टरवर कुणाचा चेहरा नसला तरी पोस्टरवरील पोशाख हा काहीसा पंतप्रधान मोदी परिधान करत असलेल्या पोशाखासारखाच आहे. मुख्य म्हणजे ही पोस्ट पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद अहमद हुसेन चौधरी यांनी पुन्हा शेअर केली आणि त्यात ‘नॉटी काँग्रेस’ असा हॅशटॅग दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “गाढवाच्या डोक्यातून शिंगे गायब झाल्याबद्दल ऐकले होते, पण इथे मोदी गायब झाले आहेत.”
भाजपा आणि नेटकरी संतापले
या पोस्टमुळे नाराज नेटकऱ्यांनी काँग्रेसवर टीका केली. भूतकाळात पाकिस्तानशी सौम्य वागल्याचा आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तेव्हा गायब झाल्याचा आरोप नेटकऱ्यांनी काँग्रेसवर केला. एका वापरकर्त्याने लिहिले, “१०० टक्के खरे आहे; जेव्हा जेव्हा भारतावर हल्ला व्हायचा तेव्हा काँग्रेस गायब असायची.” काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देत भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, “काँग्रेस पक्ष हा पाकिस्तानसारखा बोलतो आणि त्यांची कार्यसंस्कृती आणि चालीरीतीही इस्लामाबादसारख्या असल्याचे पाहायला मिळत आहे.”
ते पुढे म्हणाले, “काँग्रेस पक्षाने एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दिसत नाही. काँग्रेस पाकिस्तानी लोकांची भाषा बोलत आहे आणि दहशतवाद्यांसारखे वागत आहे.” भाजपाच्या पश्चिम बंगालमधील नेत्या लक्ष्मी सिंह यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देत म्हटले की, पंतप्रधान मोदींची प्रतिमा असलेले पोस्टर आणि दहशतवाद्यांच्या उर्वरित भूमीलाही नष्ट करण्याची वेळ आली आहे. सिंह यांनी लिहिले की, “लवकरच काँग्रेस आणि पाकिस्तान दोघेही चुकीचे ठरतील.”
पहलगाम दुर्घटनेतील बळींच्या वृत्तावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर हे वादग्रस्त पोस्टर शेअर करण्यात आलेले आहे. विजय वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर काँग्रेसने आपल्या सदस्यांना स्वतंत्र विधाने करण्यापासून सावध राहण्याचे निर्देश जारी केले आहेत. परंतु, जुना वाद शांत होण्यापूर्वीच पक्षाच्या अधिकृत हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या नवीन पोस्टर आणि व्हिडीओमुळे नवा वाद सुरू झाला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानच्या पीआर एजंटशी केली. काँग्रेस नेते पाकिस्तानच्या स्लीपर सेलसारखे वागत आहेत, असे ते म्हणाले.
या पोस्टरवर पाकिस्तानच्या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे हा विषय आणखीन चिघळला आहे. भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पाकिस्तान आणि काँग्रेसचे विचार सारखे आहेत, हा पुरावा देणारी एक पोस्ट शेअर केली. भारतीय जनता पक्षाचे आणखी एक प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांच्या काँग्रेसवरील पोस्टवर टीका केली आणि “काँग्रेस पाकिस्तानच्या आदेशांचे पालन करत आहे” असे म्हटले. भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडला आहे आणि हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd